भूसंपादना आधीच पुलाचे काम; बिरवाडी-खरवलीतील जोडरस्‍त्‍यासाठी जमीन मिळेना

Payal Bhegade
30 Nov 2023
Blog

तालुक्यातील बिरवाडी-खरवली दरम्यान काळ नदीवर बांधण्यात आलेला नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुलाला जोडणाऱ्या जोडरस्त्यासाठी भूसंपादनच न झाल्‍याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जमीन अधिग्रहण न करतात सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम केल्याने ग्रामस्‍थांमधून संताप व्यक्‍त होत आहे. दरम्यान नवा पूल बांधण्यात आला असला तरी धोकादायक ठरलेल्‍या जुन्या पुलावरूनच प्रवासी व नागरिकांना वाहतूक करावी लागते आहे.

बिरवाडी व खरवली या दोन गावांना जोडणारा काळ नदीवरील पूल परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. याच पुलावरून पुणे, वरंध, शिवथरघळ अशा अनेक गावांमधील प्रवासाची सोय झाली आहे. २०२१ मध्ये आलेल्या महापुरात जुन्या पुलाचे मोठे नुकसान झाले होते. पुलाला जोडणारा दोन्हीकडचा भाग वाहून गेला होता. पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाल्‍याने स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी प्रयत्न करून नवीन पूल मंजूर करून घेतला. त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

नव्या पुलाचे काम जरी पूर्ण झाले असले तरी पुलाला दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पूल केवळ शोभेचा बनला आहे. दोन्ही बाजूकडील जोड रस्त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून जमिनीचे संपादन करण्यात आलेले नाही. जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय कोणतेही काम करू देणार नाही, असा इशाराही जमीनमालकांनी दिला आहे. मूळात जमीन संपादन केली नाही तरी सुमारे ३५ कोटी खर्चाच्या पुलाचे बांधकाम करण्याचा अट्टाहास का केला, असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.

विकासकामे करताना, जमीन पूर्णतः संपादित केल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा खर्च करण्यात येऊ नये, असा सरकारी नियम आहे. असे असतानाही या ठिकाणी कोट्यवधींचा निधी खर्च करून पूल बांधण्यात आला. परंतु बांधलेल्या पुलाचा उपयोग मात्र प्रवासी व नागरिकांना होत नाही. उलटपक्षी प्रवासी व वाहनचालकांना जुन्या धोकादायक पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्रीकांत गणगणे यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.

पुलाच्या जोडरस्त्याबाबत आवश्यक असणाऱ्या जमीन संपादनाबाबत प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच रस्‍त्‍याचे काम सुरू करण्यात येईल आणि पूल वाहतुकीस सुरू केला जाईल.
बिरवाडी येथील पुलाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजी स्पष्टपणे दिसत आहे. जोडरस्‍त्‍यासाठी भूसंपादन होण्याअगोदरच पूल पूर्ण करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक आहे.