भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या सागरी संवर्धनाच्या शर्यतीत कासव एकटंच जिंकलेलं नाही. गेल्या वीस वर्षांत कोकण किनाऱ्यावरच्या झपाटलेल्या कार्यकर्त्यांना, धडपडणाऱ्या गावकऱ्यांना आणि त्याची गुपितं शोधणाऱ्या संशोधकांना कासवाने ही अत्यंत कठीण अशी शर्यत जिंकून दिली आहे!
गुहागरच्या किनाऱ्यावरची एक नीरव, शांत रात्र... दिवसभराच्या शूटिंग शेड्युलनंतर थकलेले आम्ही पोफळीच्या बागेतल्या एका कौलारू घरात नुकतेच विसावलो होतो...
याच गुहागरच्या किनाऱ्यावरून आज दोन ऑलिव्ह रिडले कासविणींना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून समुद्रात सोडलं होतं. तिथल्याच एका नदीवरून एकीचं नाव ठेवलं होतं ‘रेवा’ आणि दुसरीचं ‘लक्ष्मी’. संध्याकाळी सूर्यास्ताच्या रम्य वातावरणात समुद्रात मिसळून गेलेली रेवा आणि लक्ष्मी डोळ्यासमोरून हटत नव्हत्या...
ते कासवांचे विणीचे दिवस होते... कोकणातल्या किनाऱ्यावर कासवांच्या जन्मसोहळ्याचं नाट्य रंगत होतं...
आत्ता, अगदी आत्ताच्या क्षणाला गुहागरच्या किनाऱ्यावर आणि समुद्रात कायकाय घडत असेल? या विचारात असताना मॅनग्रोव्ह सेलचे संशोधक मानस मांजरेकर यांचा फोन येतो...
‘आणखी एक कासव आलं आहे ... लगेच निघून या.’
मी आणि माझा सहकारी कॅमेरामन प्रसाद ठकार होतो तसेच पुन्हा एकदा किनाऱ्याकडे धाव घेतो... नारळी, पोफळीच्या बागेतून अंदाजाने वाट काढत किनाऱ्यावर पोहोचतो...
घरटं करणारी कासवीण :-
गुहागरच्या त्या अंधाऱ्या किनाऱ्यावर संशोधक आणि कार्यकर्त्यांची गस्त सुरूच असते. तिथेच थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूच्या किनाऱ्यावरचा थरार आम्ही ‘याची देही याची डोळा’ पाहतो...!
एक कासवीण तिच्या वल्ह्यासारख्या पायांनी घरट्याचा खड्डा बुजवत असते... समुद्रापासून त्या जागेपर्यंत त्या कासविणीच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या... आता किनाऱ्यावरच्या खड्ड्यात तिची अंडी घालून झाली होती.
कासवीण जेव्हा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते तेव्हा ती विलक्षण तंद्रीत असते. अंडी घालताना तिच्या डोळ्यांतून पाणी झरत असतं. तिची ती भावमुद्रा खरंच अनुभवण्यासारखी असते...
घरट्याचा खड्डा बुजवून झाल्यावर आता पुन्हा तिला समुद्रात जायचं होतं. पण मानस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला तसंच थोपवून धरलं. कारण याही कासविणीला सॅटेलाइट ट्रान्समीटर लावायचा होता.
समुद्रापासून दूर फक्त पिल्लांना जन्म देण्यासाठी किनाऱ्यावर आलेल्या या कासविणीची उलघाल मला पाहवेना... पण एका ऐतिहासिक प्रयोगासाठी तिला एक रात्र किनाऱ्यावरच थांबावं लागणार होतं.
असा लावला ट्रान्समीटर :-
आंजर्ल्याहून खास इथे आलेले कासव संवर्धन कार्यकर्ते अभिनव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या कासविणीला उचललं आणि पाण्याच्या टाकीत घालून टेम्पोने सुरूच्या बनातल्या हॅचरीमध्ये आणलं. समुद्रात जाण्याची धडपड करणारी ती कासवीण आता थोडी शांत झाली होती. आता रात्रभर ती गुहागरच्या किनाऱ्यावरच विसावणार होती...
