कोकणी शाश्वत जीवनशैलीचे पर्यटन

Payal Bhegade
22 May 2024
Blog

मी हे इथे ह्या little offbeat topic- trip बाबत लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे, कोकणी रानमेवा, घरे- मातीच्या घरातील स्वयंपाकघर, उन्हाळी वाळवणं व, कोकणी जेवण आणि ३-४ दिवसांत ह्या तळकोकणात अनुभवता आलेले साधे-सुधे पण खास क्षण मुंबई स्वयंपाकघरच्या हौशी लोकांसोबत share करणे. आजकाल अशा प्रकारचे पर्यटन गावागावांत सुरू झालेय, तरूणाई ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेते, हे स्वागतार्ह आहे. तसे आपल्यापैकी बहुतेकांना हे comfort zone च्या पलिकडील वातावरण वाटते. पण काही काळात हे सुख, साध्या जीवनशैलीची गंमत अगदी खोल मनापर्यंत पोहोचते. हा एक वेगळा अनुभव आहे. तुमच्यापैकी अनेकांना हे नक्की आवडू शकते. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणा-या पर्यटकांना गावी येऊन मातीच्या घरात राहून इकडच्या जीवनशैलीची, cultural values, गावातील वेगवेगळे सण, उत्सव, परंपरा यांची योग्य ओळख व्हावी‌. त्यातून मेहनती शेतकरी, त्यांची पुर्व परंपरागत मातीची घरं, मांगर अबाधित राहावी आणि शेतक-यांना‌ योग्य मोबदल्यासह उपजीविकेचे एक साधन‌ उपलब्ध व्हावे ह्यासाठी ह्या तरूणांची धडपड आहे.
पोस्ट खुप लांबली आहे नेहमीप्रमाणेच आणि हो
ही promotional post नाही, ह्याची नोंद घ्यावी. कोणाला माहिती हवी असल्यास मला नक्कीच काही reference द्यायला आवडतील. मला personal ping करू शकता.
तर अगदी Impromptu plan झाला! ह्या Birthday ला तळकोकणातल्या एका Ecostay मधे, मातीच्या मांगरात राहायचे. कोकणातील दालचिनी, काळे मिरे, जायफळ, जायवंत्री, तिरफळ हे पाहणे हा मुख्य उद्देश होता. भर मार्च मध्ये जायचे म्हणजे थोडे टेंशन वाले काम पण जायचे म्हणजे जायचे ठरले. १०-१२ जवळच्यांना येता का म्हणून विचारले आणि जाणवले माझ्याइतके फ्री ह्यावेळी तरी कोणीच नाहीये. मग सोलो ट्रिपची बुकींग करून १५ मार्च ला थिविम गाठले. सुंदर रस्ता, लाल माती, डोंगर चढत, दरमजल करत शेवटी झोळंबेच्या मातीच्या घरी पोहोचलो. सारवलेल्या खळ्यात माती लिंपून केलेल्या तुळशीवृंदावन आणि रांगोळीच्या सड्याने प्रसन्न स्वागत केले! झोळांबेच्या दारात, आपला इको-स्टे टिमचे हसतमुख दर्शन झाले! येताना काजूच काजू रस्ताभर... हिरवे- पिवळे- लाल बोंडू आणि रस्ताभर काजूचा सुगंध! नारळी- पोफळीच्या बागायती, हिरवीगार वायंगणी भात शेती आणि मधे मधे फणसाने भरलेली झाडे... कितीतरी पक्षी गाडी समोरून सुर मारत जात होते. तळकोकणातील शाश्वत कोकण, साधी जीवनशैली,‌ जीवनमुल्ये यांचा अनोखा मिलाफ मी पुढच्या ३-४ दिवसांत अनुभवला. झोळंबे हे जंगलाने वेढलेले गाव. वर डोंगरावर तर कधी खालच्या भागात अशी वस्ती असलेले गाव.
