आंबा म्हणजे फळांचा राजा...आणि हापूस या आंब्यामधला महाराजा...आंबा किंवा आमरस आवडत नाही असा माणूस जरा विरळाच...
पाडवा जसजसा जवळ येऊ लागला की आमच्याकडे आंब्याचे वेध लागतात...पण आंब्याचा खरा सिझन सुरू होतो तो अक्षय तृतीयेला...या दिवशी आंब्याची पहिली पेटी घरात येऊन पडते आणि मग पुढचे सलग दोन महिने आंब्याचा हा सण आणि आमरसाचा सोहळा अविरत सुरू असतो...
अस्सल हापूसला आपली स्वतःची ओळख सिध्द करून द्यायला आधारकार्डाची गरज नसते...घरात फक्त एक जरी अस्सल हापूस आंबा घरात असेल तर उंबऱ्यातूनच एक पाऊल घरात टाकल्याटाकल्या त्याचा घरभर पसरलेला घमघमाट त्याची शान अधोरेखित करतो...त्याचा तो अस्सल मधाळ सुगंध तनामनात एक चैतन्य फुलवू लागतो...त्याचा तो मधुर दरवळ अंगातला कण अन कण रोमांचित करून टाकतो...
मी काही आंब्यामधला अभ्यासक नाही किंवा त्यातलं मला काही फारसं ज्ञान नाही पण माझे आंब्यावरचे प्रेम हे इतकं आहे की वर्षभर आंबा या विषयावर मी वाटेल तो अभ्यास करू शकतो...यांच आंब्याच्या प्रेमापोटी अस्सल कोकणी हापूस आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी आम्ही बऱ्याचदा कोकणातील विविध भागात अगदी असुरे सारख्या दुर्गम ठिकाणीही काही स्थानिकांच्या घरी दोन चार दिवस जाऊन मुक्कामाला राहिलेलो आहोत...तिथल्या स्थानिक लोकांशी बोलताना आणि इतरही बऱ्याच ठिकाणी वाचताना आंब्या विषयी खूप माहिती गोळा झालेली आहे...
आता हापूस हे नाव का पडलं तर एका अल्फान्सो नावाच्या पोर्तुगीज माणसाने या कलमाचा शोध लावला म्हणून त्याला अल्फान्सो म्हणतात आणि त्याच नावाचा अपभ्रंश होत पुढे आता त्याला हापूस असे नाव पडलं...
आता अस्सल हापूस कसा ओळखायचा? रत्नागिरी हापूस श्रेष्ठ की देवगड श्रेष्ठ?...कर्नाटकी हापूस आणि कोकणी हापूस यामधला फरक काय?...तो कसा ओळखायचा?...नैसर्गिकरित्या पिकलेला आणि रासायनिकरित्या पिकवलेला आंबा यांत फरक तो काय?... यावर बराच उहापोह होतो... कोकणातील अनेक लोकांशी बोलताना या हापूस विषयी वेगवेगळ्या प्रकारची माहिती हाती पडते...
इतर कोणताही हापूस आणि कोकणी हापूस यांच्यात मुळातच फरक असतो...खऱ्या हापूसची खरी चव मिळते ती कोकणातल्या लाल मातीच्या डोंगरउतारावरच्या आंब्याच्या झाडाला लागलेल्या आंब्याला...वर्षभर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचे तडाखे झेलत तालुन सुलाखून निघालेला हा आंबा म्हणजे माधुर्य चवीचे अफाट साम्राज्य...दुसरा कोणताही आंबा गोड असला तरी अस्सल कोकणी हापुसचे माधुर्य त्याला नाहीच...कर्नाटक मध्ये किंवा इतरही ठिकाणी गेलेला हा हापूस आंबा खरंतर आपल्या कोकणातले कलम तिकडे नेऊन सपाट जमिनीवर वाढलेल्या झाडाचा आंबा...त्या हापूस आंब्याचे झाड फारसं उंच नसतं तर कोकणातील हापूस आंब्याच झाड त्या मानाने खूप उंच असतं...आजूबाजूच्या राज्य सरकारने त्यांच्या स्थानिक आंबा उत्पादकांना खत वगैरे मध्ये बऱ्याच सवलती दिल्यामुळे आणि त्यात आंबा हा फारसा उंचावर नसल्याने त्या आंब्याचा काढणीचा खर्च कमी लागतो...एकाच झाडाला अनेक फळे येतात...एकंदर सर्व बाबींमुळे त्याचा उत्पादन खर्च कमी असतो आणि सहाजिकच तो स्वस्तात उपलब्ध होतो...याउलट कोकणात अगदी विपरीत परिस्थिती असते...आंब्याचे झाड उंच असल्याने मजुरांची आवश्यकता असते...त्यात खतांचा खर्च यामुळे उत्पादन खर्च जास्त येतो आणि त्यामुळे तो साहजिकच महाग मिळतो...