दुसऱ्या दिवशी पहाटेच डॉ. सुरेशकुमार यांनी या कासविणीला सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्याचं काम हाती घेतलं. डॉ. सुरेशकुमार आणि त्यांचे सहकारी या कासविणीला अंघोळ घालत होते तेव्हा पाण्याच्या स्पर्शानं ती सुखावत होती... मी हळूच तिच्या पाठीला हात लावून गोंजारलं तर आक्रसून गेली एकदम.
डॉ. सुरेशकुमार सर म्हणाले, अगदी सांभाळून. अस्वस्थ आहे ती... आपल्याला वाटतं, तिची पाठ टणक आहे पण सगळ्यात जास्त संवेदना तिच्या पाठीलाच जाणवतात!
कासविणीने शिकवलेला संयमाचा धडा :-
समुद्रकिनाऱ्यावर आलेलं ऑलिव्ह रिडले कासव मी पहिल्यांदाच बघत होते. करुण दिसणारे तिचे डोळे, पाठीवरच्या कवचातून हळूहळू फिरणारी मान, वाळूमध्ये सारखे हलणारे तिचे वल्ह्यासारखे पाय आणि समुद्रात जाण्याची तिची धडपड... तरीही खूप धीरानं घेत होती ती सगळं.
सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्याचं काम चार-पाच तास चाललं. तोपर्यंत तिनं हे सारं निमूटपणे करू दिलं.
‘असं अचानक आपल्या पाठीवर हे काय आलं आहे याचा त्रास होत नाही का तिला सर...?’ मी न राहवून विचारलं.
नाही कसा? तिला चांगलंच जाणवतं आहे. पण हा ट्रान्समीटर अगदी हलका आहे. तिच्या एकूण वजनाच्या पाच टक्के पण नाही. हे करताना तिच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतोय आम्ही.’ सुरेशकुमार सर त्यांचं काम करत करत सांगत होते.
या ट्रान्समीटरला लावलेल्या गोंदामुळे त्यावर आणखी जलचर चिकटू नयेत म्हणून सरांनी त्यावर एक निळ्या रंगाचा लेप लावला.
त्या निळ्या रंगामुळे या ट्रान्समीटरचं वजन जास्त वाटत होतं पण ट्रान्समीटर लावून झाल्यावर या कासविणीच्या हालचालीत किंवा वर्तनात काहीच फरक दिसत नव्हता. आता तिला लगेच समुद्रात जायचं होतं...
कासव समुद्रात सोडण्याचा सोहळा :-
गुहागरच्या चमचमत्या किनाऱ्यावर सकाळी ट्रान्समीटर लावलेल्या कासविणीला समुद्रात सोडण्याचा सोहळा झाला. वनखात्याचे कर्मचारी, मॅनग्रोव्ह सेलचे कार्यकर्ते, गावकरी आणि लहान मुलांच्या साक्षीने या कासविणीचं नामकरण झालं... ‘वनश्री’!
‘हॅपी जर्नी डिअर... गो सेफली...’ वनश्रीला निरोप देताना मला फार हायसं वाटत होतं. तिला अखेर समुद्रात जायला मिळालं म्हणून सगळेच खूश होते.
पाठीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर घेऊन वनश्री उसळत्या लाटांमध्ये शिरली. लाटांवर हिंदकळताना ती पाणबुडीसारखी भासत होती. आम्ही एकटक तिच्याकडे पाहात होतो...
‘सागरी कासवं मोठी दर्यावर्दी असतात. ती महासागरही पार करतात...’ डॉ. सुरेशकुमार अथांग समुद्राकडे पाहात म्हणाले.
‘आता थोड्या वेळाने वनश्री सिग्नल देऊ लागेल. खरं काम तर आता सुरू झालं आहे!’ त्यांनी सगळ्यांनाच भानावर आणलं.
डॉ. सुरेशकुमार हे डेहराडूनच्या ‘वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे संशोधक आहेत. याआधी त्यांनी ओडिशाच्या किनाऱ्यावर पासष्ट कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले आहेत. त्यामुळेच कोकण किनाऱ्यावरच्या कासवांना ट्रान्समीटर बसवण्यासाठी राज्य वनखात्याच्या मॅनग्रोव्ह सेलनं त्यांना पाचारण केलं होतं.
