कर्ली नदी
निसर्गसौंदर्य.. किना-यावर मुलायम वाळूचे पट्टे, शेजारी संथ पाणी या सा-या वातावरणात कर्ली नदीचे विराट रूप पाहता येते. समुद्र किती आक्रमक होवो, कर्ली नदी आपली स्थितप्रज्ञता सोडत नाही.
कुडाळ – निसर्गसौंदर्य.. किना-यावर मुलायम वाळूचे पट्टे, शेजारी संथ पाणी या सा-या वातावरणात कर्ली नदीचे विराट रूप पाहता येते. समुद्र किती आक्रमक होवो, कर्ली नदी आपली स्थितप्रज्ञता सोडत नाही. सहय़ाद्रीच्या कडेकपारीतून समुद्राकडे धाव घेणा-या निर्मला-हातेरी नद्या पीठढवळमध्ये विलीन झाल्या की नदीपात्राचे रूप बदलते.
पण दूरनजीक या तिन्ही नद्या एकत्र होतात. त्या भागाला ‘तिसंग’ म्हणतात. येथून पुढे नदीपात्राला कर्ली नदी असे संबोधले जाते. पुढे कर्ली खाडी तारकर्ली येथे समुद्रात विलीन होते. या दरम्यानचा तिचा प्रवास आणि हजारो जीवांना तिने दिलेला आश्रय सर्वश्रुत आहेच. तिसंगानंतर कर्ली नदीपात्राच्या एका बाजूला परिसरात तळगांव, सोनवडे, वराड, पेंडूर, काळसे, धामापूर, देवली, देवबाग, तारकर्ली तर दुस-या तिसावर बावं, बांबूळी, सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवण, कवठी, भरणी, परूळे, आदी गावे येतात.
वास्तवत: या परिसराला तिसंग म्हटले जात असले तरी पीठढवळ नदीला हातेरी आणि भंगसाळ नदी एकाच ठिकाणी येऊन मिळत नाहीत. आधी हातेरी नदी भंगसाळमध्ये उडी घेते. मात्र, पीठढवळ आणि भंगसाळ किंवा निर्मला नदी ज्याठिकाणी एकत्र येते त्या संगमाच्या ठिकाणी एक छोटा ओहोळ येऊन मिळतो. तीन जलस्त्रोत एका ठिकाणी एकत्र येत असल्याने या जुव्याला तिसंग म्हणतात.
हा जवळपास १ किमीचा प्रदेश तिसंग म्हणूनच ओळखला जातो. या परिसरात गोडे कोंड, खारे कोंड, भिवतीचा वळ, गणेश कोंड, सारीची कोंड, नाटकोळणी, आदी डोह प्रसिद्ध आहेत. तीन नद्यांचे जल याठिकाणी एकत्र येत असल्याने आध्यात्मिकदृष्टय़ाही तिसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिसंग प्रदेशातील पाणी तिर्थोदक मानले जाते.
हे ठिकाण ‘क्षेत्रफळ’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ‘क्षेत्रफळ’या ठिकाणी वर्षातून एकदा महापूजेचेही आयोजन करण्यात येते. महोदय पर्वणीवेळी सोमवती अमावस्येला येथील कर्ली नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. कर्ली नदी याठिकाणी गंगेच्या स्वरूपातच मानली जाते. अस्थी विसर्जनासाठी हे गंगाजल पुण्यस्रेत मानले जाते. तर चतुर्थी गणपतीच्या काळात काही ठिकाणी कर्ली नदीमध्येही गणेश विसर्जन केले जाते.
समुद्रातील भरतीवेळी तिसगांपर्यंत खारे पाणी येते. या कर्ली नदीच्या परिसरात दोन्ही काठाला नारळ, सुपारी, आंबा या बागायती आहेत. त्यामुळे नदीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तिसंगाच्या आधी पीठढवळ नदी अणाव, पणदूर गावातून वाहत इथपर्यंत पोहोचते. विस्तीर्ण पात्र, आणि मुबलक पाणी यामुळे गावातील अनेकांना मासेमारीचा छंद जोपासता आला आहे. कर्लीच्या विस्तीर्ण आकारामुळे ब्रिटिश काळात तारकर्लीहून छोटय़ा होडय़ा आणि पडाव यांच्या माध्यमातून अणावपर्यंत व्यापार होत असे.
