कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रांगणागड वास्तूचे जतन व संवर्धन व्हावे, दुर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात या पर्यटन गडाकडे वळावेत, इतिहासाच्या पाऊलखुणा जपाव्यात या उदात्त हेतूने पिंगुळी येथील गिअर अप जिमच्यावतीने कुडाळ आणि परिसरातील दुर्गप्रेमींनी रांगणागड सर करण्याची मोहीम यशस्वी पार केली. यात ७८ जणांचा समावेश होता. गिअर अप जिमचे हे चौथे वर्ष असून ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम ते करत आहेत. आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या पूर्वसंध्येला ही मोहीम पार पाडण्यात आली.
भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो. येथील संस्कृती, निसर्गाचे सानिध्य, सह्याद्रीच्या पर्वतरांगा यामुळे सर्वांनाच या जिल्ह्याची भुरळ पडली आहे. विस्तीर्ण समुद्र किनारा ऐतिहासिक वारसा या जिल्ह्याने जोपासला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक गड, किल्ले याचे साक्षीदार आहेत. गड, किल्ल्यांचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी अनेक दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी गडांना भेट देऊन इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आहेत. रांगणागड हा त्यातील एक. त्याच्या जतन व संवर्धनासाठी पिंगुळी येथील गिअर अप जिमच्यावतीने कुडाळ आणि परिसरातील दुर्गप्रेमींनी तो सर करण्याची मोहीम आखली.
आज आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या पूर्वसंध्येला ही मोहीम पार पाडण्याचे ठरविण्यात आले. हा गड सर करण्यापूर्वी शिवरायांच्या या वास्तूला नमन करण्यात आले. सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून प्रवास सुरु झाला. त्यासाठी गाड्यांचे नियोजन, जोडणी करणे, इथपासून या मोहिमेच्या नियोजनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अल्पोपहार, मोहीमेचा शुभारंभ, शिवछत्रपतींना वंदन करण्यात आले. शौर्य शिंदे याचा देखील वाढदिवस सुरवातीला साजरा करण्यात आला. मग गडाच्या पायथ्याशी थोडासा सराव, पाणी-टोपी वाटप, ट्रेकींगच्या सुचना असे सारेच नियोजन जिमच्या वतीने करण्यात आले होते. दरम्यान, या मोहिमेत गिअर अपचे संचालक साईराज जाधव, गडप्रेमी पंकज गावडे, पंकज गावडे, प्रथमेश चुडनाईक यांचे सहकार्य लाभले. कणकवली, सावंतवाडी, पिंगुळी ओरोस, झाराप कुडाळ येथून ट्रेकर सहभागी झाले होते. यात डॉक्टर, कुडाळ येथील काही उद्योजक व नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सहभाग घेतलेल्यांना सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव, जिल्हा परिषद कर्मचारी विनायक पिंगूळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रास्ताविक विशाल कदम यांनी केले. विनायक पिंगुळकर तसेच शौर्य शिंदे यांनी सुरवातीला शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. अमित सरनोबत, किशोर सरनोबत, एकनाथ सरनोबत, विशाल कदम या सर्वांचा गिअर अप जीमच्यावतीने सत्कार करण्यात आला. संकल्प दळवी यांनी छायाचित्रणाचे काम पाहिले. या वर्षीच्या पर्वतदिनाची संकल्पना ‘पर्वतांवरील परिसंस्थेचे पुनरुज्जीवन’ या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनांसह सचिव श्रीमती दिप्ती मोरे यांनी दिली. गिअर अप जिमच्यावतीचे काम निश्चित वाखाणण्यासारखेच होते, असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद वरिष्ठ कर्मचारी पिंगुळकर यांनी केले.
- अजय सावंत .
दुर्गप्रेमींनी केला रांगणागड सर