मित्र- मैत्रिणींनो, नमस्कार! शीर्षक वाचून चकित झालात? म्हणाल पावसाळा संपल्यावर काय सांगतोय हा! पण हे सगळं पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवा की! खात्री आहे, ह्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेली ठिकाणं अनेकांना ठाऊक नसतील. पण अशी ठिकाणं शेअर करण्यातच माझ्या सारख्या 'भटक्या' लोकांना आनंद वाटतो! मॉन्सून सुरु होऊन दोन महिने झाले तरी मुंबईच्या बाहेर कुठे प्रवास घडत नव्हता. दऱ्या-खोऱ्यातली हिरवळ, डोंगरमाथ्यावर उतरलेले ढग आणि पांढरेशुभ्र धुके सारखे खुणावत होते. शेवटी एक संधी आयतीच चालून आली. ऑगस्ट महिन्यात माझ्या मित्र परिवारातील एकाने त्याच्या गावी- शिरशिंगेला येतोस का म्हणून विचारले. दापोलीपासून अगदी जवळ असलेल्या ह्या गावात त्याने अलीकडेच सुंदर घर बांधले होते. मी काय, अर्ध्या पायावर तयार!
कोकण रेल्वेवरील खेडला उतरून पुढे १५ ते २० किमीचा प्रवास. सगळे बरोबर असल्याने घर शोधायची भानगड नव्हती. मांडवी एक्स्प्रेस ३ टायर एसीचे तिकीटही अगदी सहज मिळाले, आयरसीटीसी झिंदाबाद! हिरवी शाल पांघरलेले डोंगर, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि फेसाळणारे धबधबे पहात खेडला चार तासात पोहोचलोदेखील. तिथून पुढे एक टमटम मिळवली आणि त्याच्या गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. हिरवीगार शेते पहात, हलकीच थंड हवा अंगावर घेत आणि ढगाळ आभाळाकडे नजर रोखून असताना शिरशिंगे केव्हा आले कळलेही नाही. बाकी घर छान टुमदार होते. विशेषतः घराच्या समोर असलेला कठडा. ही पुढचे चार दिवस माझी सर्वात आवडती जागा बनली. इथे चहा पीत किंवा गाणी ऐकत निवांत बसायचो, सकाळी पक्षांचा किलबिलाट ऐकू यायचा, मधूनच गावातले ओळखीचे हाळी देऊन जायचे.
दापोली इथून जवळ असूनही मी ते बऱ्याच वेळा पहिले असल्याने ह्या वेळी मी ठरवून वेगळी ठिकाणे निवडली. पहिल्या दिवशी मित्राबरोबर ह्या गावात सायकल हाकत मनमुराद भटकलो. गाव तसं छोटंसंच! पण छान आहे. लहानशा डांबरी रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवीगार आणि घनदाट झाडी, काही गावकऱ्यांची भाताची शेते, थोड्याफार काजू आणि आंब्याच्या बागा पाहायला मजा आली. ऊन असूनही हवेत एक हवाहवासा गारवा होता. गावाच्या टोकाला एका लहानशा तलावाच्या काठावर एक शंकराचं देऊळ आहे. गाभाऱ्यात किंवा आवारात दुपारच्या वेळी जाऊन बसलात की अगदी एसीत बसल्याचा फील येतो! संगमरवरी बांधकाम आणि नेटका परीसर, ह्यामुळे इथे प्रसन्न वाटते. इथेही संध्याकाळी गेलात तर अनेक प्रकारचे पक्षी; पोपट, खंड्या, कोकिळा, किंगफिशर, सुतारपक्षी इत्यादी अनेकांचे दर्शन घडते! आम्ही गेलो तेव्हा तलावात दोन दिवसांपूर्वी एका मगरीनेही दर्शन दिल्याची चर्चा होती. पण आमच्या दुर्दैवानें किंवा (मगरीच्या सुदैवाने) आम्हाला काही मगर दिसली नाही! मी अर्धा पाऊण तास काठावर जाऊन बसलोही. पण मगर काही दिसत नाही असं लक्षात आल्यावर 'सुसरबाई तुझी पाठ मऊ' म्हणत परतलो.
