सिंधुदुर्गकरांनी अनुभवली नौदलाची ताकद

Payal Bhegade
05 Dec 2023
Blog

ओरोस (जि.सिंधुदुर्ग) - तेजस, मिग, डॉर्निअर, मिग -२९, चेतक आदी लढाऊ विमाने व हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी तारकर्ली येथे साजरा झालेल्या भारतीय नौदल दिनाने अधिक उंची गाठली. सहा हजार फूट उंचीवरून भारताचा तिरंगा हातात घेऊन पॅराशूटद्वारे कार्यक्रमस्थळी उतरलेले सहा मरीन कमांडो, लढाऊ विमानांच्या कसरती, शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठीचे ‘एएसडब्ल्यू’ हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक यांसह नौदल कमांडोंनी सादर केलेल्या कसरती सिंधुदुर्ग भूमीवरून भारतीय नौदलाची ताकद दाखविणारी ठरल्या.

मालवणमधील तारकर्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित भारतीय नौदल दिन सोमवारी साजरा झाला. महाराष्ट्र पर्यटन केंद्राच्या नजीक झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नौदल प्रमुख आर. हरी कुमार उपस्थित होते.

नौदलाच्या ताफ्यातील युद्ध नौकांनी तारकर्ली समुद्रात सायंकाळी संचलन केले. लढाऊ विमाने व हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांचे, पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

पालकमंत्रीन कडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा -

मालवण - नौदल दिन आणि राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य महनीय व्यक्तींच्या दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दुचाकीवरून फिरत आढावा घेतला.

नौदल दिन व शिवपुतळा अनावरण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर उतरणार असल्याने याठिकाणी नागरिकांना त्यांना पाहता यावे, यासाठी जयगणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्यांची व्यवस्था केली होती. याचाही आढावा पालकमंत्रीनी घेतला.

युद्धनौका व हेलिकॉप्टरच्या कसरती

नौदलाचे मरीन कमांडो पॅराशूटमधून खाली उतरताच प्रात्यक्षिकांना सुरुवात.

आकाशात तेजस, डॉर्निअर, मिग -२९ के आदी विमानांना कसरती केल्या.

समुद्रात तयार केलेली शत्रूचा चौकी बॉम्बच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून मरीन कमांडोंनी क्षमता दाखवून दिली.

युद्धनौकांवरून होणारे हल्ले, शत्रूच्या हल्ल्याचा सामना करणे, समुद्री चाचांवर कमांडो हल्ला करणे, समुद्री बचाव, हेलिकॉप्टर कसरती अशा विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

देवबाग येथील खोल समुद्रातील ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू युद्धनोकेवरून काही लढाऊ विमाने समुद्रातून आकाशात झेपावत होती. कसरती पार पडल्यानंतर ही विमाने ‘विक्रमादित्य’वर पुन्हा परतली.

मदतीची वाट पाहणाऱ्या मच्छीमार आणि सैनिकांना धनुष हेलिकॉप्टरमध्ये हवेतल्या हवेत ‘एअरलिफ्ट’ करण्यात आले.

तारकर्ली नौदलमय : -
कायम गजबजलेला मालवण, तारकर्लीचा समुद्रकिनारा आज चिडीचूप आणि नौदलमय झाल्याचे दृश्य दिसले. मुंगीही शिरू शकणार नाही, असा बंदोबस्त शहर परिसरात होता. मालवण, तारकर्ली, देवबाग या परिसरात हॉटेल, दुकाने बंद होती. रस्त्यावर पोलिस आणि नौदलाचे कर्मचारी, अधिकारी सोडून कोणीच दिसत नव्हते. नौदलाच्या साथीला राज्यभरातील पोलीस बळ दाखल झाले होते. मुख्य कार्यक्रमावर नौदलाचे पूर्ण नियंत्रण होते.

हजारोंची गर्दी : -
दांडी ते देवबागपर्यंतच्या किनारपट्टीवर प्रात्यक्षिके पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. त्याने संपूर्ण किनारपट्टी गजबजून गेली होती. सुरक्षेच्या करणास्तव ‘एमटीडीसी’ येथील मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी होती.

लक्षवेधी रोषणाई : -
कार्यक्रमात सूर्यास्तावेळी राष्ट्रगीताची व ‘सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताचीही धून वाजविली. त्यानंतर समुद्रात युद्ध नौकांवरील सुरू झालेली रोषणाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तसेच किल्ले सिंधुदुर्गावर लेसर रोषणाई केली होती.