आता रत्नागिरी, देवगड की सिंधुदुर्ग हा प्रांतवाद काय आपल्याला कळतं नाही...आणि हापूस आंब्यालाही थोडीच ते काही कळतं असणार?...माझ्या दृष्टीने हापूस देवगडचा असो वा रत्नागिरीचा तो आमचा अस्सल कोकणी हापूस असतो...लताबाई आणि आशाबाई दोन्ही मंगेशकरचं पण त्यातलं सरस कोण हे आपल्या सारख्या अतीसामान्य पामराने कसं सांगावं...आपण फक्त मन लावून गाणं हृदयात साचवत नतमस्तक व्हावं...तसच काही या कोकणी हापूस आंब्याच...रत्नागिरी की देवगड हा फारसा विचार न करता त्या आंब्यावर आपला जीव ओवाळून टाकावा...
आता असं म्हणतात की आंबा सुरू झाला की तो खायला सुरुवात करावी देवगड हापूस पासून...सगळ्यात आधी देवगडच्या हापूस आंब्याच्या आमरसाने रसनेला अभिषेक घालावा मग रत्नागिरीचा आंब्याचा प्रसाद जिभेला दाखवावा...मग रायगडचा आंबा मनसोक्त चाखायला घ्यावा...चिपळूण आंब्याला हात लावावा तो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणि सर्वात शेवटी आपण आपल्या अलिबागच्या आंब्याला शरण जावं...पुढे मग इतरही ठिकाणचे आंबे आहेत पण कोकणातील आंब्याने आपण इतके तृप्त झालेलो असतो की आता आपल्याला दुसऱ्या कोणत्याच चवीची अपेक्षा नसते...
आपल्या देवगड/रत्नागिरी कोकणी आंब्याचे बरेच काही वैशिष्ट्ये आहेत...हा आपला कोकणी आंबा पिकत असताना तो त्याच्या आतून पिकत बाहेर येतो त्यामूळे तो हातात घेतला की जरासा गरम आणि वजनदार लागतो...या आपल्या अस्सल हापूस आंब्याची साल ही पातळ असते...इतर आंबा बघा त्याची साल जाडसर निघते...आपला कोकणी हापूस पिकला की त्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते पण तेच दुसऱ्या ठिकाणचा हापूस असेल तर तो आंबा पिकला तरी हाताला टणक आणि त्याच्या अंगावर अजूनही तुकतुकी दिसून येते...आपला हा देवगड रत्नागिरी हापूस हा काहीचा हिरवा आणि पिवळसर केशरी असतो तर तोच इतर ठिकाणचा आंबा हा सर्व बाजूने अगदी ब्रशने पेंट केल्यासारखा एकाच रंगाचा असतो...आपला हाच हापूस आंबा कापला की आतून केशरी निघतो पण दुसरा कोणताही हापूस असेल तर तो आतून पिवळसर असतो...आपल्या हापूस आंब्याला फक्त जरासं नाकापाशी धरा त्याचा तो घमघमाट 'मीच आहे राजा' हे खणखणीत आवाजात सांगतो पण हेच तुम्ही दुसरा कोणताही हापूस घ्या, तो आख्खा आंबा नाकात कोंबला तरी कोणताही गंध येत नाही...अजून एक, असं म्हणतात की अस्सल हापूस देठ बघून घ्यावा...यामागचं कारण मात्र माहीत नाही पण देठा भोवती बारीक बारीक पांढरे डाग असतील त्या आंब्याला हातही लावू नये...
आणि सर्वात शेवटी येते ती म्हणजे चव...दुसरा कोणताही हापूस कितीही गोड असला तरी त्यात चवीचं माधुर्य नसतं...आंबा गोड असणं वेगळं आणि त्या गोडीत माधुर्य असणं वेगळं...आपल्या देवगड हापूस आंब्याच्या आमरसाचा जिभेवर चमचाभर अभिषेक करताच ती जी काही अफाट चव असते ना ती तुम्हाला एक स्वर्गीय आनंद देऊन जाते...नुसताच आमरस पिणं आणि आपल्या देवगड, रत्नागिरी हापूसचा आस्वाद घेणं यांत जमीन अस्मानाचा फरक आहे...आपल्या माधुरी ऐश्वर्याची मजा त्या ऍंजला ज्युलिला थोडीच येणार आहे...ती नजाकत, ती अदा फक्त त्या अस्सल अभिजात सौंदर्यातचं...
एक अदभुत अस्सल चवदार माधुर्य आणि दर्जेदार सुगंधीपणा हीच आपल्या कोकणी हापुसची ओळख असते...
कोकणातला हापूस आंबा