कोकणातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील रम्य बालपण

Payal Bhegade
02 May 2024
Blog

* रम्य ते बालपण **
** गावातील ते एप्रिल, मे महिन्यातील दिवस.**
माझे बालपण गावीच गेले..वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत सुरवातीची तेरा वर्षे फोंड्यात तर नंतरची चार वर्षे शिक्षणासाठी राजापूरला होतो.या सतरा वर्षातील एप्रिल अर्धा महिना आणि मे" महिना मात्र गावीच गेलेला आहे..मला कळायला लागल्यापासून हे सगळे
दिवस माझ्यासाठी धमाल दिवस होते.शाळेला सुट्टी असल्यामुळे मज्जाच मज्जा असायची..वाडी तेव्हा गजबजलेली होती..एप्रिल वीस तारखेनंतर वार्षिक परीक्षा संपल्यामुळे घराघरांत
तेव्हा पोरोटोरांचा भरणा असायचा ..या पोरा टोरात भर पडायची ती मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांच्या मुलांची.. .. तेव्हा आजच्या सारख्या वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे, व आर्थिक ओढाताण होत असल्यामुळे हे चाकरमानी वर्षातून एकदाच, म्हणजे मे महिन्यात मुलांना गावी घेऊन येत असत..ही मुले आली की ज्यांच्या घरात मुलबाळ नाहीत त्यांच्या घरात गोकुळ अवतरत असे..आजी आजोबांना या नातवंडांना कुठे ठेऊ नी कुठे ठेऊ नको असे होत असे .. आल्या आल्या ही मुले बाहेर पडायला थोडी अवघडत असत..मग काय त्यांचे हे अवघडलेपण बघून आजी किंवा आजोबा आमच्या पैकी कुणाला तरी बोलवायचे नी सांगायचे.." आमच्या अमोलला किंवा ऋतुराजला तुमच्यात खेळोक घेवा." या मुलांची नांवे सुध्दा एकदम माॅडर्न असायची..नाहीतर आमची नांवे, विठ्या,,नामगो,मारत्या दिगलो,दिलपो,वगैरे. आपल्या मुलखात तेव्हा सरळ नावाने हाक मारायची पद्धतच नव्हती ..एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे हौसेने कितीही आधुनिक नांव ठेवले तरी त्याचा विपर्यास करण्याचा आम्हाला परंपरागत अधिकार होता..त्यामुळे मुंबईहून आलेल्या या मित्रांच्या नावाचा आम्हीही विपर्यास करीत असू..अमोलचा " अम्या ",किंवा ऋतुराजचा " रुतगो किंवा रुतग्या होत असे..त्या मुलांना सुध्दा या नावाने हाक मारली की आनंद होत असे..जवळीक निर्माण होत असे..मुंबईहून ही मुले आली की दोन दिवसात आमच्यात मिसळत असत..आम्हांला मुंबईतील गंमती जंमती सांगत असत.मुंबईची माहिती देत असत आम्ही कित्येक जणांनी तेव्हा मुंबईचे दर्शनच घेतले नव्हते,त्यामुळे या शहरातील गोष्टींचे ,माहितीचे आम्हांला अप्रूप होते..याचबरोबर आम्हांला अप्रूप असायचे ते पिक्चरच्या गोष्टी ऐकण्याचे. ही मुले आम्हांला पिक्चरच्या गोष्टीही सांगत असत.गाणी म्हणून दाखवीत असत..तात्पर्य काय तर एप्रिलचे काही दिवस,व पूर्ण मे महिना ही सर्व मुले आमच्यातलीच होऊन जात असत.
दुपार झाली की आम्ही सर्व मुले मन्या आत्याच्या, म्हणजे कदमांच्या घरात जमत असू..कदमांच्या घराची मागची पडवी हा आम्हा मुलांचा अड्डा असायचा..चुकला ढाॅर धामापूरच्या तळ्यात या म्हणीप्रमाणे आमच्या पटेलवाडीत एक म्हण रूढ झाली होती." चुकला पाॅर कदमांच्या घरात".बराच वेळ होऊनही मुल घरी परतल नाही तर त्याला शोधण्यासाठी घरची मंडळी सर्वात अगोदर या घराला भेट देत असत.शेतालगत हे घर असल्यामुळे मागच्या पडवीतील दरवाजातून वारा अगदी सळसळत यायचा..आमचा दुपारचा आंब्याची "खिरमिट "करण्याचा कार्यक्रम याच घरात होत असे..ही खिरमिट करण्यासाठी आळीपाळीने कुणी घरुन लाल मसाला आणत असे,कुणी गुळ, तर कुणी गोडे तेल आणत असे..मीठ मात्र कदमांच्याच घरातले घेत असू..कधी खिरमिट तर कधी चुलीवर उकडलेल्या कच्च्या आंब्यांचे रायते.. आंब्यांच्या तेव्हा आमच्या या एकदम फेवरिट डिश होत्या..याच घराला खेटून चार भली मोठी आंब्याची झाडे होती..भरपूर चीक असणारा काजयाळा,मिरमिरीत वासाचा मिरमिट्या,साखरे सारखा गोड साख-या,आणि ढस्स आंबट आंबटोळा..अशी या आंब्यांची नावे होती..या सर्व आंब्यांवर मे महिन्यात पिवळे शेंदरी घड लागलेले दिसायचे.पण येथे आजूबाजूला घर असल्यामुळे दगडांनी ते पिकलेले आंबे पाडायला मज्जाव असायचा. या झाडांचा बुंधा लांब आणि रुंद असल्यामुळे चढून आंबे काढणेही मुश्कील होते..मग काय हे पिकलेले आंबे पडण्यासाठी वा-याची वाट पहावी लागायची..दुपारचे जोराचे वारे वाहू लागले की आम्ही कदमांच्या बांधावरुन पटापट उड्या मारून या आंब्यांच्या झाडाखाली जमायचो..आंबटोळ्या आंब्याखाली मात्र कुणीही फिरकायचे नाहीत..उर्वरित तिन्ही आंब्याच्या झाडाखाली पडलेले आंबे गोळा करुन आम्ही ते फस्त करायचो..कधी कधी वारा आला नाही तर आम्ही या आंब्यांच्या झाडाखाली उभे राहून वा-याची वाट पाहत," पड पड साख-या पड पड..पड पड काजयाळ्या आंब्या पडपड असे जोरात ओरडायचो..एवढे ओरडून या आंब्यांना दया आली नाही तर आम्ही कदमांच्या घरातून बाहेर पडायचो आणि आजूबाजूच्या शेतात फेरफटका मारायचो..शेतात तर खूपच आंब्यांची झाडे होती..या काही झाडांवर आम्ही चढून गदागदा फांदी हलवून आंबे पाडायचो..तर कधी दगड भिरकावून अचूक पिकलेले आंबे टिपायचो. टिकशेवरच्या (उंचीवरची फांदी)पिवळ्या धम्मक बिटक्या पाडण्यासाठी आमच्यात चढाओढ लागत असे..या आमच्या दगड भिरकावण्याचा आवाज ऐकून आंब्यांचा मालक किंवा मालकीन दुरूनच आवाज देत ओरडायची." कोणाची रे पोरा ती..उद्या ह्ये वाफ्यात पडलेले धोंडे काय तुमचे आवस बापूस निवडूक येणार हत..त्यांचा आवाज ऐकू आला की आम्ही तिथून पळ काढत दुसरीकडे जायचो.त्यावेळी आमच्या वाडीत हापूस आंबा क्वचितच नजरेस पडायचा..त्यामुळे रायवळ आंब्यांना तेव्हा खूप महत्व होते. हे आंबे लागले की मालक त्या आंब्यांच्या झाडांवर पाळत ठेऊन असायचे.या मालकांच्या दृष्टीस कुठल्याही परिस्थितीत पडायचे नाही अशी आम्ही मनात खूणगाठ बांधलेली असायची..त्यामुळे जरा कुठे आवाज आला की तिथून आम्ही फरार झालेले असायचो.तिथून फरार झालो तरी इतर ठिकाणे होतीच..इतर फळ झाडे होती..आंब्याची भूक भागली की आमची नजर लागलेली असायची ती फणस आणि जांभळांच्या झाडांकडे.