कोकणातला ऐतिहासिक प्रयोग :-
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वन खात्याच्या मॅनग्रोव्ह सेलने एकत्रितरित्या हा ऐतिहासिक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांत सात कासविणींना टॅगिंग करण्यात आलं.
पहिल्या टप्प्यात टॅगिंग केलेल्या पाच कासविणी सुरुवातीला चांगल्या प्रकारे सिग्नल देत होत्या. काही कासविणींनी उत्तरेचा मार्ग घेतला तर काही दक्षिणेकडे अरबी समुद्रात फिरत होत्या. नंतर मात्र एकेक करत त्यांचे सिग्नल बंद पडले.
याचं मुख्य कारण त्यांच्या ट्रान्समीटरची बॅटरी संपली हे असावं, असं डॉ. सुरेशकुमार यांना वाटतं. पण काही कासविणींचं समुद्रात काही बरंवाईट झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही...
पण या प्रयोगात अशा दुर्घटना घडूनही संशोधकांनी हार मानली नाही.
बागेश्रीचा पाच हजार किलोमीटर प्रवास :-
याच संशोधकांनी दुसऱ्या टप्प्यात गुहागरलाच आणखी दोन कासविणींना ट्रान्समीटर बसवले आणि मग विक्रम घडला. गुहागरला टॅग केलेल्या बागेश्री कासविणीने कोकण किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत प्रवास केला. अवघ्या सात महिन्यांत तिने तब्बल पाच हजार किलोमीटरचा पल्ला गाठला!
बागेश्री गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी मार्गे श्रीलंकेला जाऊन पोहोचली. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत ती बराच काळ होती. नंतर तिने बंगालच्या उपसागराचा मार्ग धरला... आता ती बंगालच्या उपसागरात आहे आणि नियमितपणे तिच्या प्रवासाचे सिग्नल देते आहे. हा लेख लिहीत होते तेव्हा ‘गुहा’ अरबी समुद्रात होती.
ही कासवं सागरी प्रवाहांच्या आधारे समुद्रात मुशाफिरी करतात. असे प्रवाह हे त्यांचे सागरी महामार्गच आहेत. कासवांना खाद्याच्या शोधातही अशी भटकंती करावी लागते.
बागेश्रीचा जन्म गुहागरचा?
बागेश्री जर बंगालच्या उपसागरात जाऊ शकते तर ती तिथे अंडी का घालत नाही? ती पूर्वेकडून एवढ्या लांब पश्चिम किनाऱ्यावर, गुहागरला अंडी घालण्यासाठी का आली असावी?
‘याचा अर्थ बागेश्रीचा जन्म गुहागरच्या किनाऱ्यावर झाला असावा!’ डॉ. सुरेशकुमार बागेश्रीबद्दलचं हे रहस्य सांगतात तेव्हा खरंच अचंबित व्हायला होतं.
ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म ज्या किनाऱ्यावर होतो त्या किनाऱ्याची नोंद त्यांच्या मेंदूमध्ये घेतली जाते. किनाऱ्यावरून समुद्रात जाताना त्या किनाऱ्याचा ठसा त्यांच्या मेंदूमध्ये इम्प्रिंट होतो. जेव्हा ती मोठी होतात तेव्हाही ती त्याच किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात, अशीही संशोधकांची धारणा आहे.
‘ट्रान्समीटर लावलेल्या बागेश्री आणि गुहा आता पुढच्या हंगामात गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येऊ शकतात का?’
डॉ. सुरेशकुमार यांच्या मते, ‘ही शक्यता नक्कीच आहे. पण मेटिंगसाठी जोडीदार मिळाला आणि प्रजननाच्या दृष्टीने सगळं काही व्यवस्थित झालं तरच त्या पुन्हा किनाऱ्यावर येतील. त्यांच्या ट्रान्समीटरने वर्षभर नीट काम केलं तर तो मार्ग आपल्याला कळणारच आहे.’
सावनी दोनदा आली किनाऱ्यावर :-
याआधी पहिल्या टप्प्यात सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या ‘सावनी’ने संशोधकांना एक आश्चर्याचा धक्का दिला होता. आंजर्ल्याला टॅग केलेली सावनी त्याच हंगामात पुन्हा एकदा किनाऱ्यावर आली होती.
एकाच हंगामात तिने दोनदा अंडी घातली आणि त्यासाठी तिने आंजर्ल्याच्या जवळचाच केळशीचा किनारा निवडला. यावेळी तिच्या पाठीवरचा सॅटेलाइट ट्रान्समीटरही व्यवस्थित काम करत होता. सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेला असूनही या कासवांच्या प्रजननात कोणताही अडथळा येत नव्हता हेही सावनीच्या दुसऱ्यांदा येण्यानं सिद्ध झालं.
कासवं सिग्नल कसा देतात?
समुद्री कासवं पाण्याखाली असताना श्वास घेऊ शकत नाहीत. श्वास घेण्यासाठी त्यांना समुद्राच्या पृष्ठभागावर यावंच लागतं. कासव जेव्हा असं समुद्राच्या पृष्ठभागावर येतं तेव्हा त्यांचा ट्रान्समीटर उपग्रहाला सिग्नल देतो. या सिग्नलवरून त्यांचा माग काढता येतो. कासव समुद्रात किती खोल गेलं याचीही माहिती या सिग्नलद्वारे आपल्याला मिळू शकते.
समुद्री कासवं फक्त प्रजननासाठीच किनाऱ्यावर येतात. त्यातही या कासवांच्या फक्त माद्याच किनाऱ्यावर येतात. नरमाद्यांच्या जोड्या जुळणं, त्यांचं मेटिंग हे सगळं समुद्रातच होतं. त्यामुळे नर कधीच किनाऱ्यावर येत नाहीत. म्हणूनच कासवांच्या माद्यांना ट्रान्समीटर लावून त्यांचा अभ्यास करावा लागतो.
ओडिशामधला ‘अॅरिबाडा’ :-
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या संख्येनं येतात. इथे गहिरमाथा, ऋषिकुल्या या किनाऱ्यांवर विणीच्या हंगामात म्हणजे फेब्रुवारी, मार्च महिन्यांत या कासवांचा मेळाच भरतो. याला म्हणतात, ‘अॅरिबाडा’. हा स्पॅनिश शब्द आहे. ‘अॅरिबाडा’ म्हणजे मोठ्या संख्येने होणारं आगमन.
ओडिशामधलं हे ऑलिव्ह रिडले कासवांचं आगमन जगप्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरही ही कासवं प्रजननासाठी येतात याबद्दल आपल्याला आधी फारच कमी माहिती होती. कासवांचा पश्चिम किनाऱ्यावरचा हा अधिवास सगळ्यांसमोर आणला तो ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या कोकणातल्या निसर्गप्रेमी संस्थेने.
कोकणातले ‘कासववाले’ :-
सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे आणि राम मोने यांच्या पुढाकारामुळे कोकणात सुमारे वीस वर्षांपूर्वी कासवांच्या संवर्धनाची चळवळ सुरू झाली. त्यावेळी कुणालाच फारसा अंदाज नव्हता. काही गावांमध्ये अंडी घालण्यासाठी आलेल्या कासवांची शिकार होत होती, काही ठिकाणी कासवांची अंडी चोरीला जात होती तर काही जण कासवांबद्दल अगदीच अनभिज्ञ होते.
सह्याद्री निसर्ग मित्रने कोकण किनाऱ्यांवर कासवांबद्दल जागृती निर्माण केली, त्यांच्या घरट्यांचं संरक्षण करण्यासाठी हॅचरी तयार केल्या. गावकऱ्यांना या कामामध्ये सहभागी करून घेतलं आणि कासवांची पिल्लं सुखरूप समुद्रात सोडण्याची मोहीमच सुरू केली. आतापर्यंत कोकणच्या किनाऱ्यावर कासवांच्या लाखो पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं आहे.
कासवांची पंढरी : वेळास
रत्नागिरी जिल्ह्यातला वेळासचा किनारा म्हणजे कासवांची पंढरीच आहे. वेळासचे मोहन उपाध्ये हे याच चळवळीतले बिनीचे शिलेदार आहेत.
ते सांगतात, ऑलिव्ह रिडले कासवं रात्रीच्यावेळी, पहाटे किंवा कधीकधी शांत दुपारी किनाऱ्यावर येतात. ही कासवीण समुद्रातून येते तेव्हा किनाऱ्यावर तिच्या येण्याचा मार्ग म्हणजे ‘ट्रेल’ उमटतो. या ‘ट्रेल’ वरून तिचं घरटं शोधता येतं.
मोहन उपाध्ये यांच्याकडे याबद्दलची अतिशय रंजक माहिती आहे. ते म्हणतात, ‘साधारण पौर्णिमा किंवा अमावस्येच्या आसपास कासविणी किनाऱ्यावर येतात. तेव्हा भरती असते आणि कासवीण भरतीरेषेच्या पलीकडे घरटं करते. भरतीच्या पाण्यामुळे आपलं घरटं वाहून जाणार नाही, याची खबरदारी ती घेते!’
या कासविणींनी घातलेली अंडी घरट्यातून काढून हॅचरीमध्ये आणली जातात. किनाऱ्यावर कासवीण जिथे अंडी घालते त्या ठिकाणी गस्त घालणं कठीण असतं म्हणून ही अंडी हॅचरीमध्ये खड्ड्यात पुरून ठेवतात. हॅचरीला तारांचं कुंपण असतं. त्यामुळे घरट्यांचं संरक्षण होतं.
तपमान आणि पिल्लाचं लिंग :-
कासवांची अंडी घरट्यात असताना तिथे जे तपमान असतं त्यावरून नर पिल्लं जास्त असणार की मादी पिल्लं हे ठरतं. वातावरण थंड असेल तर अंड्यांतून बाहेर येणारी नर पिल्लं जास्त संख्येने असतात आणि उष्णता असेल तर माद्यांची संख्या जास्त असते.
जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत जी घरटी होतात त्यातून बहुतांश नर पिल्लं जन्माला येतात आणि जसजसा उन्हाळा वाढत जातो तशी मादी पिल्लांची संख्या वाढते. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये होणाऱ्या घरट्यांमध्ये मादी पिल्लांचं प्रमाण जास्त असतं, असं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.
कासवांच्या घरट्यातून ४० ते ४५ दिवसांनी पिल्लं बाहेर येतात. या पिल्लांना किनाऱ्यावर आणून ठेवलं की ती बरोब्बर समुद्राच्या दिशेने जातात.
समुद्राच्या दिशेने अशी तुरुतुरु चालत जाणारी पिल्लं पाहिली, की मी पुन्हापुन्हा वेळासला जाऊन पोहोचते. २००६मध्ये सह्याद्री निसर्ग मित्रच्या कार्यकर्त्यांसोबत मी तिथे गेले होते. वेळासच्या छोट्याछोट्या मुलांच्या हस्ते आम्ही कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडलं होतं... त्यातलं एखादं तरी कासव आता समुद्रात विहरत असावं असा मला नेहमी वाटतं!
हजारातलं एक पिल्लू जगतं!
किनाऱ्यावर कासवं जेवढी अंडी देतात त्यात हजारातलं एक पिल्लू जगतं. ही पिल्लं किनाऱ्यावरून समुद्रात जाताना शिकारी पक्षी, कोल्हे, कुत्रे यांच्या तावडीत सापडतात. शिवाय समुद्रात गेल्यानंतर पुन्हा भक्षक आहेतच. त्यामुळेच कासवं इतक्या मोठ्या प्रमाणात अंडी देतात.
ऑलिव्ह रिडले कासवांचं सरासरी आयुर्मान सुमारे पंचावन्न वर्षं इतकं आहे. ही कासवं समुद्रातले जेली फिशसारखे छोटे जलचर आणि कुजलेले मृत मासेही खातात. त्यामुळे ती समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम करतात, असं म्हटलं जातं.