समुद्रातून मोठय़ा जहाजांमधून माल उतरवून पडाव अणाव बाजारपेठेपर्यंत येत. अलीकडे नदीचा भाग गाळाने भरल्याने पडावाचा हा प्रवास थांबला आहे. ब-याच वर्षापूर्वी नदीपात्र विस्तीर्ण नव्हते. यावेळी नदीच्या दुतर्फा औंदुबरांची झाडे मोठय़ा प्रमाणावर होती. याकाळी लोक या झाडांच्या नदीवर पसरलेल्या फांद्यांचा उपयोग करून पैलतीर गाठत, अशा आठवणी अनेक ज्येष्ठमंडळी जागवतात.
नदीकिनारी अणाव हुमरमळा राणेवाडी नजीक घोडोबा देवस्थान आहे. खडकाळ वळणे घेत पीठढवळ याठिकाणी खोल डोहात उडी मारते. नदी दगडांवरून डोहाकडे झेपावताना उरात धडकी भरविणारा आवाज परिसरात घुमतो. या परिसरात अभ्रक असलेले खडकही पाहायला मिळतात. यामुळे चकाकणा-या दगडांमध्ये शुभ्र फुलांचे तुषार पाहण्याची मौज काही वेगळीच असते. चांदण्या रात्री शुभ्र तुषार एक वेगळेच वातावरण निर्माण करतात. पाण्याचा पांढरा रंग आणि आवाज ही परिस्थिती म्हणजे घोडोबाची करणी असल्याचा प्रवाद लोकमानसात आहे.
कर्ली नदीच्या महासागराकडे होणारा प्रवास हा स्तीमित करणारा असाच आहे. लाखो जिवांची अन्नदात्री म्हणून कर्ली नदी-महासागर अरबी समुद्राला तारकर्ली भोगवे व पलीकडून देवबाग याठिकाणी जाऊन मिळते. मात्र, त्या आधी सोनवडेपासून या नदीचे पात्र विस्तारण्यास सुरुवात होते. सोनवडे या निसर्गरम्य गावात ‘सोनवडे जुवा’ हे ठिकाण कर्ली नदीवर आढळते, ते फारच प्रसिद्ध आहे.
‘सर्व बंध मोडूनी जेव्हा नदी धुंद होते..
मीलन वा मरण पुढते तिला नसे ठावे’
अशी अवस्था नदीची होते. गावागावातून राना-वनातून, डौलदार वळणे घेत, डोंगर काठी जन्म झालेल्या सरितेला पुढे ओढ लागते, ती महासागराची! मात्र या मधल्या टप्प्यांतही वेगवेगळ्या ऋतून या सरितेचे वैशिष्टय़पूर्ण दर्शन घडते. आषाढ कार्तिकेत रौद्र रूप तर अश्विन-कार्तिक महिन्यात आल्हादकारक रूप, आदींचा प्रवास तिच्या काठावरच्या लोकांना, प्राणिमात्रांना सुखावून जातो. कुठे या महासरितेला छोटा ओढा येऊन मिळतो तर कुठे मार्गात डोंगर पर्वताचा अडथळाही येतो.
आलेल्याचे स्वागत व अडथळ्याला पार करीत, या गंगोत्रीचे मार्गक्रमण सतत सुरूच राहते. पावसाळी धोकादायक पूरस्थितीत नको असलेली व शिव्याशापांना बळी ठरणारी ही सरिता नवरात्र-दीपावलीनंतर नवा साज घेऊन नटते. निसर्गाचा सुंदर साज घेऊन नितळ निळ्या पाण्यातही आकाशाचे प्रतिबिंब उमटते. एरव्ही चिखल माती आदीमुळे गढूळ असलेल्या या नदीला नंतर नितळपणा प्राप्त होतो. तळगांव-पणदूरहून कर्ली नदीचा प्रवास पुढे सुरू होतो. त्यानंतर या नदीस बांबुळी, बांव या गावांचा सहवास लाभतो.
