आडीतला आंबा

Payal Bhegade
14 May 2024
Blog

' हापूस ' हा आंब्यातील सर्व जातींचा ' बापूस ' आहे असे कोकणी माणूस अभिमानाने म्हणतो . हापूस आंब्याची चव घेण्यासाठी संपूर्ण जग प्रतिक्षा करीत असते. फळांच्या दुनियेत हापूसने आपले श्रेष्ठत्व सिध्द केल्याने या फळाचा उल्लेख ' राजा ' असा केला जातो . आपल्या जवळच्या माणसाची आपण जेवढ्या आतुरतेने वाट पहात असतो , अशीच वाट या फळांच्या राजाचीही पाहिली जाते . आकार , रंग आणि चव अशा सर्वच बाजूंनी उजव्या असणाऱ्या हापूसची तुलना आजवर अन्य कोणत्याही फळासोबत होवू शकलेली नाही . पिवळा , केशरी आणि लाल अशा रंगांचे मिश्रण असणारा हापूस रंग आणि गंधानेच प्रत्येकाला मोहात पाडतो . गंध गोडसर म्हणजे कसा असतो ? हे , हापूसचा गंध घेतल्यानंतरच लक्षात येते . हा गंध प्रथम मनात नंतर हृदयात पोहचला की , डोळे आपोआप मिटले जातात . शेवटी या गंधीत आंब्याची एक फोड रसनेवर कधी येतेय , याचीच प्रतिक्षा असते . झाडपिका हापूस आणि आढीतला हापूस यांच्या चवीतही खूप फरक असतो . तयार होत आलेलं फळ झाडावरच पिकले , तर वृक्षातील अन्नघटक याला शेवटपर्यंत मिळतात . त्यामुळे याची चव केवळ अप्रतिम असते. आढीतल्या आंब्याला पेंढ्याची उब मिळाल्यानंतर तयार होणाऱ्या गरम वातावरणातून याचा गंध बाहेर पडू लागला की , आढीतील आंबा तयार झाल्याचे संकेत मिळतात . हापूसचा गंध येवू लागल्यावर आढीतून आंबे बाहेर कधी काढले जातायत याची वाट घरातील मुलांसह सर्वच पहात असतात . प्रत्येका जवळ बालपणी खाल्लेल्या आढातील आंब्याच्या काही अविस्मरणीय आठवणी नक्कीच असतील .
कोकणात बऱ्याच ठिकाणी हापूसची खूप जूनी झाडे आहेत . या झाडांवर मोठ्या प्रमाणावर फळे लागतात . या फळांचा आकार लहान असला , तरी त्यांची चव अवीट अशी असते . या झाडांना लागही खूप मोठ्या प्रमाणावर असतो . आंब्याच्या झाडाला मोहर आल्यापासूनच याच्या गंधाला सुरुवात होते . आंम्रसखा कोकीळ आपल्या बोलांनी आंब्याच्या मोहराचा गंध पसरल्याची वर्दी देतो . आमच्या गावी असतांना आम्ही मुले मोहर आल्यापासून आंब्याच्या झाडांभोवती घिरट्या घालायला सुरुवात करायचो . छोट्या कैऱ्या धरल्यापासून आमची या झाडांजवळ गट्टी जमायची . झाडाखाली बसून तिखट – मीठाच्या साथीने कैऱ्या खाण्याची मज्जा काही औरच असते. याच कैऱ्या घरी आणल्या की , त्याची मुलांच्या दृष्टीने चव बदलते . दगडाने नेम धरुन जमिनीवर लोळवलेली कैरी अधिक चविष्ट लागते , असा मुलांचा अनुभव आहे . हळूहळू फळ मोठे होवू लागल्यानंतर त्याच्या तयार होण्याची प्रतिक्षा करणं असह्य व्हायचे . अनुभवी बागायतदार हापूसची फळे झाडावरुन उतरण्यापूर्वी फळांचा रंग पालटलाय की नाही , एखादे तरी फळ झाडावर पिकलेय का ? याचे निरिक्षण करुनच फळं काढायला सुरुवात करतो . आमच्या गावी हापूसच्या झाडाखाली आम्हांला एखादा पिकून पडलेला आंबा सापडला की , या झाडावरची फळं आता उतरवणार म्हणून आम्हांला कमालीचा आनंद व्हायचा . हातात हापूसचे झाडपिके फळ असतांना ते खाण्याचा मोह टाळून आम्ही घरी , ते फळ आमचे चुलते आबा यांना दाखवायला न्यायचो . आबांना , आंबा झाडपिका आहे हे दाखवल्यानंतर आम्ही तो फस्त करण्यास मोकळे व्हायचो . पहिल्या आंब्याची चव घेतांना जे समाधान असायचे , ते हापूसच्या चवी पेक्षा भारी असायचे .
