कोकणातील पारंपारिक लोककला.

Payal Bhegade
06 Jul 2023
Blog

कोकणातील पारंपारिक लोककला...

कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातले खरे खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी इथला शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी / मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातल्या या दोन्ही सणांशी इथल्या लोककला निगडीत आहेत.

दशावतार :- विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, कलकी आणि बुद्ध यातील फक्त #वामन, #परशूराम, #राम आणि #कृष्ण हे चारच अवतार नाटकात दाखवले जातात. आधी गणपतीस्तवन, मग पुर्वरंगात रिद्धी सिद्धी, भटजी, संकासूर, सरस्वती, ब्रम्हा, विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात #रामायण, #महाभारत मधील पौराणिक कथा दाखवली जाते. महत्वाचं म्हणजे दशावतारी नाटकांची लिखित संहिता नसते, स्वतःची रंगभूषा करायला सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर कोणते कथानक करायचे हे कलाकारांना सांगितले जाते. त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचे संवाद तयार करतात.

नमन : - नमन या लोकनृत्यामध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पूजनात गणेशाची आख्यायिका असते .नमन खेळाची सुरुवात गावदेवीची राखण देऊन मृदंगावर थाप पडते. ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे साधन मात्र नमन-खेळे, शक्तीतुरा हेच आहेत.

पालखी नृत्य : - फाल्गुन शुक्ल पंचमी ते हुताशनी पौर्णिमा या दिवसामध्ये कोकणातील लहान मोठ्या गावांमध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी काढण्याची प्रथा असते. या पालखीमध्ये ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा ठेवल्या जातात. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी निघते. गावातील प्रत्येक वाडीमध्ये, घरासमोरून नाचवली जाते. सहाण म्हणजे गावाची चवडीची पण देव कार्याची जागा निवडली जाते. या ठिकाणी केवळ पालखीच्या कार्यक्रमादरम्यान देवकार्य केले जाते. प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचा दिवस वेगवेगळा असतो. या पालखी नाचवण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक चाकरमानी मुंबई, पुण्यातून कोकणात आपल्या गावी जातात.

संकासूर : - गावाची वेस बदलत गेलं की, संकासूराच्या रुपड्यात किंचित किंचित फरक जाणवतो, पण संकासूर पहावा तो गुहागरचाच! त्याच्या कमरेच्या घुंगराचा चाळच चार किलो वजनाचा असतो. हातातली वेठी, आणि त्याचा नाच टक लावून पाहत रहावे असा. मानेला आणि कमरेला लचके देत तो दुडक्या चालीवर मागेपुढे करत नाचतो, ते पाहत राहण्यासारखे असते. आपली सखी गोमूसोबत तो नाचत असतो, कधी गोमूभोवती अक्षरश: तीच्याभोवती गोल गोल पिंगा घालतो. असा हा संकासूर लहानग्या पोरांपासून म्हातार्‍या-कोतार्‍यापर्यंत सार्‍यांनाच जीवाभावाचा वाटत आलेला आहे. कोकणातल्या शिमगोत्सवात तो कशासाठी येतोय..? काय आहे त्याचं सांगणं..? बापरे! असे एक ना अनेक प्रश्न.. पण, कोकणवासियांनी या प्रश्नांचा शोध कधी घेतलाच नाही. ते फक्त अविरत प्रेम करत राहिले संकासूरावर. आणि त्यांचं ते प्रेम पाहून मत्स्य पुराणात खलनायक असलेला हा संकासूर कोकणवासियांचा हिरो झाला.

जाखडी :- मनाला नवी ऊर्जा देणाऱ्या पारंपरिक `जाखडीचे` स्वर सगळीकडे घुमू लागतात. ढोलकीवर जोरदार थाप पडल्यावर, उजव्या पायात चाळ बांधून, भरजरी कपड्यांनी सजलेले नर्तक गाणाऱ्या बुवाने नमनाला `गणा धाव रे, मला पाव रे` अशी सुरुवात केल्यावर उत्साहाने नृत्याला सुरुवात करतात. त्या ठेक्यावर श्रोतेगणही तल्लीन होऊन त्यांची पाऊले आपोआपच ताल धरू लागतात. कोकणवासीयांना जगण्याची उमेद देणाऱ्या जाखडीची श्रावण महिन्यात ढोलकीवर पडलेली थाप ही शिमाग्यानंतरच विसावते. सर्वत्र `बाल्या नृत्य` किंवा `चेऊली` म्हणून परिचित असणारा हा नृत्यप्रकार रत्नागिरीत मात्र `जाखडी` लोकनृत्य म्हणून जास्त परिचित आहे.