या कासवांना समुद्रात कोण खातं? तर शार्कसारखे मोठे मासे. पण या कासवांना आणखी एक मोठा धोका आहे. तो म्हणजे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून मरण्याचा!
मच्छिमारांच्या जाळ्यात कासवं :-
मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून किंवा मच्छीमारी जहाजांची धडक लागून कासवांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात अनेक कासवं अशा प्रकारे जखमी होऊन लाटांवर भरकटत किनाऱ्यावर येतात. अशी कासवं जाळ्यात अडकलेली असताना लगेच लक्षात आलं तर त्यांची सुटका करता येते.
पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कोकणच्या सागरी संवर्धनावर फिल्म करताना एकदा एका किनाऱ्यावर आम्हाला एक ग्रीन टर्टल म्हणजे हिरवं कासव उलटं ठेवलेलं दिसलं. ते पकडणाऱ्या मंडळींचा त्या कासवाची मेजवानी करायचा बेत असावा... पण सागरी संशोधक सारंग कुलकर्णीच्या मदतीने आम्ही ते ग्रीन टर्टल समुद्रात सोडलं.
आता मात्र कासवांच्या संवर्धनाबद्दल खूपच जागृती झाली आहे. कासवांबद्दल मच्छीमारांकडून जाणून घेण्यासाठी आम्ही गुहागरजवळच्या असगोली किनाऱ्यावर गेलो तेव्हा याची प्रचिती आली. असगोलीच्या मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांच्या कहाण्या सांगितल्या.
‘समुद्रात जाळं टाकल्यानंतर दोनतीन तासांनी ते काढताना काहीतरी जड लागलं तर आम्ही समजतो की जाळ्यात कासव अडकलं आहे. मग आम्ही त्याला इजा होऊ न देता जाळ्याच्या बाहेर काढतो आणि समुद्रात सोडून देतो.’ असगोलीचे मच्छीमार जयंत लाकडे सांगत होते.
‘आम्ही कासवाला देव मानतो. गुहागरला व्याडेश्वराच्या देवळात कासवाची मूर्ती आहे. तिला साक्षी ठेवून आम्ही कासवाला हळदीकुंकू वाहतो, त्याची पूजा करतो आणि त्याला समुद्राच्या स्वाधीन करतो.’ हेही त्यांनी आवर्जून सांगितलं.
मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या कासवाची सुटका केली तर त्यांना सरकारतर्फे मोठी मदत दिली जाते. त्यामुळे आता आणखी मच्छीमार बांधव कासवांच्या संवर्धनासाठी पुढे आले आहेत.
मॅनग्रोव्ह सेलचे संशोधक मानस मांजरेकर सांगतात, ‘समुद्री कासवं उभयचर असावीत, असा आपला समज असतो. पण ही कासवं सरिसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांच्या कुळातली आहेत. कासव मंदगतीने चालतं, असंही आपण ऐकत आलो आहोत. पण समुद्री कासवं अतिशय वेगवान असतात. ती महासागरही पार करू शकतात हे आता सिद्धच झालं आहे.’
भारताच्या किनाऱ्यांवर पाच प्रकारची समुद्री कासवं अंडी घालण्यासाठी येतात. ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, लेदरबॅक टर्टल, हॉक्सबिल आणि लॉगरहेड टर्टल. यातलं लेदरबॅक टर्टल हे जगातलं सर्वात मोठं समुद्री कासव आहे.
महाराष्ट्रालगतच्या समुद्रात लेदरबॅक आणि ग्रीन टर्टल ही कासवंही आढळतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर तर ग्रीन टर्टल म्हणजे हिरव्या कासवाच्या प्रजननाची नोंदही झाली आहे.
प्लॅस्टिक प्रदूषणाचा परिणाम
सागरी कासवांना समुद्रात आणखी मोठा धोका आहे. तो म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषणाचा.
ऑलिव्ह रिडले कासवं जेली फिशसारखे मासे खातात. समुद्रात तरंगणारं प्लॅस्टिक बऱ्याचवेळा त्यांना त्यांचं भक्ष्य वाटतं. अशा वेळी हे प्लॅस्टिक त्यांच्या पोटात जाण्याचा धोका असतो.
