बारसू (ता. राजापूर) आणि चवे (ता. रत्नागिरी) येथील कातळ खोदचित्रांना राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. याबाबतची अधिसूचना गुरुवारी (ता. ३०) जारी झाली आहे. बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत कातळखोदचित्रे समाविष्ट होत असताना शासनाने राज्य संरक्षित स्मारकाची घोषणा केल्यामुळे त्यांना पाठबळ मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने हा शासन निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे. बारसू येथील कातळशिल्प समूह क्र. २ हे राज्य संरक्षित स्मारक घोषित झाले. ही कातळशिल्पे मध्याश्मयुगीन काळातील असून, या कातळशिल्प समूहात एक माणूस, चार मासे व अर्धवट चौकोनाकृती दाखवण्यात आले आहे.
कोकणातील प्रागैतिहासिक व विशेषत्त्वाने मध्याश्मयुगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कातळशिल्पासह २४९.७५ चौरस मीटर क्षेत्रफळ संरक्षित केले जाणार आहे.
चवे येथील कातळशिल्पही मध्याश्मयुगीन काळातील आहे. येथे दोन मनुष्याकृती, तीन वराह, प्रसूत होणारी स्त्री अंकित करणारी कातळशिल्पे आहेत. स्त्रीचे कातळशिल्प मातृदेवतेच्या संकल्पनेचा आद्य नमुना असावा, असे मानण्यास जागा आहे. कातळशिल्प आणि जवळचा परिसर असे एकूण ४३७ चौरस मीटर क्षेत्र राज्य स्मारक म्हणून संरक्षित करण्यात येणार आहे.
दोन हजार कातळखोदचित्रे
गेल्या १२ वर्षांपासून कोकणात सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि डॉ. प्रा. सुरेंद्र ठाकूर-देसाई यांच्या टीमने कातळशिल्प शोध, संशोधनाला सुरुवात केली. आतापर्यंत कोकणात १७५ गावांत २ हजारांहून अधिक कातळखोद चित्रे नोंद झाली आहेत. त्यातील १७ गावांतून राज्य संरक्षित स्मारक होण्याकरिता प्रस्ताव शासनाकडे पाठवले आहेत. हा दर्जा देण्याकरिता प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी देवीहसोळ आणि कशेळी (ता. राजापूर) या गावातील खोदचित्रांना राज्य संरक्षित स्मारक दर्जा प्राप्त झाला आहे. आता नव्याने दोन ठिकाणांना हा दर्जा मिळाला असून, अजून १३ ठिकाणांना दर्जा मिळण्याची प्रक्रिया होणार आहे.
गेली १०-१२ वर्षे आम्ही कोकणात कातळशिल्पांचा शोध, संशोधन असे काम सुरू केले. एवढ्या वर्षांनंतर शासनानेही त्याची दखल घेऊन या कातळखोदचित्रांना राज्य शासनाचा संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. घेतलेल्या मेहनतीचे आज सार्थक झाले. शासनाच्या सकारात्मक पावलामुळे विकास प्रक्रियेला सुरुवात होईल.
-सुधीर रिसबूड, कातळशिल्प शोधकर्ते
बारसूसह अन्य कातळशिल्प संरक्षित व्हावीत, अशी आमची कायमच मागणी आहे. त्याप्रमाणे बारसू कातळाशिल्पाचा स्मारक म्हणून झालेला समावेश ही आनंददायी बाब आहे. बारसूसह अन्य २०० हून अधिक असलेल्या कातळशिल्पांनाही स्मारक म्हणून दर्जा द्यावा.
मध्याश्मयुगीन काळातील कातळशिल्प 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित; शासनाकडून अधिसूचना जारी