वाडीतील घराकडच्या आंब्या फणसाच्या झाडांवर आम्ही धाड मारु शकत नसल्यामुळे आमची टेहळणी चाललेली असायची ती शेतातील फणसांच्या झाडांकडे..ही झाडे घरापासून दूर असायची..त्यामुळे फणसाचे झाड लागले की त्या झाडाचा मालक झाडावर कुणी चढू नये म्हणून करवंदांची शिरडे तोडून झाडाचा पूर्ण बुंधा त्यांनी वेढून टाकायचा.( कुडाण) आम्ही या झाडांची टेहळणी करीत चाललेलो असतांना एखाद्या झाडावर फणस पिकलेला असेल तर वासाचा घमघमाट सुटलेला असायचा ..हा वास नाकात गेल्यावर आम्ही कसले गप्प बसतो..लगेच ते काटेरी कुडाण
बाजूला करायचो..मग आमच्यातील दोघे तिघे झाडावर चढायचे..प्रत्येक फणसावर टिचक्या मारायचे..टिचक्या मारल्यावर डबडब आवाज ,आणि वास येत असणारा फणस ते अलगद घेऊन खाली उतरायचे..रसाळ फणस असेल तर देठ हलवून त्या देठापासून फणसाची शाडे बाजूला करुन त्यातील गरे काढून ते खात असू..रसाळ गरे खाल्यावर अजीर्ण होऊ नये म्हणून तिथे जवळपास असलेल्या पवारांच्या घरात जाऊन पाणी पित असू..फणस कापा असेल तर टोकदार दगडांनी तो फोडत असू.दोन चार दिवसांनी एक तरी फणस खायला मिळालाच पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर असायचे.. आणि तो सुध्दा चोरून खाण्याची मजा काही वेगळीच असायची..सोन्यासारख्या रसरशीत पिवळ्या वर्णाचे ते मधाने भरलेले गरे बघून आमचे डोळे निवायचे ,आणि जीभ खवळायला लागायची..मग काय ते गरे खाण्यासाठी आम्हांला हे चौर्यकर्म करावे लागायचे..तेव्हा तर फणस लौकर पिकण्यासाठी आम्ही त्या फणसांचे देठ पिळवटून ठेवत असू..कधी फणस मिळाला नाही तर जांभळांवर तुटून पडत असू..जांभळे खाऊन आमची जीभ अगदी गर्द निळी होत असे..सूर्य मावळतीला झुकला की आमची ही शेतातील भटकंती संपत आलेली असायची..मग तिथून हळूहळू आमची पाऊले घराकडे वळायची..घरून बादली,काढणे, तांब्या आणि कपडे घेऊन आम्ही मळ्याच्या बावडीवर आंघोळ करायला जायचो..आम्हाला तेव्हा कधीतरी अंगाला हमाम साबण लावायला मिळायचा ..एरव्ही कपडे धुवायचाही साबण आम्हाला चालायचा ..अगदीच काही नसेल गुळगुळीत छोट्या दगडांने सालटे निघेपर्यंत अंग घासायचो..संध्याकाळची आंघोळ केली की एकदम तरतरीत होत होतो..आता वेध लागलेले असायचे ते रात्री टुरिंग टाॅकीजला पिक्चरला जाण्याचे.
