कोकणातील सुंदर अस दिवेआगर गाव
२० वर्षांपूर्वी या ठिकाणाचे नाव एकदम सर्वदूर झाले. पाटील यांच्या बागेत झाडांची आळी करताना एक तांब्याची पेटी मिळाली. ही वार्ता त्या इवल्याशा गावात वाऱ्यासारखी पसरली. गावचे सरपंच, प्रतिष्ठित मंडळी, पोलीस अशा सर्वांसमक्ष पेटीचे कुलूप तोडण्यात आले. आत गणपतीचा शुद्ध सोन्याचा मुखवटा सापडला! बरोबर एक तांब्याचा डबाही होता. त्यात एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा मुखवटा व २८० ग्रॅम वजनाचे गणपतीचे अलंकार होते. सापडलेली पेटी जमिनीखाली तीन फुटांवर असल्याने सरकारदरबारी जमा करण्याचा प्रश्न नव्हता. ही पेटी मंदिरात ठेवण्यात आली. सापडलेल्या पेटीचे बाबतीत तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतला. तेव्हाच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्यांनी पटवून दिले, की हा सांस्कृतिक ठेवा मूळ ठिकाणीच राहू द्यावा. त्या बदल्यात त्यांनी फक्त एक छोटे श्रेय मागितले. हा मुखवटा जिथे ठेवला होता, त्याच्यावर एक पाटी लिहिली गेली - “महाराष्ट्र राज्याच्या सौजन्याने”. दुर्दैवाने हा ठेवा चोरीला गेला. नंतर आरोपी सापडले. वितळवलेले सोने मिळाले; पण पहिला बाप्पा मात्र सापडला नाही. गणेशाच्या आगमनाने गावाचे भाग्य उजळले. दिवेआगरचा शांत, सुरक्षित सागरकिनारा पर्यटकांना सापडला. रूपनारायण आणि सुंदर नारायण यांच्या सुंदर मूर्तीही प्रकाशाझोतामध्ये आल्या. कोकणातील सर्व विष्णूमंदिरांमध्ये सर्वांत उंच व सुबक मूर्ती रूपनारायणाची समजली जाते. एका अखंड शिळेतून ही मूर्ति घडवली आहे आणि नवल म्हणजे मूर्तीच्या दोन्ही बाजूला चक्क दशावतार कोरले आहेत. हाही एक प्रकारचा खजिनाच आहे. आवर्जून पाहावी अशी ही मूर्ती आहे. रूपनारायण मंदिराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. रूपनारायण व सुंदर नारायण यांची मंदिरे नव्याने उभारली आहेत.
दिवेआगर हे मुळातच संपन्न गाव आहे. गावातील रस्त्यावर चिऱ्यांच्या दगडाची संरक्षक भिंत, त्यामागे मोठे घर, मागे नारळी, सुपारीची व केळीची वाडी. असे सुंदर गाव शोधून सापडणार नाही. बाप्पा प्रकट झाले आणि हे पर्यटनस्थळ म्हणून उजेडात आले. त्यामुळे पर्यटकांसाठी ‘होम-स्टे’ ही संकल्पना आली. पाहुण्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा वेगळ्या खोल्या बांधल्या आहेत. प्रत्येकाकडे नारळ, सुपारी, केळीच्या बागा आहेत. म्हशीही आहेत. त्यामुळे दूध-दुभतेही आहे. कमर्शियल हॉटेल्स त्या मानाने कमी आहेत.
दिवेआगर गाव