दुसऱ्या दिवशीचा प्लॅन अगदी फिक्स होता. चिपळूणहून एक आप्तेष्ट गाडी पाठवणार होते. त्या दिवशी पाहायची ठिकाणे मी आधीच ठरवून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता शिरशिंग्यातून निघालो आणि खेडपासून जवळ असलेल्या पालगड गावात साने गुरुजींचे घर पाहायला गेलो. घर बंद असते. पण मागे असलेल्या एका दुकानातून तुम्ही घराची चावी घेऊन घर आतून पाहू शकता. घरात छोटीशी प्रदर्शनी आहे. गुरुजींची माहिती आणि त्यांचा जीवनपट फोटोज आणि लेखांद्वारे उलगडून दाखवला आहे. तिथून निघालो आणि एक तासाभरात थेट नातूनगर धरण गाठले. धरणाच्या आतल्या भागात तुम्ही जाऊ शकताच असे नाही. माझ्या गळ्यातला कॅमेरा पाहून सुरक्षा रक्षकाने मला परवानगी नाकारली. शेवटी कॅमेरा गाडीत ठेवून नुसता फेरफटका मारून आलो. हा परिसरही निसर्गरम्य आहे. इथला विशाल जलसागर, काठावर असलेली अनेक प्रकारची झाडं आणि पावसाळी ढगांनी भरलेलं आभाळ पाहून फोटोग्राफीचा मोह आवरणं अशक्यच. मी धरण परिसराच्या बाहेर आलो आणि तलावाच्या काठाकाठाने जाणारा रस्ता दिसला. इथून तुम्ही फोटो काढू शकता. आणखी थोडं पुढे गेल्यावर पाण्याचा खळखळाट ऐकू आला, जरा पुढे जाऊन पाहतो तर काय! अवघ्या सात आठ फुटांवरून वाहणारा एक छोटासा पण अगदी स्वछ धबधबा स्वागताला उभा होता! मग काय, इथे पुढचा अर्धा तास दुधाळ फेस असलेल्या पाण्यात यथेच्छ भिजलो. जलाशयाचे आणि मोहक निसर्गाचे भरपूर फोटो काढले आणि गाडी जिथे पार्क केली होती तिथे परतलो. एव्हाना पावसाची भुरभुर सुरू झाली होती आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते.
पुढे आम्हाला खोपी-शिंदी गावाजवळ असलेला रघुवीर घाट पाहायला जायचं होतं. आम्ही खेड शहरात आलो, एका ढाब्यावर जेवलो आणि तिथून मुंबई गोवा महामार्गाला लागलो. रघुवीर घाटात जायचं असेल तर खेडहुन मुंबईच्या दिशेने जा. भरणा नका सोडल्यावर साधारण १०-१५ किमीवर डावीकडे एक फाटा लागतो, तिथून आत वळा. आणि मग कोणालाही दिशा विचारलित तर सांगतील. तरीही गुगल मॅप चालू ठेवणे क्रमप्राप्त! मी ह्या नकाशाच्या आधारेच घाटापर्यंतचा रस्ता शोधला.
वेरळ, हेदली, ऐनवरे अशी गावे मागे टाकत खोपी-शिरगावच्या दिशेने घाट सुरु होतो. हा घाट म्हणजे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा भविष्यातील महत्वाचा दुवा ठरणार आहे. साध्या खोपीच्या पुढे रस्त्याचे काम सुरु आहे. खोपी माथ्यावर जाईपर्यंत रास्ता चांगला आहे, मी तर भर पावसात गेलो होतो. परंतु रास्ता सुस्थितीत असतो. इथे पर्यटकांची वर्दळ जास्त प्रमाणात नसते, ही माझ्या दृष्टीने जमेची बाजू. गोंगाट, गर्दी ह्यापासून लांब घेऊन जाणारा परंतु तरीही सुरक्षित असा हा घाट निसर्गप्रेमींना नक्की आवडेल. पश्चिम घाटात आढळणाऱ्या अनेक दुर्लभ औषधी वनस्पती ह्यांसह विविध प्रकारचे पक्षी ह्यामुळे ह्या घाटाला विशेष अशी जैवविविधता प्राप्त झाली आहे. वळणा-वळणाच्या रस्त्याने माथ्यावर जाताना दोन्ही बाजूला पाहत रहा. सह्याद्रीचे उंच कडे, त्यातून वाहणारे असंख्य धबधबे, रस्त्यावर उतरलेले ढग, दर्या-खोऱ्यांनी पांघरलेली हिरवीगार दुलई आणि कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणारा पाऊस, आहाहा! घाटमाथ्यापर्यंतचे अंतर साधारण १५ किमी आहे. पण रस्त्याची खरी मजा घेत वर जाण्याचा आनंद काही आगळाच. मला जिथे फोटो काढावेसे वाटले, कड्याच्या टोकावर बसावसं वाटलं तिथे गाडी थांबवत गेलो. पावसाळयात गेलात तर रस्त्याला लागून अनेक लहान धबधबे आढळतील, त्यातही भिजण्याचा आनंद औरच.
