भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे

Payal Bhegade
25 Apr 2023
Blog

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे

भारत रत्न महामाहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्या कार्याला ही सारी पार्श्वभूमी होती. काण्यांचे मूळ गाव मुरडे ( रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात ) सदाशिवराव काणे हे त्यांचे पणजोबा. ते पंचांगकर्ते होते. पणजोबांची तीन अपत्ये, शंकर, लक्ष्मण, रघुनाथ. शंकर हे काण्यांचे आजोबा. ते वैदिक पंडित होते व भिक्षुकीवर उपजीविका चालवायचे. याखेरीज ते ज्योतिषी आणि निष्णात वैद्यही होते. त्यांनाही तीनच अपत्ये, भास्कर, केदार, वामन. वामनराव हे काण्यांचे वडील. वामनरावांना संस्कृतचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. ऋग्वेद त्यांना जवळपास मुखोद्गत होतं. उपनिषदे आणि भगवद्गीता यांचाही त्यांना सूक्ष्म अभ्यास होता. सोबतच उपजीविकेचे साधन म्हणून वडील त्यांना भिक्षुकीचे पाठ देत होते. पण त्यांना भिक्षुकी पसंत नसल्यामुळे ते वयाच्या अठराव्या वर्षी पुण्याला गेले आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. पुढे वकिलीच्या परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १८७८ पासून दापोली न्यायालयात तालुका वकील म्हणून काम करू लागले. त्या न्यायालयात इंग्रजीतून काम करणारे ते पहिले वकील होते. त्यापूर्वी सर्व वकील मराठीतून कामकाज चालवित असत.
वामनरावांना तीन मुली व सहा मुले अशी एकूण नऊ अपत्ये. त्यातील दुसरे अपत्य हे पांडुरंग वामन काणे. चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०२ म्हणजेच शुक्रवार दिनांक ७ मे १८८० ला पेढे उर्फ परशुराम या आजोळ गावी त्यांचा जन्म झाला. पेढे हे गाव चिपळूण तालुक्यात आहे. काणे यांचे चितळे आजोबा म्हणजेच आईचे वडील हेही वैदिक पंडित आणि वैद्य होते. त्यामुळे संस्कृत विद्येचे बाळकडू काणे यांना दोन्ही कुलांकडून मिळाले होते म्हणायला हरकत नाही. काणे यांचे प्रारंभिक शिक्षण वडिलांजवळचं झाले. ते एकपाठी होते. त्यांची स्मरणशक्तीही दांडगी होती. अगदी लहान वयातच त्यांना अमरकोशाचे ४०० श्लोक मुखोद्गत होते. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १८९१ साली दापोलीच्या ए.जी हायस्कूलमध्ये (त्यावेळी एस.पी.जी मिशन स्कूल) शालेय शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि तिथूनच बॉम्बे विद्यापीठाची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांची वाचनाची भूक जबरदस्त होती. त्यांचे अवांतर वाचन भरपूर चाले कारण वर्गात शिक्षकांकडून एकदा जे ऐकले ते त्यांना लगेच पाठ होत असे.
नंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईस गेले. विल्सन कॉलेज मुंबई येथून ते १९०१ मध्ये प्रथम क्रमांकाने बी.ए. उत्तीर्ण झाले. पदवी शिक्षणासाठी त्यांना संस्कृत विषयासाठी त्यावेळची प्रतिष्ठित भाऊ दाजी शिष्यवृत्ती मिळाली होती. १९०२ मध्ये ते एल.एल.बी झाले आणि १९०३ मध्ये झाला वेदांत पारितोषिकासह एम.ए.झाले. नंतर ते शासकीय हायस्कूल, रत्नागिरी येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे ते ३ वर्ष होते. तेथून १९०७ मध्ये ते एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथे संस्कृतचे शिक्षक म्हणून रुजू झाले. १९०९ ते १९११ पर्यंत ते एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक होते. या दोन वर्षातच त्यांनी हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतमधून दोन पुस्तके लिहली. आर्थिक गरज म्हणून इतरही अनेक शैक्षणिक पुस्तके प्रकशित केली. त्यांचा अध्यापन कार्याबरोबरच वकिली व्यवसायही चालू होता.
