"तुम्ही कसं काय एवढं वजन बरोबर घेऊन प्रवास करायचात ? एवढं घेऊन तरी काय जात होता ?" असा प्रश्न माझ्या नातवाने विचारला आणि मन ३०-४० वर्षं मागे भूतकाळात गेलं...
त्या काळात मुंबईहून कोकणातल्या गावी जाणं किंवा गावाहून मुंबईला येणं हे आजच्याएवढं सोपं आणि 'हलकं' कधीच नसायचं.
उदाहरणासाठी मुंबईहून गावी जाणाऱ्या चाकरमानी कुटुंबाच्या सामानात या काही गोष्टी must होत्या...
मिठाईचा पुडा
बिस्कीटाचे पुडे
सुके बोंबील
पक्की पानं (खायची)
कात
खांडाची सुपारी
तंबाखू
चटई
ट्रांझिस्टर किंवा टेपरेकॉर्डर (त्याच्यासोबत एखादी sony/TDKची 'भरून' घेतलेली कॅसेट, दोन-चार भजनाच्या डबलबारीच्या आणि एखादी मालवणी नाटकाची कॅसेट)
Pond's किंवा nycil चा डबा,
तीन किंवा चार सेलची बॅटरी (त्यावेळी torch ला battery आणि batteryला सेल हेच शब्द प्रचलित होते.)
लहान मुलांसाठी बुद्धिबळ, ल्यूडो, पत्ते, नवा व्यापारी, बॅडमिंटन, रिंग, दोरीच्या उड्या मोठ्या मुलांसाठी बॅट, बॉल
मोठ्या माणसांसाठी पत्त्यांचा डबल कॅट (आठ जणांमध्ये मेंढीकोट खेळण्यासाठी)
चंदनाचं खोड
एक-दोन उभ्या दांड्याच्या छत्र्या
गावाहून मुंबईला येणाऱ्या कुटुंबाकडे असणारे बोजा...
हापूस आंब्याची लाकडी पट्ट्यांची गवत भरलेली पेटी
पायरी-रायवळ आंब्याची करंडी
दोन-तीन लहान-मोठे फणस
मालवणी मसाला (घरी बनवलेला-वजन अंदाजे पाच किलो)
कोकमं तीन-चार पायली
गावठी तांदूळ
कुळथाचं पीठ
लोणचं (घरी घातलेलं, चिनीमीतीच्या बरणीमध्ये व्यवस्थित भरलेलं आणि पॅक केलेलं)
काजी (घरी भाजलेले काजू)
करवंदं (सुकवलेली)
आंबोशी (कच्च्याआंब्याचे मीठ लावून उन्हात सुकवलेले तुकडे)
खारातला आंबा
फणसाचं साट (फणसपोळी-घरची)
आंब्याचं साट (आंबापोळी-घरची)
मुटीयल (कोकमाच्या बियांपासून बनवलेलं घन स्थितीत राहणारं तेल)
भोपळ्याच्या बिया
चारा-बोरा (चारोळी)
सुकट (दोडीया)
मास्टा (तिसऱ्यांचं उन्हात सुकवलेलं मांस)
वाडवण (केरसुणी)
सूप
कोयता
आडाळा (विळी)
सोकाटण (कोंबडीच्या हाडांचे बारीक तुकडे करण्यासाठी वापरला जाणारा लाकडाचा तुकडा)
शहाळी (निघायच्या दिवशी काढलेली)
पिठाचे लाडू (घरचे)
शेंगदाण्याचे लाडू (बाजारचे)
शेवेचे लाडू (बाजारचे)
खाजं (बाजारचं)
निघायच्या आदल्या दिवशी बनवलेली ओल्या खोबऱ्याची कापं...
Imagine करा तो काळ... कोकण रेल्वे हा लोकांना विनोद वाटत होता. गावांमधून रिक्षा, एस.टी., डांबरी रस्ते, लाईट अशा काहीच सोयी नव्हत्या. मुंबईला जायची हक्काची बोट सेवा ही शेवटचे आचके देत होती. एकट्याच उरलेल्या 'कोकणसेवक' या बोटीच्या बेभरवशाच्या आणि २२-२४ तासांच्या प्रवासाला लोक कंटाळले होते.
अशा परिस्थितीत एस.टी. महामंडळ मुंबई-गोवा रोडवर भक्कमपणे आपले पाय रोवत होतं. प्रवाशांना सुद्धा १२-१४ तासात आपल्या गावात पोहोचवणारी 'ठेपी' (थेट) एस.टी. किंवा गोव्याला जाणारी आरामगाडी (luxury) सोयीस्कर वाटू लागली होती.
पण घरापासून लांब असणाऱ्या एस्.टी. स्टॅंडवर वेळी-अवेळी जाणं, एवढं सामान तिथपर्यंत गडी माणसांकरवी नेणं, चोरा-चिलटांपासून त्याची राखण करणं, एस.टी. आल्यावर लहानशा शिडीवरून अवजड बोजे टपावर चढवणं, भिजू नये म्हणून ताडपत्री बांधणं ही एकट्या दुकट्याची कामं नव्हेत.
पुढे नव्वदच्या दशकात गावोगावी हळूहळू STD, रिक्षा, रस्ते अशा सुविधा होत गेल्या. गावांचे शहरीकरण झाले आणि शहरात यातले बहुतेक जिन्नस दुकानांमध्ये उपलब्ध होऊ लागले. एस.टी. महामंडळाने तिकीटाबरोबरच लगेज चार्ज भरमसाठ वाढवला. सोयी वाढल्या पण माणसांची कष्ट करून सामान आणायची सवय हळूहळू मोडू लागली.
जिकडे-तिकडे travel lite चे बोर्ड, चाकरमान्यांच्या तोंडी "गावाक सगळा मिळता" किंवा "मुंबईला सगळं मिळतं" अशी भाषा येऊ लागली आणि एक एक बोजा कमी होत होतं शेवटी आंब्याचा बॉक्स, फणसाची गोणी आणि बाजारात मिळणारे काजू एवढंच सामान येऊ लागलं...
दोन गोष्टी मात्र अजूनपर्यंत कायम राहिल्या आहेत...
एक म्हणजे काळवंडलेला रंग,
आणि
दुसरं म्हणजे गावच्या सुट्टीतल्या रम्य आठवणी...
सगळ्या काळजात शहाळी भरलेल्या कोकणातील मित्रांना समर्पित.
'बोजे'