गावठी बुटक्या मिरचीचे बियाणे वापरून केलेल्या , मस्त खडकडीत वाळवलेल्या आणि व्यवस्थित माल मसाला ( भरपूर हिंग ,मोहरी ,हळद मीठ ,) भरून केलेल्या चविष्ट सांडगी मिरची तळून कोणाला आवडत नाहीत ? हे जितके वाचायला सोपे आणि तोंडाला पाणी सुटणारे वर्णन आहे तितकेच करायला अतिशय त्रासदायक आणि कष्टाचे काम आहे .
तर सुरवात होते अश्या बुटक्या गावठी मिरची मिळवण्या पासूनच ! कारण ह्या खास मिरच्यांची शेती करणारे कमी झाले आहेत आणि मागणी जास्त आहे . म्हणुनच ह्या मिरच्यांची किंमत ही अर्थात जास्त च असते .अर्थात जे ह्याच मिरच्या वापरून करतात त्यांना मिरच्या कमी पडतात. जे साध्या मिरच्या वापरून करतात त्यांना अमाप पीक असते.तर मुळात प्रथम ह्या मिरच्या मिळवण्या साठी गावोगावी फोन करून आल्या आहेत का मिरच्या ? हे सतत चौकशी करत राहणे .मग कोणीतरी सांगतो हो हो अताशी सुर वात होतेय .मिळतील थोड्या फार .कोणतरी म्हणतो नाई हो ताई ह्या वर्षी बुरशीचा रोग पडला उत्पन्न नाई हो यंदा तितके ! गेल्या वर्षी लई होते ......( गेल्या वर्षी याच कारणाने मला मिळाल्या नव्हत्या अजिबात ) आपण हो ही म्हणून परत ये रे माझ्या मागल्या म्हणत अजून फोन फिरवायचे आणि प्रयत्न करत राहायचे . मग कोणी तरी म्हणतो की ताई आहेत आहेत ५ किलो मिळतील चालतील का ? अरे दे बाबा मला २० ते २५ किलो हव्या आहेत .सुर वात तर कर .मग तो कुठे तरी कोणाकडे तरी ठेवून देतो असे म्हणतो .तेही आपल्यावर उपकार केल्यासारखे च .म्हणजे पैसे पण द्या आणि उपकार पण घ्या हा प्रकार असतो . ( ह्या वर्षी या सगळ्या प्रकाराला कंटाळून मी ही थोड्या फार प्रमाणत आमच्या शेतात ह्या मिरच्या लावल्या .पण त्या जास्त न लावल्यामुळे या वर्षी तरी हे सगळे नाटक करणे जरुरी झाले आहे .) ह्या मिरच्या मिळतायत हे समजले की आधी काम करणाऱ्या बायकांना सांगावे लागते की बायांनो मिरच्या मिळत आहेत सगळी तुमची कामे सोडून ताबडतोब या कामाला ! त्या बायका आल्यावर ह्या मिरच्या ना लागणारी तयारी करायला सुर वात होते . त्यात जो काही माल मसाला लागणार आहे भरायला, त्याची तयारी करणे .कारण आधी तयारी केली आणि मिरच्या मिळाल्या नाहीत तर केलेली मेहनत फुकट जावू शकते .त्यामुळे मिरच्या मिळाल्यावर मोहरी उन्हात खडकडीत वाळवणे, ती वाटून त्यात योग्य प्रमाणात पण जरा जास्तच हिंग, मीठ ,हळद घालून मसाला तयार करणे .हेही योग्य वेळेत करावे लागते नाहीतर मिरच्या सुकू शकतात.
आता हे सर्व जुळून आले की actual मिरच्या चिरायला व भरणे हे काम सुरू होते. .मिरच्यांचे डेख थोडे कापून काढून त्या मिरचीला एक आडवी चीर द्यायला लागते .मग त्यात तयार केलेला मसाला भरायला सुरवात होते. हे काम तसे किचकट असते कारण छोट्या मिरची मध्ये दाबून दाबून मसाला भरणे आणि त्या नीट लावून ठेवणे. हे काम खरं तर सोनार काम म्हणतात तसे काम आहे . बायका ना चक्क झोप येते हे काम करताना म्हणून मग बरोबर तोंडाचा पट्टा चालू होतो .आता हे सर्व नीट वाळे पर्यंत दररोज उन्हात ठेवणे आणि काढणे .
आता ह्या सगळ्या मेहनती नंतर हातात final product किती येत तर जेमतेम 25 टक्के .कारण उन्हामुळे सगळे पाणी उडून गेलेलं असते .त्यामुळे हे सर्व करतानाच मनाची तयारी करावी लागते की मिळणारे फळ ये अत्यल्प असणार आहे नंतर नाराज होऊन चालणार नाही .
पण..... या सगळ्या नंतर त्या सुकलेल्या मिरचीचा घमघमाट आणि ती तळल्यावर त्याची असणारी चव सगळ्या केलेल्या कष्टांना विसरायला लावते .
अशी ही सांडगी मिरचीची साठा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण !!!!!!!!
शिल्पा नितीन करकरे.
तुरळ.संगमेश्वर
सांडगी मिरची एक सोहळा