फोंड्यात तेव्हा बाजार पेठेतील वहाळाच्या अलीकडे ,महेश केळुस्कर यांच्या घरासमोरील रस्त्याच्या पलिकडे भाऊ पटेलांच्या शेतात टुरिंग टाॅकीज उभी राहत असे..कधी तिथे तर कधी जुन्या बाजारपेठेतील वरवडेकर वाडीच्या समोर उंबरमळ्यात..या टुरिंग टाॅकीज मध्ये तेव्हा जुने झालेले हिंदी, मराठी चित्रपट दाखवले जात असत.रात्री दहा नंतर तेव्हा एक शो लावला जात असे..रात्री कुठला शो आहे याची जाहिरात बाजारात नाक्यावर बोर्ड लावून केली जात होती.त्याच बरोबर गाडीला कर्णे लावून स्पीकर वरुन गावात आणि आजूबाजूच्या गावात दिवसभर अनाउंसमेंट चाललेली असायची .." ऐका हो ऐका ..आज रात्रो ठीक दहा वाजता फोंडाघाट येथील यशवंत टुरिंग टाॅकीजमध्ये राजेश खन्ना आणि मुमताज या सुपरहिट जोडीचा सुपरहीट सिनेमा " अपना देश" अनाउंसमेंट चालू असतांना अधून मधून, रोना कभी नही रोना,कजरा लगाके,गजरा सजाके,दुनियामे ..वगैरे त्या सिनेमातील गाणी ऐकू यायची..सिनेमाची ही अनाऊंसमेंट ऐकू आली की घराघरात सिनेमाबद्दल चर्चा रंगत असे.मुंबईहून तेव्हा काही चित्रपट शौकीन चाकरमानी आलेले असल्यामुळे ते सदर चित्रपटाबद्दल माहिती देत असत..कधी कधी हे चाकरमानी पिक्चर पाहण्यासाठी पैसे ही देत असत..वाडीतील समस्त महिला तेव्हा मराठी सिनेमा पाहणे पसंत करीत..ते सुध्दा सुलोचना बाई आणि जयश्री गडकर यांचे..मोलकरीण, एकटी,थांब लक्ष्मी कुंकू लावते ,हे चित्रपट पाहून त्यांचे पदर ओले व्हायचे..आम्हांला मात्र कुठलाही पिक्चर वर्ज्य नसायचा..कुणी चाकरमान्यांने पैसे दिले किंवा नाही दिले तरी आम्हांला काहीही फरक पडायचा नाही..खिशात एक पैसा नसतांना तेव्हा आम्ही बहुतेक सिनेमा पाहत असू..वाडीत रात्री तेव्हा लाईट नसल्यामुळे आठलाच जेवण होत असे..त्यानंतर आम्ही कुण्या तरी एकाच्या घरात किंवा खळ्यात झोपायला जात असू..तिथून घरच्या लोकांचा झोपलेल्याचा अंदाज घेऊन आम्ही जोकया ( आंबाड्याच्या छोट्या काठ्या)घेऊन निघत असू.तिथे कुठे तरी जोकया ठेऊन सिनेमा तंबूच्या आसपास उभे राहत सिनेमातील संवाद ऐकत असू.आणि थोडा वेळ झाल्यावर त्या डोअरकिपरांची नजर चुकवून काळोखातील कुठल्यातरी कोपऱ्यातील तंबूचा पडदा अलगद वर करुन आत घुसून संपूर्ण चित्रपट बघून बाहेर पडत असू..पिक्चर बघून घरी जातांना जोकयांच्या उजेडात पिक्चरवर गप्पा मारीत घर गाठत असू.वारणेचा वाघ,संथ वाहते कृष्णा माई,धन्य ते संताजी धनाजी, हिंदी दोस्ती,दुश्मन, शराफत वगैरे सिनेमा पाहिलेल्याचे अजूनही आठवतेय..धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटात जेव्हा संताजी औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून नेतो तेव्हा त्या तंबूत झालेला जल्लोष आजही अंगावर शहारे आणतो..आम्ही सिनेमा बघून अंथरणात येऊन पडलो तरी तो सिनेमा काही डोळ्यासमोरुन हटायचा नाही.रात्री झोपतांना आमचे ठरलेले असायचे की सकाळी रानात करवंदाना जायचे.
