आपण बरेचदा महाराष्ट्रातल्या एका समुद्रकिनारी होणाऱ्या कासव महोत्सवा बद्दल कुठे ना कुठे वाचलं अथवा ऐकलं असेल. चला तर जाणून घेऊयात, हा अनोखा कासव महोत्सव नक्की आहे तरी काय आणि तो कुठे साजरा केला जातो.
कुठे साजरा होतो हा अनोखा कासव महोत्सव?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात असणाऱ्या वेळास या छोट्या टुमदार गावातील समुद्रकिनाऱ्यावर हा कासव महोत्सव साजरा केला जातो. ज्याला महाराष्ट्रासह देशभरातून निसर्गप्रेमी हजेरी लावतात.
वेळास हे गाव मुंबईपासून २०० किमी आणि पुण्यापासून १८० किमी अंतरावर आहे. वेळास या गावाला दीड किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
कासव महोत्सव कधीपासून साजरा केला जातो? कासव महोत्सवाचा इतिहास :-
फार पूर्वीपासून वेळास इथल्या समुद्रकिनारी समुद्री कासवं साधारणतः दिवाळीच्या नंतर अंडी घालण्यासाठी येत. पण इथले स्थानिक लोक एकतर ही अंडी खाण्यासाठी चोरून नेत किंवा मग बैलांना खाऊ घालत नाहीतर ती विकून पैसे कमवत. कासवाच्या मादीने अंडी घालायला सुरुवात केली की स्थानिक लोक गुपचूपपणे ही अंडी चोरून नेत. नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत इथे बऱ्याच जणांचा हाच उद्योग सुरू होता. या गोष्टीचा ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) या कासवांच्या संख्येवर लक्षणीय परिणाम झाला.
सन २००२ मध्ये चिपळूण इथल्या ‘सह्याद्री निसर्ग मित्र‘ संस्थेचे कार्यकर्ते वेळास इथे समुद्री गरुडांचा व त्यांच्या घरट्याचा अभ्यास करण्यासाठी आले होते. तेव्हा किनाऱ्यावर फिरताना त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली. त्यांनी गावात चौकशी केली असता त्यांना एका स्थानिकाकडून या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती मिळाली. या कासवांचे संवर्धन होणे गरजेचे आहे ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी सरपंचांची भेट घेत गावातल्या ग्रामस्थांची एक सभा घेतली. या कासवांचे संवर्धन, संरक्षण कसे गरजेचे आहे याबद्दल त्यांनी ग्रामस्थांना पटवुन दिले. त्यांनतर त्यांनी वनविभागाच्या मदतीने येथे संशोधन कार्यास सुरुवात केली. वेळास बरोबरच लगतच्या किनाऱ्यांवर ज्या ज्या ठिकाणी कासवांची अंडी सापडली त्याठिकाणी माणसे नेमून कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणाच्या कामास सुरुवात केली गेली. Velas Turtle Festival Kokan Maharashtra Marathi 2024
यानंतर संस्थेच्या, वनविभागाच्या आणि ग्रामस्थांच्या बैठकीत सन २००६ साली पहिला ‘कासव महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्या खाण्याच्या सुविधांचे नियोजन करण्यात आले. आणि अशा रितीने २००६ साली पहिला ‘कासव महोत्सव’ साजरा झाला
२०१५ मध्ये दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातल्या किनाऱ्यावर देखील कासव महोत्सवास सुरुवात करण्यात आली.
कसा साजरा होतो कासव महोत्सव?
मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या कासव महोत्सवादरम्यानच्या काळात किनाऱ्यावर अनेक कासव अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने सरपटताना बघणे हे दृश्य मन मोहित करणारे असते. हाच दुर्मिळ अनुभव घेण्याकरिता अनेक पर्यटक, अभ्यासक तसेच छायाचित्रकार वेळास समुद्रकिनाऱ्यावर हजेरी लावतात. ही इवलीशी पिल्ले त्यांच्या आयुष्यातील पहिली पाउलं टाकताना बघणे ही एक दुर्मिळ पर्वणी असते.
जेव्हा कासव त्यांच्या अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात त्याच वेळी कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवामध्ये कासवांना समुद्रात सोडण्याची ही संपूर्ण प्रकिया पर्यटकांना प्रत्यक्ष पाहायला, अनुभवायला मिळते.
आधी तीन, सात दिवस चालणारा हा महोत्सव पहिलं घरटं उघडण्यापासून ते शेवटच्या घरट्यापर्यंत म्हणजे दीड दोन महिन्यांपर्यंत हा महोत्सव साजरा करण्यात येतो. Velas Turtle Festival Kokan Maharashtra Marathi 2024
वनविभागाने आता या कामासाठी ठराविक माणसं देखील नेमली असून त्यांना मानधनही देण्यात येतं.
स्थानिक लोकांच्या सहभागाने कासवांचे संवर्धन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. गावात ‘कासव मित्र मंडळाची’ स्थापना देखील करण्यात आली आहे.
वेळास गावात हॉटेल जरी नसले तरी होमस्टे ची सुविधा येथे आहे. गावाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर कासव महोत्सवावर अवलंबून आहे. एकेकाळी कोणाला माहितीही नसलेल्या या गावाचं नाव आज जागतिक नकाशावर झळकत आहे. २००६ च्या पहिल्या कासव महोत्सवात १२५ पर्यटकांनी इथे भेट दिली होती तर आजघडीला हजारो पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. गावाची ही ओळख निर्माण करण्यात सह्याद्री मित्र मंडळ, वनविभाग आणि स्थानिकांचा सहभाग उल्लेखनीय आहे.
कासव महोत्सव बघण्यासाठी सर्वोत्तम काळ :- वेळास कासव महोत्सव पाहण्यासाठी मार्च ते एप्रिल महिना हा सर्वोत्तम कालावधी आहे.
Olive Ridley कासवांबद्दल माहिती :-
उष्ण कटिबंध किनारे आणि दलदलीच्या प्रदेशात वाढणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचं वजन साधारणपणे ५०-६० किलोग्रॅम आणि लांबी ६० ते ७० सेमी असते. या कासवांच्या विणीचा हंगाम प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च महिन्याचा असतो. कासव मादी रात्रीच्या वेळी अंडी घालते. एका वेळेस साधारणपणे १०० ते २०० अंडी घातली जातात. ४० ते ५५ दिवसांमध्ये ही अंडी नैसर्गिकरीत्या उबतात.
वेळास कासव महोत्सव २०२४