महाराष्ट्राला अतिशय सुंदर निसर्ग, दऱ्याखोऱ्या, ऐतिहासिक किल्ले, विलोभनीय समुद्रकिनारे आणि यासोबतच समृद्ध करणारा इतिहास लाभला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात पाहण्यासाठी बरेच काही आहे. महाराष्ट्रात दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देतात.
समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळांसोबतच महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले पाहण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. कोकणातील समुद्रकिनारे पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. परंतु, कोकणात नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक किल्ले देखील आहेत. आज आपण कोकणातील या खास अन् ऐतिहासिक असणाऱ्या काही किल्ल्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
जयगड किल्ला :
रत्नागिरी जिल्ह्यात हा जयगड किल्ला स्थित आहे. या किल्ल्याला विजय किल्ला असे ही म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात जवळपास १३ एकर क्षेत्रात हा किल्ला पसरलेला आहे. ६ व्या शतकातील हा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून २० किमी अंतरावर हा किल्ला स्थित आहे.
हा किल्ला पहायला गेल्यावर तेथील लाईटहाऊसला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. या किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला अथांग समुद्रकिनाऱ्याचे विलोभगनीय दृश्य दिसेल. जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या.
कुलाबा किल्ला :
अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या २ किमी अंतरावर असणारा हा किल्ला पर्यटकांना भुरळ घालतो. कुलाबा हा किल्ला चारही बाजूंनी अथांग अशा समुद्रकिनाऱ्याने वेढलेला आहे. विशेष म्हणजे हा किल्ला ३०० वर्षे जुना आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेला आहे.
हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला बोटीने जाण्याची गरज नाही. तुम्ही अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यापासून चालत म्हटले तरी त्या किल्ल्यावर सहज पोहचू शकता. निसर्गप्रेमींसाठी हा किल्ला म्हणजे एक पर्वणीच आहे. ३०० वर्षे जुन्या असलेल्या या किल्ल्याचे काही अवशेष आणि बुरूज सध्या शिल्लक आहेत. तुम्ही जर कोकणात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर, या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या.
कोकणात फक्त समुद्रकिनारेच नाहीत, तर ऐतिहासिक गडकिल्लेही आहेत