वैशिष्ट्यपूर्ण अशी 'कार्वी' चित्रशैली लेपन केलेले मंदिर आणि मंदिर परिसर, सोबतच इतरही अनेक मंदिरे पाहून झाली. मग नारळी पोफळीच्या बागांमध्ये फेरफटका झाला. एका ठिकाणी रंगबिरंगी फुलपाखरांचे साम्राज्य होते जणू... आपण चालायला लागलो कि आपल्या चाहुलीने थवेच्या थवे भिरभिरत उडत होते. फार भारी वाट्टो हा अनुभव पण... केळी- काजू- चिकू सोबतच अंजीर, करमळं यांची फळे लगडलेली झाडे होती. कवठी चाफा आणि सफेद कांचनची झाडे सुद्धा फुलांनी बहरून आली होती. झोळंबे हे झ-यांचे गाव म्हणून छोटे छोटे ओहोळ जागोजागी दिसतात. थंडगार स्वच्छ पाण्याचे... हे पुढे जावून नदीला मिळतात. वाडीमध्ये भरपुर भटकंती केल्यावर दिवसाची सांगता, सुंदर अशा sunset point डोंगरावर झाली. घरी आल्यावर सारवलेल्या खळ्यात बसून, चांदणे बघत, रातकिड्यांच्या आवाजात शिमग्याच्या गप्पा, अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा वैगरे करत रात्र सरत होती. टिममधल्या ओंकरच्या मम्मीने चुलीवर चमचमीत अशी फणसाच्या आठ्या आणि गराची भाजी आणि उकड्या तांदळाची पेज‌ केली होती.
हे मातीचे घर स्वयंसेवकांच्या मदतीने पुन्हा नव्याने लेपले आहे. जुन्या वस्तू restore केल्या आहेत. स्वयंपाकघरात जुन्या काळातील भांडी लावली आहेत. पितळी, दगडी, लाकडी भांडी. चुल आहे. बाथरूममध्येही पितळेचा मोठाला हंडा आहे. पाणी तापवायला हंडा आहे. मोठ्या आकाराची जाती, उखळ, पाटा वरवंटा ठेवले आहेत. छान सजवले आहे. एक प्रसन्न देवघर, एक गणपतीची खोली, ओटी, चार-पाच खोल्या, स्वयंपाकघर, मागीलदार, ओसरी, खळे, वरची पोटमाळा असे अगदी सगळेच आहे घरात. शेणाने सारवलेल्या जमिनीवर, केळीच्या पानात कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यासारखे सुख नाही.
मुंबई स्वयंपाकघरवर मुद्दामच इकडचे स्वयंपाकघर आणि घरांचे फोटो टाकत आहे.
नदी किनारे, नदीवरचे sunset, sacred देवराई, वनराई येथे फेरफटका झाला‌. रानमाणूस टीम पर्यावरणाच्या सर्व मर्यादा पाळून आणि पुर्व परंपरागत पाळल्या जाणा-या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत मगच देवराई मधे पर्यटकांना घेऊन जात होती. चप्पल बाहेर काढून मग गर्द हिरव्यागार देवराईची अनुभुती घेता आली. गावामध्ये सगळ्याच चिराच्या कौलारू घरापुढे भारदस्त अशी डवरलेल्या तुळशींची वृंदावने होती.‌ त्यामधे दोन काठ्यांना‌ दोरी बांधून मधोमध छोटुशा मडक्यात पाणी ठेवलेले. ह्या भागात अशा पद्धतीने पाणी ठेवतात. ठिबकत राहते आणि तुळशी सुकत नाही. गब्बू कोंबड्या पिटुकल्या पिलांना घेऊन खळ्यांमधे फिरत होत्या. मी स्वतः born and bought up village girl/ गाववाली आहे त्यामुळे हे मला नाविन नव्हते पण पहायला मजा येत होती. झ-यांचे गाव झोळंबे आवडलं.
खोबरे, वाट्या, रीठा, सुपा-याची उन्हाळी वाळवणं खळ्यात सुकत टाकली होती. Summer vibe!
रिठा केस, कपडे वैगरे धुवायला कामी येतो.
