रत्नागिरी तालुक्यातील रनपार खाडी गाळात रुतल्यामुळे मच्छीमारांना मच्छीमारीसाठी समुद्रात जाणे अवघड झाले आहे. शासनाने खाडीतील गाळ उपसावा, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.
पूर्वीच्या काळी वाहतुकीची सोय नव्हती, तेव्हा रनपार बंदरातून जहाजांची ये-जात होती. अनेक गलबते खाडीमार्गे पावसपर्यंत होत होती, परंतु दिवसेंदिवस होणारी जंगलतोड लक्षात घेता, त्या माध्यमातून येणारी माती व दगड खाडीत गेल्याने गाळाचे प्रमाण वाढले. त्यामुळे या भागातून येणारी गलबते कालांतराने बंद झाली. याच खाडीतून मच्छीमार समुद्राकडे जात असत, परंतु गाळ वाढत चालल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी भरतीची वाट पाहावी लागते.
यासंदर्भात पावसचे माजी सरपंच यांनी शासनाकडे गाळ उपसणे संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला होता, परंतु त्याकडे अद्यापही कुणीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे मच्छीमारांना आपला व्यवसाय करणे अडचणीचे ठरत आहे.
गाळ काढण्याची मागणी
दरम्यान, या परिसरात पावस व गोळप मिळून सुमारे अडीचशे नौका आहेत. मात्र, त्यांना समुद्रात जाताना व येताना भरतीची वाट पाहावी लागते. त्यामुळे त्याचा व्यवसायावर विपरित परिणाम होतो. खाडीच्या मुखाशी असलेला गाळ तातडीने काढावा व खाडी गाळमुक्त करावी, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
रत्नागिरी तालुक्यातील रनपार खाडी गाळात