रात्री आम्ही कितीही वाजता झोपलो तरी पहाटे पाखरांच्या किलबिलाटाने ,आणि वाडीतील कोंबड्यांच्या आरवण्याने जाग यायची...आमचे गाव दाजीपूरच्या अभयारण्याच्या खाली असल्यामुळे मे महिन्यात सुध्दा सकाळी गावात मस्त थंडी पडायची..खरतर तेव्हा अंथरूणात पडून रहावेसे वाटायचे,पण सह्याद्रीच्या "डाळ"या डोंगरात करवंदाला जायचे असल्यामुळे आम्ही झोप उडवून घरी जायचो..आणि चहा पिऊन झाल्यावर रोवळ्या घेऊन रमत गमत डोंगराच्या दिशेने चालू
लागायचो..चालतांना रानातील दूरवरच्या आंब्यावर कोकिळा साद देत असायची..वाटेला पांगारा आणि पळसाची लालबुंद तर कुड्याची पांढरी,पिवळसर झाक असलेली फुले नजरेस पडायची..कधी कधी पिकलेला आंबा दृष्टीस पडला तर आपोआप दगड उचलण्याकरिता हात खाली जायचा..आंबे पाडून ते खाल्ल्यावर खडकाळ पाऊल वाटेवरून अडखळत रान वेलींना ओंजारत गोंजारत पुढे जात असू.काही अंतर पुढे गेल्यावर करवंदांनी लगडलेली करवंदाची काटेरी झाळी आमच्या दृष्टीस पडली की आम्हाला अत्यानंद होत असे..ती काळी करवंदे अगोदर आम्ही चाखून बघायचो..आंबट असली तर दुस-या करवंदाच्या झाळीकडे निघायचो..काळे करवंद थोडेसे चावून पाहिल्यावर ते गोड लागले आणि आत मध्ये लालचुटूक दिसले की ती सर्व झाळ आम्ही अंगाला काटे लागले तरी खाली करीत असू..एकदा का रोवळी अर्धवट भरली की आम्ही घरी परतायचो..कधी कधी तर आम्हाला पिवळी तोरण (जांभळासारखे छोटे फळ) तर कधी चाराबोराही मिळायची.घरी आल्यावर आम्ही या रोवळीतील करवंदे इतरांना वाटत असू.स्वतः खात असू..या नंतर दुपारी जेवण झाल्यावर झाल्यावर वाडीत कुणाचे लग्न असेल तर मांडव उभा करायला,पताका लावायला जात असू.वाडीत एखाद्याचे लग्न असेल तर पुढे दोन तीन दिवस आमचे येणे जाणे सतत त्या घरात असायचे.वाडीतील सर्व लग्ने ही भावकीतील लग्ने असल्यामुळे आदल्या दिवशीच्या पुण्याहवाचन च्या कार्यक्रमा पासून लगीन घरातच आमच्या पंगती उठायच्या ..आणि तिथेच मांडवाखाली आडवे व्हायचो..लग्न झाले आणि वरात घरी आली की आम्ही मात्र पंगतीत वाढप्याचे काम करायचो..त्यावेळी पंक्तीचे श्लोक म्हणायचीही मला फार हौस होती..एकदा एका लग्नात वीस पंचवीस वडे आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीवर, शेराच्या भातावर ताव मारणा-या एका इसमाकडे बघून मी " कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला " हा श्लोक म्हटला तेव्हा ताव मारता मारता तावाने तो पंगती वरुन उठून माझ्या अंगावर धाऊन आला होता ..तर एकदा अगदी लहान असतांना मी पंक्तीत एक श्लोक म्हटला होता तेव्हा तर घरी गेल्यावर बाबांनी माझी चांगलीच कानउघाडणी केली होती.कुठेतरी ,कधीतरी कुणाकडून तरी ऐकलेला तो श्लोक पाठ करुन ठेवला होता..तो श्लोक असा होता..गोविंद गोपाळ हे दोघे बंधू,जेवत होते कडीभात लिंबू ..जेवता जेवता चमत्कार झाला, जेवणात उंदीर मुतोंनी गेला..पार्वती पते हरहर महादेव..हा श्लोक म्हटल्यावर पंगतीत हशा पिकला होता..शेवटचे कडवे नेमके काय होते हे मला कुठे ठाऊक होते ..मी जसे पाठ केले होते तसे म्हणून टाकले होते..लहान असतांना मला कोण शिकवेल तसा मी म्हणायचो.एकदा दहा मुले असणाऱ्या आमच्या वाडीतील पराक्रमी गृहस्थांच्या मोठ्या मुलाचे लग्न होते..तेव्हा मला एकाने " लाभो संतती संपदा पित्यासम तुम्हा लाभोतही तयासम सद्गुण.." असे मंगलाष्टक लिहून दिले होते.ते मी जोरात म्हटले होते...तेव्हा सुध्दा ओरडा खावा लागला होता ..या मंगलाष्टकात खरे शब्द होते ..लाभो संतती संपदा बहु तुम्हा लाभोतही सद्गुण ..असे होते.. वडिलांना दहा मुले असल्यामुळे " पित्यासम " हा शब्द त्या गृहस्थाने टाकला होता.मला कुठे खरे मंगलाष्टक माहित होते..कोण शिकवेल तस मी म्हणायचो..तेव्हापासून मात्र मी पंक्तीतचे श्लोक आणि मंगलाष्टक म्हणणे पूर्ण बंद केले आहे..अशा वेळी तेव्हा पंक्तीचे श्लोक म्हणतांना वा मंगलाष्टके म्हणतांना अजाणतेपणी ,अज्ञानातून गमती जमती घडायच्या.यामध्ये कुणाच्या शुभकार्यात मुद्दामहून विघ्न आणायचा प्रयत्न केला जात नव्हता.