शेवटचा दिवस वाघेरी वाडीत गेला.‌ उंच डोंगरवर, लाल माती मधे मांगर स्टे वसलाय. मांगर ला मला बाळू दादा आणि खळ्यात उगवलेल्या भुईचाफ्याने स्वागत केले. कसली देखणी फुले... मंद मंद सुगंध... मांगर चे मातीचे घरही देखणे आहे. स्वच्छ प्रसाधनगृह, गरम पाणी असे सर्व उपलब्ध आहे. चंकी, बनी आणि अजून एक अशी कुत्र्यांची फौज आहे. संपुर्ण जंगल‌ ट्रेक आणि बागायती मधे गेल्यावर हे तीघे आमच्या पाठीपुढे करत धावत होते. जंगलात माकडे, शेकरू आहेत. त्यांच्यावर भुंकत, मस्ती करत पाचोळ्यातून फिरत होते. बाळूदादाकडील जंगल घनदाट आहे. अनेक औषधी वनस्पती, उस्की सारख्या फांदीमधून पाणी येणा-या वनस्पती, जंगलातील निरनिराळ्या मुंग्या, वारूळे, बुरशी, उपयुक्त पाने ह्यांची माहिती घेत, वाटेतील रानफळे खात खात, रानफुलांचे सुगंध घेत जंगलातून मस्त रपेट झाली. चारोळ्या, चाफरं, बिंबली, रातांबे, करमळं, जांभळं असे अगदी सगळंच होते इकडे... वटाची झाडांखाली फळे विखूरली होती. त्याचा आंबपपणासाठी जेवणातील उपयोग कळला. काळे मिरे सुपारीवर चढवले होते. काढणी झाली होती पण वेलींवर सुटलेली छोटी मोठी हिरवी लाल मि-यांची लोंगरे लगडलेली होती. जायफळं पिकली होती. दालचिनी, तमालपत्र ची झाडे होती.
बाळू दादाने काढून दिलेल्या रसरशीत काजी खाल्ल्या. मला कसेही करून हाॅर्नबिल बघायचाच होता. आणि एक नाही दोन नाही तर चक्क तीन तीन वेगवेगळ्या हाॅर्नबिलने दर्शन दिले. येताना‌ भारव्दाज, देखणे घुबड, कोतवाल, पिवळा पक्षी, लाल पक्षी, खंड्या, बुलबुल, दहा-पंधरा मोरांचा थवा दिसला. Just can't express my happiness in words. बाहेर खळ्यात बसून, सुरंगी च्या सुगंधी फुलांचा सुगंध अनुभवत, पक्षांचा किलबिलाट ऐकत बसण्यासारखे सुख नाही. संध्याकाळी वेंगुर्लेला कोंडूरा बीचवर पाण्यामधे मनसोक्त आनंद घेतला. स्वच्छ पाणी आणि किनारा...
रात्री खळ्यात बसून तळकोकणातल्या गप्पा मारत आणि बाळू दादांच्या सुगरण पत्नी अपर्णा वहिनीच्या हातचे मासे, काळ्या मुगाचे सांबरा चे जेवण जेवून तृप्त झालो. ही वाघेरीवाडी हे बिबट्या, गवा, सांबर, साळिंदर, किंग कोब्रा चे habitat आहे. इथे हे स्थानिक काही ह्यांना उगाच घाबरत नाहित. आपल्या ecology चाच हे भाग आहेत असे समजून अगदी एकत्र सामावले जाते. अति आग्रहास्तव काजीच्या ऊराकाची कृती आणि चव घेता आली. पक्षांच्या शीळ ऐकतच पहाट झाली. कोवळ्या उन्हात खळ्यात बसून घावणं चटणी चहा चा आस्वाद घेता आला.
निघायची वेळ झाली तरी पाय निघत नव्हता मांगरातून... इको स्टे ची रंगत वेगळीच होती. मोजक्या मसाल्यांच्या वापराने बनवलेले पदार्थ. खवलेला नारळ, कोकम बटर चा उत्तम वापर, नारळाचे लाकडी घाण्याचे तेल वापरून केलेला स्वयंपाक. रस- घावणे, भाकरी- चणा भाजी, फणस भाजी- पेज, ताज्या रातांब्याचे सरबत, वेट्ये काकीकडचे गावठी कोंबडीचे जेवण, बाळूदादाकडचे बांगडे आणि सुके मासे, घावणं-चटणी, सोलकढी, मनगणं, नाचणीच्या भाक-या हे सर्व त्यांच्या Farm to plate म्हणजे जे माझ्या वाडीत किंवा परिसरात तेच माझ्या ताटात असे concept. स्वयंपुर्ण! मोजक्या resources मधेही आनंदी परिपूर्ण जीवनशैली.‌
ह्या तळकोकणातील फेरफटक्याने भरभरून आनंद दिला, एक नजरिया दिला आणि तो नेहमीच प्रेरणादायी असेल. आताही आले परत घरी तरी ही नशा‌ तशीच राहणार हे नक्की.