अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचा हंगाम लांबणार असल्याची शक्यता

Payal Bhegade
13 Dec 2023
Blog

पालघर जिल्ह्यात २६ ते २७ नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडून भातपिकाचे नुकसान झाले. पावसामुळे फळ बागायतीवर विशेषतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबरमध्ये झाडे मोहरण्यास सुरुवात होतात. त्याला उशीर झाल्यास जिल्ह्यात १२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवड असल्याने आगामी हंगामावर परिणाम होण्याची भीती आहे.

पालघर, डहाणू, तलासरी, वसई या किनारी तालुक्यासह विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या समुद्रसपाटीपासून लांब असलेल्या तालुक्यांत आंबा बागायतदार शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन चांगला नफा मिळवतात. यंदा मान्सून लवकर माघारी परतल्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीची चाहूल लागून हळूहळू प्रमाण वाढत होते. त्यामुळे डिसेंबरमध्ये आंब्याची झाडे मोहरण्यास सुरुवात झाली असती. त्याकरिता बागायतीत मशागतीची कामे, फवारणी हाती घेतली होती, असे बागायतदार सांगतात.

थंडीत मोहोर येण्यास सुरुवात
- आंब्याच्या झाडांना आता पालवी फुटली आहे. आता थंडीत मोहर येण्यास सुरुवात होणार होती; परंतु अवकाळी पावसामुळे आंब्याला मोहर येण्याचा कालावधी पुढे सरकून हंगाम लांबण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. त्याचा जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या आर्थिकतेवर परिणाम होऊ शकतो.
- अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने आंब्याच्या पालवीवर फुलकिडे, तुडतुडे, थ्रीप्स, पिठ्या ढेकूण आदी किडींचा तसेच करपा, भुरी यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

कीटकनाशकांचा वापर करण्याचा कृषी विभागाचा सल्ला
- तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन ९ मिली १० लिटर पाण्यात मिसळून तसेच भुरी रोगासाठी हेक्झाकोनॅझोल ५ मिली १० लिटर पाण्यात आणि करपा रोगासाठी कार्बनडेझिम पावडर १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- अवकाळी पावसाने साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, कीडरोगांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशक तसेच बुरशीनाशकांचा वापर करण्याचा कृषी सल्ला देण्यात आला आहे.