'" मे " महिन्यातील आमचे आवडते खेळ म्हणजे "चोर पोलीस",आट्यापाट्या,सूरपारंब्या, काजू गलीत टाकणे,आणि गलीबाहेर पडलेल्या काजूंना एका मोठ्या काजूंने टिपणे..वगैरे .हो..पण हे खेळ खेळता,इतर उद्योग करता आम्ही घरची व शेतीशी संबंधित काम सुध्दा करीत होतो..पंचेचाळीस,पन्नास वर्षापूर्वी गावात तेव्हा पाण्याची फारच टंचाई असायची..बहुतेक विहिरी कोरड्या पडायच्या..ज्या विहिरींना पाणी असायचे अशा विहिरी घरापासून लांब होत्या..एक दिड मैलावर..पण करणार काय..पाण्यासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा..अशीच आमची अवस्था असायची..वणवण भटकावं लागायचे..आमच्या वाडीतील मळ्याच्या बावडेला चांगला झरा होता..अजूनही आहे..पण त्या विहिरीत कुणी पाणीच साठू द्यायचा नाही.रात्री दोन, तीन वाजल्यापासून लोक त्या विहिरीवर पाणी भरायला जायचे. एके दिवशी तर रात्री दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत कुणी पाणी भरायला येऊ नये म्हणून आम्ही मळ्यातील बावडीच्या वर नदीच्या पाशी चूड घेऊन फिरत होतो.पेटती चूड बघून पाणी भरायला येणारी माणसे भितीने माघारी फिरत होती..तेव्हापासून विहिरीत पाण्याचा साठा होऊ लागला ..आणि सर्वांनाच थोडे थोडे पाणी मिळायला लागले ..तर असेही उपद्व्याप तेव्हा करावे लागत होते..या अशा सार्वजनिक कामांबरोबर घरचीही कामे करावी लागत होती.त्यावेळी
घरातील आणि गोठ्यातील पडव्यांना तटक्या ( टाळ्यांचा आडोसा) पाहिजेत म्हणून घरच्यांबरोबर दोन अडीच मैलांवरील रानात जाऊन ऐन,नराम आदी झाडांचे टाळे तोडून त्यांची ओझी आणीत होतो..हे टाळे आणले की बाबांना तटक्या बांधायला,त्या उभ्या करायला मदत करीत होतो..त्याच वेळी उद्या नांगरट करतांना अडथळा नको म्हणून शेतातील दगडधोंडे गोळा करावे लागायचे.वाफ्यात डोकावणारी काटेरी झाडेझुडपे तोडावी लागायची..भाजावळ करण्यासाठी कवळे पसरुन टाकावी लागत होती.त्या काळी पाऊस तर मे महिन्याच्या वीस तारखेनंतरच हजेरी लावायचा त्यामुळे पेरणी पंचवीस पासूनच सुरु व्हायची..या पेरणीच्या कामात आम्हांला ढेपळे फोडावी लागत होती.मे महिन्यात शेतीची तेवढी जास्त कामे नसायची ..ती कामे जूनपासूनच सुरु व्हायची..तर ही झाली मे महिन्यातील त्या काळातील खेळांची आणि कामांची जंत्री..तर असा होता तो रम्य काळ ..आणि चैतन्याने दारिद्र्यात सुध्दा मुलांचे भावविश्व फुलविणारा ते एप्रिल आणि मे महिन्याचे दिवस.