पुढील दोन दिवसात आंबे काढण्यासाठी वाडीतील एक दोन गडी - माणसे यायची . प्रत्यक्ष आंबे काढणीच्या दिवशी आमची कमालीची धावपळ असायची. घळ काढून ठेवणे , शिकाळीसाठी पोतं बघून ठेवणे , दोरी , एक छोटा दगड याची आम्ही जय्यत तयारी ठेवायचो . शिकाळी म्हणजे घळाने आंबे काढल्यानंतर आंबे ठेवण्यासाठी तयार केलेली गोणत्याची पिशवी . याच्या टोकाला एक छोटासा दगड बांधून त्याला दोरीचा पेच देत फळांनी भरल्यानंतर ती झाडावरुन खाली सोडली जाते . झाडाला सन्मान देवून गडी झाडावर चढल्यापासून अगदी सायंकाळ पर्यंत आम्ही याच कामात गुंतलेले असायचो . घळात काढतांना एखादा आंबा खाली पडला तर , आंबा डाळ किंवा पन्हं करण्यासाठी तो वेगळा जमवून ठेवायचा . शिकाळी झाडावरुन खाली आल्यानंतर सर्व आंबे हाऱ्यात ओतून घेण्यासाठी आमच्यात चुरस लागायची . आंब्यांनी हारा भरल्यावर मन आणि डोळे अगदी तृप्त होवून जायचे . कोकणातील हीच खरी समृध्दी असे आम्हांला वाटायचे . भरलेले हारे घरी पाणछपरात रिकामे होवून परत यायचे . दिवसभर हा कार्यक्रम सुरुच असायचा . सायंकाळी पाणछपरातून तोडलेल्या फळांचा खूप छान गंध घरभर पसरायचा . याच गंधात शांत - समाधानाची झोप लागायची .
आंब्याची आमची खूप झाडे असल्याने आंबे काढण्याचा कार्यक्रम पुढे अनेक दिवस सुरुच असायचा . पहिल्या दिवशी काढलेले आंबे स्वच्छ करुन पडवीत पेंढ्यामध्ये त्याची आढी घातली जायची . काही वेळा यासाठी मोठे डालगेही वापरले जाई. रायवळ , हापूस अशा वेगवेगळ्या आढ्यांनी पडवीचा परिसर भरुन जायचा . दोन चार दिवसांनी आम्ही मुलं हळूच डालग्याच्या छिद्रातून आढीत हात घालून आंबे पिकलेत का ? याची चाचपणी करायचो . आढीत हात गेला की , हातांना होणारा उबदार स्पर्श मजेशीर भासायचा . आढीत आंबे पिकायला लागल्यानंतर आम्ही सर्व भावंड स्वतःला लागणारा आंब्याचा रस स्वतःच काढायला बसायचो . दुपारच्या जेवणापूर्वी आमचा प्रत्येकाचा स्वतंत्र आमरस तयार असायचा . आंब्याची अप्रतिम चव , खूप छान गोडी आणि रसातील दाटपणा त्यावर मस्त कणीदार तूप अशी आमची दररोजची मेजवानी सुरु असायची . दुपारी आमरस खाल्यानंतर डोळे जड होवून ओटीवर घातलेल्या जाजमावर अंग झोकून दिले , म्हणजे दोन अडीच तासांची वामकुक्षी व्हायची . आढीतील आंब्यांनी आमचे बालपण मधूर करतांना अनमोल आठवणी आम्हा भावंडांच्या मनात कायम जतन करुन ठेवण्यास मदत केली . आढीतील आंब्यांची आठवण आली की , आजही मन हळवे होते आणि हात त्या उबदार स्पर्शासाठी आसुसतात .
सर्वाधिक रस कोण खातो यासाठी आमच्या पैजा लागायच्या . आढीतील हापूस जेवढा अप्रतिम तेवढाच रायवळही . आमच्या बागेत रायवळच्या १५ ते २० प्रकारच्या विविध जाती होत्या . या रायवळची चव आणि रंग एकापेक्षा एक सरस . रायवळ आंबे आढीतून परडीत काढून खाण्यासाठी वाहत्या पाण्यावर जायचो . प्रत्येक जण पंधरा – वीस बिटक्या खाऊनच तृप्त व्हायचा . सुरुवातीला असणारा थोडासा चिक पिळून टाकला की , आतून मधून रसाचे सेवन करतांना होणारा आनंद अवर्णनीयच . रायवळ आंब्याची बाठ चाटून पुसून पांढरी करण्याची आम्हा भावंडांमध्ये स्पर्धा लागायची. बाठ पांढरी होइपर्यंत आम्ही ती कधी टाकल्याचे आठवत नाही . रायवळचा रस हापूसच्या तुलनेत पातळ असल्याने आमरसा साठी सर्वांची नेहमीच हापूसला पसंती असायची . दुपारी हापूस आमरस , संध्याकाळी वेगवेगळ्या रायवळ आंब्यांचे मनसोक्त सेवन यामुळे मे महिना म्हणजे आम्हां मुलांना पर्वणीच असायची . वर्षामागून वर्षे जात राहिली , दरवर्षी आम्ही हा आनंद लुटत राहिलो . २००० साली आमची काकू गेली आणि तेंव्हापासून आम्ही आढीतील आंब्याच्या चवीला पारखे झालो . गेल्या २० वर्षात आम्ही आंबे खूप खाल्ले , पण आंबेडच्या आढीतील आंब्याची चव या आंब्यांना नक्कीच नव्हती.

©️जे . डी . पराडकर