India Navy Day : शिवरायांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

Payal Bhegade
05 Dec 2023
Blog

मालवण, (जि. सिंधुदुर्ग) - नौदल दिनाच्या निमित्ताने शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी वेशातील भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी चार वाजता टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर हेलिकॉप्टरने दाखल झाले. यावेळी उपस्थितांना त्यांनी अभिवादन केले. यानंतर ते शहरातील राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेल्या शिवपुतळ्याच्या ठिकाणी रवाना झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते.

भारतीय नौदलाने देखील आपल्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा छापली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या वतीने ४ डिसेंबरचा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला.

यावेळी राज्यपाल , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ,केंद्रीय मंत्री , पालकमंत्री आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित शिव चित्र प्रदर्शनास पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली.