केळशी

Payal Bhegade
17 Jun 2023
Blog

केळशी गाव
केळशी हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील पाच ते सात हजार लोकवस्ती असलेले शांत समुद्रकिनारा असलेले गाव आहे.
गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणाऱ्या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या भागाला बिदी असे म्हणतात. ह्या पाखाड्या इथे पडणाऱ्या धो धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून जांभ्या दगडाचे चिरे वापरून केल्या आहेत. पावसाळ्यात बिदीवर असणाऱ्या घरातील अंगणापासून ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधले जातात.
केळशी गावात एक नैसर्गिकरित्या तयार झालेली वाळूची टेकडी आहे. ही वाळूची टेकडी वास्को-दि-गामाच्या भारत भेटीच्या आसपास झालेल्या पंधराव्या शतकातील एका सुनामीमुळे तयार झाली आहे.
वाळूच्या टेकडीचे हे केळशी गाव भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. त्यानंतर डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कार्बन-१४ पद्धतीने कालमापन केले असता ११८० वर्षांपूर्वी काळ मिळाला.
केळशी गावाचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो. पण सारे उल्लेख सन १६०१ नंतरचे आहेत. पंधराच्या शतकाच्या अखेरीस नैसर्गिक घटनेतून या समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीचे जंगल उद्ध्वस्त झाले असावे. केळशी येथील विहिरीच्या पुराव्यावरून आणि आजूबाजूच्या पुरातत्त्वीय अवशेषावरून इसवी सनाच्या १५व्या शतकापर्यंत येथील समुद्राची पातळी ही तीन ते चार मीटरने कमीच होती हे नक्की होते.
वैद्य, घैसास, दांडेकर, लागू, विद्वांस आडनावाच्या लोकांचे केळशी हे मूळ गाव आहे.

महालक्ष्मी मंदिर:
दापोली तालुक्यात पेशवे काळात बांधली गेलेली अनेक मंदिरे आहेत, त्यापैकी प्रसिद्ध असे हे ‘केळशीचे महलक्ष्मी मंदिर’. हे मंदिर केळशी गावापासून ३ किमी अंतरावर आहे. नव्या महसूल रचनेनुसार हे देऊळ उटबंर गावात येते; पण पूर्वापार ‘केळशीचे महलक्ष्मी मंदिर’ म्हणून ख्याती असल्यामुळे आजही तसेच म्हटले जाते. या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे.[२] दरवर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची यात्रा भरते.