मजल दरमजल करत दीड तासाने खोपी माथ्यावर पोहोचलो. इथे नावाची पाटी वगैरे दिसणार नाही बरं का! नकाशावर खोपी पिन करून ठेवा आणि रूट डायरेक्शन चालू ठेवा. गरज वाटल्यास ऑफलाइन लोकेशन सेव्ह करुन ठेवा. म्हणजे नेटवर्क गेलं तरीही रस्ता सहज सापडेल. माथ्यावर आलात की रस्ताच्या उजव्या बाजूला लोखंडी रेलिंग, त्रिकोणी घुमटी आणि पर्यटकांसाठी बांधलेला वव्ह्यू पॉईंट दिसेलच. इथे रस्ता जरा रुंद आहे. सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करून उतरु शकता. समोरच्या बाजूने असलेला एक जिना जरा खालच्या अंगाला जातो. इथला निसर्ग अफाट आहे. दोन्ही बाजूला लोखंडी रेलींग असल्याने जायला सुरक्षित आहे. हा जिना तुम्हाला डोंगराच्या टोकावर घेऊन जातो आणि तिन्ही बाजूंनी तुम्ही डोंगररांगा, पसरलेला खेड मधला जलाशय आणि खोलच खोल दऱ्या पाहू शकता. वाऱ्यावर झुळूझुळू डोलणारं गवत, झाडांच्या फांद्यांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाऊसधारा ह्यांनी एक वेगळीच धून ऐकू येते. निसर्गाशी एकरूप झालं की आपला बँक बॅलन्स, नोकरी, हजार तऱ्हेचे प्रश्न, चिंता; सगळंच खुजं वाटू लागतं.
फक्त फोटोग्राफी करायची असेल तर पावसाळ्यात इथे उजेडाच्या बाबतीत तुमचं नशीब चांगलं पाहिजे. माझं नशीब भलतंच जोरावर होतं. कारण पावसाळी हवा असूनही सूर्यप्रकाश चांगला होता, त्यामुळे मला इथे मनसोक्त लँडस्केप टिपता आले. पण निसर्गाचा चमत्कार पहा. अर्ध्या पाऊण तासात इथली हवा बदलू लागली, वातावरण एकदम ढगाळ झाले, पावसाचे थेंब झेलत मी वर आलो. पाहतो तर गाडीच दिसेना! कारण विचारता? ढगांचा इतका दाट थर रस्त्यावर पसरला होता की रास्तच दिसेनासा झाला होता! शेवटी कशीबशी गाडी शोधली. आत आलो आणि सरळ फॉग लॅम्प चालू करून पार्किंग लाईट चालू केले.
ढग जरा ओसरल्यावर समोरच असलेल्या हॉटेलमध्ये गेलो. इथे तुम्ही चहा-कॉफी सोबत गरमागरम भज्यांवर किंवा पोह्या-उपम्यावर ताव मारू शकता, दरीच्या टोकावर असलेले हे छोटेखानी असे एकमेव हॉटेल इथे आहे. दुपारच्या वेळी गेलात तर शाकाहारी जेवणही मिळते. मी एका कोपऱ्यातील टेबलवर चहाचे घुटके घेत आणि कांदा -बटाटयाच्या भाज्यांवर ताव मारत बसलो. खिडकीतून खोल दरीत वाहणारे धबधबे दिसत होते आणि हळूहळू अस्ताला जाणारा सूर्यही. अंधार व्हायच्या आत निघावं म्हणून चटकन बाहेर पडलो. पुन्हा एकदा वळणदार प्रवास करत, रघुवीर घटाला अलविदा करत शिरशिंग्यात परतलो ते इथे पुन्हा येण्याचे वचन देऊनच!
ऑफबीटखेड शिरशिंगे रघुवीरघाट आणि पावसाळा