१९१२ मध्ये हिंदू आणि मुस्लिम लॉ या विषयात एल.एल.एम ची परीक्षा त्यांनी दिली. १९११-१९१८ या काळामध्ये जवळपास दरवर्षी एक याप्रमाणे त्यांनी संस्कृत पुस्तके संपादित करून प्रकाशित केली. शिवाय कादंबरीचे तीन भाग, हर्षचरिताचे दोन भाग आणि उत्तमरामचरित्र अशी त्यांची अजून सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्याच काळात त्यांनी कायद्याचे खासगी शिकवणी वर्गही घेतले. १९१७ ते १९२३ अशी सहा वर्ष त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याचे प्रोफेसर म्हणून नोकरी केली. १९२४- १९२६ मध्ये तीन मुद्रित प्रती आणि आठ हस्तलिखितांचा आधार घेऊन व्यवहारमयूखची सटीप आवृत्ती तयार केली आणि भांडारकर संशोधन संस्थेने ती प्रकाशित केली. व्यवहारमयूखच्या आवृत्तीकरता माहिती गोळा करत असताना त्यांचे धर्मशास्त्राचे चिंतन जसजसे वाढत गेले, त्यांच्या लक्षात आले की, ह्या विषयाची माहिती छोट्या प्रस्तावनेत समाविष्ट केल्याने त्या विषयाच्या समृध्दत्वाची आणि प्राचीनकाळची समाजरचना, तुलनात्मक न्यायदान पद्धती आणि ज्ञानाच्या इतर शाखा ह्यांच्या दृष्टीने धर्मशास्त्राच्या इतिहासाचे महत्त्व ह्याची पुरेशी कल्पना येणार नाही. तेव्हा त्यांनी धर्मशास्त्राचा इतिहास पूर्णपणे स्वतंत्र रीतीने प्रसिद्धकरण्याचा निश्चय केला. पुढे १९२४ ला सुरु झालेला ज्ञानयज्ञ त्यांच्या १९७२ मध्ये झालेल्या निधनापर्यंत अखंड सुरु होता. त्यांनी करून ठेवलेले काम ५१ वर्षांनी म्हणजे १९७५ मध्ये धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या पाचव्या खंडाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानंतर थांबले. काणेंना लहानपणापासून अल्सरचे दुखणे होते. अनेक डॉक्टर-वैद्यांना दाखवून देखील त्यावर इलाज मिळाला नव्हता. शेवट त्यांनीच अनुमाने काढून स्वतःला पथ्ये घातली आणि काही उपाय शोधले होते. परंतु वाचा पंचेचाळीशीनंतर आत्महत्येचा विचार मनाला चाटवून जाईपर्यंत त्यांचे दुखणे वाढले होते, तरीही धर्मशास्त्राच्या इतिहासाचे अवघड व प्रचंड काम त्यांनी पूर्णत्वाकडे नेले.
‘धर्मशास्त्राचा इतिहास’ लेखन काळात भारतीय समाजात दोन प्रकारचे मतप्रवाह होते. काही लोकांच्या मते आपल्या सर्व प्राचीन रूढी कालबाह्य झालेल्या असून त्या पूर्णपणे टाकून देऊन सामाजिक सुधारणा तातडीने आमलात आणली पाहिजे आणि दुसरे काही असे मानत होते की आपल्या धर्मात सांगितलेल्या सर्व गोष्टी आजही इष्ट आहेत. त्यांचे निष्ठेने पालन केले पाहिजे. परंतु काणे मात्र समन्वयवादी होते. जुने ते सर्व सोनेही नाही आणि टाकून देण्याजोगे पण नाही असे ते मानत. प्राचीन कालचा इतिहास सांगताना ते वर्तमानाला जराही विसरत नाही आणि भविष्याकडेही दूरदृष्टीने पाहतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीत उमटणाऱ्या समस्या, त्यावर मात करण्यासाठी उपाय आणि भारतीय समाजाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आवश्यक असलेले बदल त्यांनी या ग्रंथांतून ठोसपणे मांडले आहे. धर्मशास्त्रावरील कोणत्याही विवादामध्ये विदेशी तसेच भारतीय विद्वान या ग्रंथातील मताला प्रमाण मानतात एवढा हा ग्रंथ विद्वत्तापूर्वक लिहिला गेला आहे. या ग्रंथाचे भारतीय समाजव्यवस्थेतील स्थान लक्षात घेऊन भारत सरकारने निव्वळ या ग्रंथनिर्मितीसाठी १९६३ मध्ये त्यांना ‘भारत रत्न’ हा पुरस्कार प्रदान केला. या ग्रंथामुळे अनेक धार्मिकवाद सोडवले गेले. हिस्टरी ऑफ पोएटिक्स हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ. धर्मशास्त्र आणि काव्यशास्त्र याखेरीज त्यांनी प्राचीन ग्रहज्योतिष आणि फलज्योतिष, भारत-महाराष्ट्र-कोकण-विदर्भ सांस्कृतिक इतिहास आणि भूगोल, मराठी भाषा, तिचे व्याकरण, परिभाषा आणि शुद्धलेखन, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, नाट्यशास्त्र अशा अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या नावावर एकूण १९८ प्रकाशने आहेत. त्यात ३९ ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय व परीक्षणे आहेत