हळव्या भातबियाण्यांना फटका

Payal Bhegade
28 Aug 2023
Blog

ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरिपातील भातशेतीवर परिणाम दिसू लागला आहे. हळव्या जातीच्या भातबियाण्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. फुटवा येण्याच्यावेळीच पाऊस अनियमित असल्यामुळे उत्पादन घटू शकते, अशी भिती शेतकर्‍यांसह अभ्यासकांनीही वर्तविली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत पडणार्‍या सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी २५२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टपर्यंत सरासरी २६६७ मिलीमीटर पाऊस पडतो. गतवर्षी याच कालावधीत २९६१ मिमिची नोंद झाली होती. यावर्षी अलनिनोच्या परिणामुळे अपेक्षित सरासरीही गाठता आलेली नाही. जून आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने पावसासाठी यथातथाच गेले आहेत. त्याचे परिणाम आपसूकच भातशेतीवर दिसून येत आहेत. जूनमध्ये पाऊस लांबल्यामुळे भातलावण्यांना पंधरा दिवस विलंब झाला तर ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाल्याने करपा, पाने गुंडाळणारी अळीसारखे रोग दिसू लागले आहेत. उशिराने लावलेल्या खाचरातील भातरोपांवर परिणाम होणार आहे. दोन दिवसांपूर्वी हलका पाऊस पडत होता. आता दिवसातून एखादी सर पडून जात आहे. यामुळे भातशेतामध्ये ओलावा टिकून राहत आहे. दिवसा पुन्हा कडकडीत उन पडल्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. याबाबत शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. व्ही. व्ही. दळवी म्हणाले, भात पिकाला जेव्हा पाण्याची गरज आहे त्याचवेळी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे रोपांची वाढ खुटणार आहे. रोग, किडीचा प्रादुर्भाव सुरू झालेल्या शेतामध्ये वाढ अधिक होणार आहे. सध्या सकाळच्या सत्रात पाऊस पडतो. हा पाऊस सायंकाळी अपेक्षित आहे. अशीच स्थिती राहिलीच तर रोपांची उंची कमी होईल. तसे झाले तर लोंब्यांची संख्या घटेल आणि दाणेही कमी राहतील. सध्या हळव्या भाताच्या रोपांना फुलोरा येण्याची स्थिती आहे. या वेळी जर पाऊस व्यवस्थित पडला नाही तर मोठा फटका बसू शकतो. शिरगाव महसूल मंडळात दोन हजार मिलीमीटर पाऊस झाला आहे. अपेक्षेपेक्षा तो कमी आहे.
भातरोपांना अधुनमधून पडणार्‍या सरींची आवश्यकता आहे. पाऊस दोन दिवस पडतो आणि पुन्हा उघडीप मिळते. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.