बांबुळी गावाला तर कर्ली नदी तीन बाजूंनी वेढते. उरल्या एका बाजूस डोंगर आहे. बांबुळी परिसराला सुमारे ३ किमीचा सहवास या नदीचा लाभतो. त्यानंतर बांव व सोनवडे (तर्फ हवेली) व सरंबळ असे टप्पे कर्ली नदी गाठते. सोनवडे या सुमारे साडेआठशेच्या दरम्यान, असलेल्या ‘छोटय़ा’ लोक वस्तीच्या गावाला कर्ली नदीचा मात्र ‘मोठा’ सहवास लाभला आहे. येथील नदीमध्ये ‘सोनवडे जुवा’ हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
सोनवडेचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर नदीकिना-यालगत आहे. सोनवडेच्या नदी पलीकडे वराड हे मालवण तालुक्यातील गाव आहे. येथे बारमाही होडी वाहतुकीने दोन्ही गावात ये-जा सुरू असते. माघ महिन्यातील शिवरात्रीनंतर कर्ली नदी खा-या चवीची होते. सोनवडेच्या वेताळ या डोंगराला वळसा घालून ही नदी वाहत पुढे पश्चिमेकडे मार्गक्रमण करते.
सोनवडेत भवानी मंदिर, श्री संस्थान गौडाचार्य यांचा पुरातन मठ, आदी प्रसिद्ध देवस्थानेही आहेत. केवळ फोंडा गोवा यांच्यातर्फे सोनवडेतील मठ फार पुरातन असून या ज्ञातीचे जुने पीठ आहे. सोनवडे गावाला कर्ली नदीच्या सहवासामुळे निसर्गरम्यता व नितळ शांतता लाभली आहे. सोनवडेला मात्र मुसळधार पावसाळ्यात नदीचा शेती आदीला धोका संभवतो. पुराचे पाणी शेती खाचरात घुसते. सोनवडेनंतर सरंबळ या गावाला सुमारे ७ ते ८ किमीचा सहवास लाभला आहे. कर्ली नदीचे वैशिष्टय़ असे की, ही नदी येथून पुढे कधीही आटली नाही. फार फार तर नदीला उन्हाळ्याच्या वेळी ‘भाट’ पडू शकतो. सरंबळच्या विभागात येथील शेतक-यांनी भाजीपाला, सुपारी-माड बागायती आदीचे उत्पादन घेतात. येथील बांधकामासाठी लागणारी वाळू प्रसिद्ध आहे. मात्र उन्हाळ्यात होणा-या अतिरिक्त वाळू उपसामुळे कर्ली नदी काठच्या बागायती व शेतीला गेल्या काही वर्षापासून धोका निर्माण होत आहे.
कर्ली नदीमध्ये विविध प्रकारचे मासेही स्वैर पोहतात. ‘गुंजले’ नावाचे मासे तर पाण्याच्या वर उडय़ा मारतात. हे दृष्य होडीने प्रवास करणा-याला मनोहारी वाटते. या विभागात इतर विभागाप्रमाणे मासेमारीही होते. छोटय़ा पगाराद्वारे (होडीद्वारे) ही मासेमारी होते. सरंबळच्या पलीकडे खरारे-पेंडूर वराड ही गावे आहेत. सोनवडेत सातेरी मंदिर, ब्राह्यण देव मंदिर, गंगाबाई देवी मंदिर, माऊली मंदिर, आदी मंदिरे आहेत. बांव या गावापर्यंत कर्ली नदीचे पाणी खारं आढळतं. सरंबळ गाव कर्ली नदीच्या सहवासामुळे इतर गावांप्रमाणे निसर्ग समृद्ध आहे. या विभागापासून कर्ली नदीचे पात्र विस्तारित होते ते पुढे नेरूर वालावल, चेंदवण, कवठी आदी गावात आणखीनच विस्तारते. मालवण, कुडाळ तालुक्यांना जोडणारे उंच नेरूरपार पूलही याच परिसरात आहे.
नारळ, पोफळीच्या बागा, गर्द झाडे, विस्तीर्ण नदीपात्र, आणि भरपूर पाणी यामुळे हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात रमणारा पर्यटक या भागात आवर्जून येतोच. मराठीतील ‘चानी’ या चित्रपटाद्वारे येथील सौंदर्य संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आहे.
कर्ली नदी