कोकणातल घर म्हणजे लगेच डोळ्यासमोर कौलारू घर, अंगण, आंगणातल तुळशी वृंदावन,आजूबाजूला डोंगर असे सुंदर दृश्य उभे राहते. अगदी तसच आहे आमचं कोकणातल नवीन घर. गेल्यावर्षी उन्हाळ्यात 36 वर्षांपूर्वीच्या जुन्या घराच्याच ठिकाणी बांधल आहे .यावर्षी त्याचे रंगकाम करून पूर्ण झाले.
एक स्वप्न होत नवीन घर बांधून त्यामध्ये सगळ्याचा आवडता झोपाळा असावा आणि ते स्वप्न सत्यात उतरल याचा खूप आनंद होतो आहे.
वयाची पहिली 16 वर्ष खेड्यात गेली आहेत. सगळ बालपण खेड्यात गेल आहे. त्यामुळे एक प्रचंड ओढ आहे खेड्याची आणि म्हणूनच हे घर बांधले आहे कौलारू , जांभ्या दगडांच प्लास्टर न करता. या घरात एक वेगळ सुख आहे, त्याची तुलना इतर कोणत्या सुखाशी नाही करता येत. या घरात पाऊल टाकल्यावर एक वेगळच मानसिक समाधान आणि एक सुखद आनंद मिळतो.
या घराच स्वप्न आमच्या पेक्षा आमच्या आईने बघितले होते आणि ते आम्ही सफल करण्यात थोडेतरी सफल झालो म्हणायचे. तिचा या घरातील वावर म्हणजे आमच्यासाठी स्वर्गसुख आहे. बाहेरच्या व्हरांड्यात झोपाळ्यावर बसून तिने बनवलेल्या चहाचा आस्वाद घेण्यात एक वेगळीच मज्जा आहे.
आता ती 63 वर्षाची आहे पण तिचा हे घर उभे करण्यात खूप मोठा वाटा आहे त्याची तुलना घर बांधण्यासाठी लागलेल्या पैशाशी नाही करता यायची. अजून पण मुंबईतून गावी गेल्यावर ती काही ना काही घराशी निगडित असणारी काम जशी झाड लावण, अंगणाची सारवासारव, साफसफाई इत्यादी करण्यात बिझी असते.
म्हणूनच या घराचे नाव पण " वात्सल्य " ठेवल आहे.
आता या लॉक डाउन च्या काळात एक जाणीव प्रकर्षाने झाली की गावी घर असणे किती गरजेचे आहे.
आता प्रत्येकाने या शहरातील दगदगीच्या आयुष्यात न राहता गावी राहून उदरनिर्वाहाच साधन शोधल पाहिजे. जिथे तुम्हाला शारीरिक स्वास्थ्यासहित मानसिक स्वास्थ्य पण मिळेल. या लॉक डाउन ने सर्वाना याची नक्कीच जाणीव करून दिली आहे.
प्रेमाचा वर्षाव होई अशी
आमुची कौलारू माया,
अन् केवड्याचा सुगंध फिका पडे
अशी आमुच्या वात्सल्याची छाया...
अमोल चव्हाण,
स्वर्गाहुन सुंदर आपलं कोकण