केशवराज मंदिर
दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.वर आसूद गाव आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज ( विष्णूचे ) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्री.ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते. गर्द झाडीत वसलेलं हे मंदिर साधारण १००० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना उत्तम असून बांधकाम दगडी आहे.
देवळाच्या आवारात दगडी गोमुख आहे. तेथून १२ महिने पाणी वाहत असते. गोमुखाच्या वरच्या टेकडीवर नैसर्गिक झरा आहे व तेथून दगडी पन्हाळीमार्फत देवळापर्यंत पाणी आणले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस मारुती तर उजव्या बाजूला गरुड आहे. मंदिरातील विष्णूमूर्ती तर फारच सुंदर आहे. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चार आयुधे आहेत.
या ठिकाणी कार्तिक महिन्याच्या पहिल्या एकादशीपासून उत्सव सुरु होतो, तो त्यानंतर सुमारे ५ दिवस चालू असतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद असतो. दुसऱ्या एकादशीपासून ३ दिवस उत्सव असतो तर त्रयोदशीला प्रसाद असतो. देवधर, दीक्षित, ढमढेरे, दातार, दांडेकर, आगरकर, गांगल यांचे केशवराज कुलदैवत आहे. याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून श्री.ना.पेंडसे या महान लेखकाने ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी लिहली तो हाच परिसर होय. गारंबीचा बापू या चित्रपटात लाकडी पुलापासून ते नारळी-पोफळींच्या बागांपर्यंतचे चित्रीकरणदेखील या परिसरातले आहे.
केशवराज मंदिर