मध्यंतरी कासवाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या कासवाच्या नॉस्ट्रीलमध्ये म्हणजे नाकात दोन स्ट्रॉ अडकले होते. त्या कासवाला पकडून सर्जरी करून ते काढावे लागले! कासवांच्या नाकातोंडात, शरीरात जर असं प्लॅस्टिक गेलं तर ते कोण आणि कसं काढणार हा मोठा प्रश्न आहे.
कासव संवर्धन आणि सागरी पर्यावरणामध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणूनच या प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा देतायत.
मुंबईमधली स्वच्छता मोहीम
मुंबईचे पर्यावरणवादी कार्यकर्ते अफरोज शाह यांनी काही वर्षांपूर्वी अशीच वर्सोवाचा किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात अनेक मुंबईकरांनी, पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. वर्सोवाचा किनारा आरशासारखा पारदर्शी झाला. एवढंच नव्हे तर या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना सोडून या मोहिमेचं सेलिब्रेशनही करण्यात आलं!
मुंबईपासून अवघ्या कोकण किनाऱ्यावर कासवांच्या निमित्ताने सागरी संवर्धनाची एक मोठी चळवळ उभी राहिली आहे.
‘सावकाशपणे आणि धीराने काम करत राहिलं तर आपण आपल्या कामात यशस्वी होतो हे या कासवानेच आम्हाला शिकवलं’, असं मोहन उपाध्ये आवर्जून सांगतात.
याच शिकवणीतून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असंख्य कार्यकर्ते सागरी कासवांना जपण्यासाठी झोकून देऊन काम करत आहेत. सिंधुदुर्गातलं वायंगणी हेही कासवांचं माहेरघरच आहे.
‘किनाऱ्यावर आलेलं कासव आपल्या गावातलंच आहे, आपल्या घरचंच आहे, अशी आमची भावना आहे’, असं गुहागरच्या अनुराधा दामले यांना वाटतं तेव्हा कासव आणि कोकणवासियांच्या नात्याची खात्री पटते. याच कासवाने आपल्याला जगाच्या नकाशावर नेलं याचाही त्यांना सार्थ अभिमान आहे.
‘कासवांच्या डोळ्यांत मला अनेक कहाण्या दिसतात. वाटतं, त्यांना खोल समुद्रातलं बरंच काही माहिती आहे. आता त्यांच्या मदतीनेच आपण ही रहस्यं शोधायला हवी.’
‘कासवं डायनासोरसारखीच प्राचीन आहेत. ती फारशी उत्क्रांत झालेली नाहीत.’
‘जंगलासाठी जसा वाघ महत्त्वाचा आहे तशी समुद्राच्या संवर्धनासाठी ही कासवं महत्त्वाची आहेत... ’
गुहागरच्या किनाऱ्यावर फेसाळत्या लाटांमध्ये उभं राहून डॉ. सुरेशकुमार कासवांबद्दल अथकपणे बोलत राहतात तेव्हा त्यांनी टॅग केलेल्या कासवांची मार्गक्रमणा सुरूच असते... बागेश्री बंगालच्या उपसागराची रहस्यं सांगते तर गुहा अरबी समुद्रात मुशाफिरी करते.
कासवांच्या प्रवासाचा हा नकाशा पाहिला की दरवेळी वाटतं, ससा आणि कासवाच्या शर्यतीत नेहमीच कासव जिंकतं. पण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या सागरी संवर्धनाच्या शर्यतीत कासव एकटंच जिंकलेलं नाही.
गेल्या वीस वर्षांत कोकण किनाऱ्यावरच्या झपाटलेल्या कार्यकर्त्यांना, धडपडणाऱ्या गावकऱ्यांना आणि सागरी गुपितं शोधणाऱ्या संशोधकांना कासवाने ही अत्यंत कठीण अशी शर्यत जिंकून दिली आहे!
-- आरती कुलकर्णी
सागरी गुपितं शोधणाऱ्या संशोधकांना कासवाने अत्यंत कठीण शर्यत जिंकून दिली आहे!