तो काळ आता आठवणींच्या रुपात जागा आहे..आज गावांचा शहरीकरणाच्या दिशेने प्रवास चाललाय..काही लोकांनी गाव सोडून मुंबईला वा अन्य शहरात कायमचे वास्तव्य केले आहे..सणासुदीसाठी,उत्सवांसाठी त्यांचे फक्त येणे होते.वाडीतील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडतायत..गावात सुध्दा काॅन्व्हेंट स्कूलची चलती चाललीय.शेती करणे लोकांनी सोडून दिलय.आज सर्वसामान्य शेतकरी सुध्दा ट्रॅक्टरने शेती करायला लागलाय..जे शेती करीत नाही त्यांची जमीन वर्षानुवर्षे पडिक आहे..खंडाने सुध्दा कुणी शेती करायला तयार होत नाही..आंब्या फणसांच्या बाबतीत ही तेच..पूर्वी फाटयेत गवतात भरुन ठेवलेल्या रायवळ आंब्यांच्या आणि पिकलेल्या फणसांच्या ठेल्यांच्या वासाने प्रत्येक घर घमघमून जात होते..आज हापूस आंब्यांमुळे या रायवळ आंब्यांकडे लोक ढुंकून सुध्दा पहात नाहीत..फणस तर झाडावर पिकून गळून पडतायत.अतिशयोक्ती नाही पण त्या काळी घरात पोटगी नसलेल्या कित्येक घरांना या फणसाच्या भाजीने आंब्याच्या रायत्याने, कडीने पोटाला आधार दिला होता..त्यावेळी केवळ थ्रिल म्हणून आम्ही आंबेफणस चोरत होतो ..आजकाल आंबे फणस म्हणत असतील आम्हाला घेऊन जा म्हणून ..पण त्यांचे म्हणणे कुणाला ऐकू जातेय..गावातील मुलांना आता आंब्या फणसाचे काहीही अप्रूप राहिले नाही..ती मुल चायनीज वर तुटून पडतील..पण रस्यावरुन जातांना रस्त्यावरच्या एखाद्या आंब्याखाली पिकलेला आंबा पडला असेल तर तो उचलणार नाहीत..त्याला तुडवून पुढे जातील.आजकाल मोबाईल हेच त्यांचे विश्व झालेय.कुठलाही सिनेमा ते घरबसल्या बघू शकतात.खेळ खेळू शकतात..गावात हल्ली सरार्स लग्न तर हाॅलमध्येच होतात,त्यामुळे या मुलांना लग्नकार्यात वाढप्यांचे ,व इतर कामे करावी लागत नाहीत..शेती तर जोते आणि माणसे घालून केली जाते..आज सगळ सहज साध्य होत असल्यामुळे कष्ट करण्याकडे लोकांनी, या मुलांनी पाठ फिरवलीय..असो शेवटी प्रत्येक पिढी त्यांचे नशीब घेऊन जन्माला येते..आणि हे नशीब बदलण्याचे काम करते. सुधारत जाणारे तंत्रज्ञान ..तशी आताची पिढी त्यांचे आयुष्य छान एन्जॉय करतेय..पन्नास वर्षापूर्वी आम्ही सुध्दा आमचे आयुष्य असेच छान एन्जॉय केले होतेच की..अर्थात एन्जॉयच्या व्याख्या वेगवेगळ्या होत्या..शेवटी काय तर प्रत्येक जण आपआपले आयुष्य ज्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे जगत असतो ..मला फक्त याक्षणी एवढेच वाटते की या जगलेल्या आयुष्यात काहीतरी सांगण्यासारखं असावे..जे इतरांना नाही पण आपल्या मुलाबाळांना तरी मार्गदर्शक ठरेल.
खरच आज आयुष्याच्या या टप्प्यावर मी समाधानी आहे तो या अशा आठवणी सोबतीला आहेत म्हणून ..आणि या बालपणातील आठवणी म्हणजे व्रात्य,खट्याळ, हुड आठवणी ..या आठवणी आठवल्या की आपण सुध्दा काही काळ मनाने बालक होतो..आणि त्या अल्हड विश्वास सफर करुन येतो..एक हिंदी शेर आहे.
" बचपनसे साथ अभी छुटा नही है,
यह प्यार भरा दिल अभी टुटा नही है,
चाहत अब भी है,उस चाँदको छुनेकी,
बचपन के दिनोंको किसीने लुटा नही है.
विठ्ठल सावंत.