तरी मी मालवणी बोलुचा काय सोडूचय नाय!
१९५८-६० सालची मालवण तालुक्यातील रेवंडीच्या बाजुलाच असलेल्या ओझर गावातील हायस्कूल मधली ही घटना . वर्ग शिक्षक पेडणेकर मास्तरांनी आज वर्गात शिरताना मनातल्यामनात ठरविले होते की कसेही करुन कांबळीच्या मुलाला आपण नीट मराठी बोलायला शिकवायचे. त्याला कितीदा सांगितले तरी तो ऐकत नाही दररोज सगळ्या शिक्षकांबरोबर मालवणी भाषेतच बोलतो. तो मुलगा वर्गात मालवणीतुन प्रश्नांची उत्तरे द्यायला लागला की पेडणेकर मास्तरांना आता ह्याचे काय करायचे? ते समजत नसे. पण तो मुलगा ज्या पध्दतीने मालवणी बोलायचा ते ऐकून पेडणेकर मास्तर मनातल्यामनात मान्य करायचे की एवढे शुध्द मालवणी आपल्याला सुध्दा येत नाही . मास्तरांनी हजेरीपट समोर घेऊन एकेका विद्यार्थ्यांची नावे घेण्याच सुरुवात केली. प्रत्येक विद्यार्थी स्वतःचे नाव ऐकल्यावर पटकन मोठ्या आवाजात किंचाळून बोलल्यासारखे
"हजर !"
असे बोलायचे.
अशी हजेरीपटा वरची नावे पाहुन बोलत असताना त्यांच्या डोळ्यासमोर एक नाव आले तसे ते क्षणभर थांबून त्या विद्यार्थ्यांच्या दिशेने पाहत त्यांनी ते नाव सावकाश उच्चारले. तसे समोरुन तो विद्यार्थी मास्तरांकडे पाहत सावकाश आवाजात
" गुरुजी! मी आसय!"
असे म्हणाला. त्याचा ते बोलणे ऐकुन शांत असलेल्या त्या संपूर्ण वर्गात विद्यार्थ्यांचा मोठा हास्यकल्लोळ झाला. हा असा प्रकार दररोज चालायचा . कसेही करुन हा प्रकार आपण थांबवला पाहीजे. जशी सगळ्या विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाली तसे ते हजेरीपट बंद करुन पेडणेकर मास्तर त्या खास विद्यार्थ्यां जवळ आले, तसा तो विद्यार्थी ताबडतोब स्वतःच्या जागेवर उभा राहिला व मास्तर काय बोलतात याची वाट पाहु लागला. तसे ते काय बोलणार हे त्या विद्यार्थ्यांस माहित होते. आणि अचानक पेडणेकरांच्या तोंडुन खडसावल्या सारखा मोठा आवाज बाहेर पडला.
" तुला कितीवेळा सांगितले,की तु वर्गात मालवणी बोलु नकोस ! शुध्द बोल ! असे मी तुला हज्जारदा सांगितले तरी तु ऐकत नाहीस . आज शाळा सुटेपर्यंत तु बाकावर उभा रहा!"
अशी शिक्षा फरमावून पेडणेकर मास्तर फळ्याकडे जाण्यासाठी वळले तसा तो विद्यार्थी बाकावर उभा राहिला व मोठ्या आवाजात पाठमोर्या मास्तरांच्या दिशेन म्हणाला.
"मास्तर !!!"
ते अधिकारवाणी शब्दातले बोल ऐकून मास्तर गर्रकन वळले व त्या विद्यार्थ्यांच्या दिशेने पाहिले. तसे तो विद्यार्थी एखाद्या नटा सम्राटाच्या आवेषात म्हणाला.
" मी मालवणी बोललय म्हणून तुम्ही माका आज बाकावर उभो केल्यात ! तरी मी मालवणी बोलुचा काय सोडूचय नाय . मास्तरांनो तुमका मी एकच सांगतय , मी मालवणी बोललय म्हणून तुम्ही माका आज शिक्षा केल्यात , पण एक दिवस मी मालवणीचा नाव सातासमुद्राकडे पोचवलय नाय तर रेवंडीच्या कांबळीचा नाव सांगुचय नाय!"
ह्या विद्यार्थ्यांचे नाव होते मच्छिंद्र कांब॓ळी ! मालवणी भाषेवर व संस्कृतीवर जीवापाड प्रेम करणार्या या मालवण तालुक्यातील रेवंडी गावात जन्मलेल्या मच्छिंद्र कांबळी यांनी पुढे मुंबईत जाऊन आपल्या कलागुणांचा अविष्कार दाखवत गंगाराम गवाणकरांचे 'वस्त्रहरण' नाटक घेऊन ते सरळ लंडनला पोहोचले व पेडणेकर मास्तरांसमोर मारलेली बढाई काही वर्षातच खरी करुन दाखवली. विषेश म्हणजे सातासमुद्रापार सादर होणार्या पहिल्या मालवणी नाटकाचा मान 'वस्त्रहरण' ला मिळाला. मच्छिंद्र कांबळी यांच्या अष्टपैलुत्व दाखविणाऱ्या अभिनयामुळे गाजलेल्या या नाटकाने केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर नावलौकिक मिळवल्याने या नाटकाचे सगळीकडे मिळून ५००० च्या वर प्रयोग सादर झाले.
रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी
संदर्भ: सिंधुरत्ने , प्रा.डाँ. बाळकृष्ण लळीत
चित्र: गुगल
तरी मी मालवणी बोलुचा काय सोडूचय नाय!