गणेशोत्सवाला कोकणातील चाकरमान्यांसाठी ४४ विशेष रेल्वेगाड्या सोडणार

Payal Bhegade
28 Aug 2023
Blog

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने ७४ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४४ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असून उर्वरित रेल्वेगाड्या नागपूर, पुण्यावरून सुटणार आहेत.मुंबई-सावंतवाडी दैनिक विशेष (४४ फेऱ्या) गाड्या चालवण्यात येणार आहेत. ०११३७ विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत रोज रात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. ०११३८ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान रोज दुपारी २.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.
नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष १२ फेऱ्या, पुणे-कुडाळ विशेष ६ फेऱ्या, पुणे-थिविम/कुडाळ-पुणे ६ विशेष फेऱ्या आणि पनवेल-कुडाळ/थिविम-पनवेल दरम्यान ६ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या फेऱ्यांची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच समाजमाध्यमावर उपलब्ध आहे.