मालवण शहरातील मेढा भागातील कालनिर्णयकार जयवंत साळगांवकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जय गणेश मंदिराची किर्ती सर्व दूर पसरली असून हे स्थळ एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. या मंदिरातील रिद्धी सिद्धी गणेशासहित असणारी गणेशाची सोन्याची लोभस मूर्ती पाहून मन प्रसन्न होते.
ज्योर्तिभास्कर जयवंत साळगांवकर हे जसे गणपतीचे निस्सिम भक्त आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री पण गणेश भक्तच आहेत. आपल्या मातोश्रींच्या इच्छेनुसार जयवंत साळगांवकर यांनी आपल्या राहत्या जागेत सुंदर अशा गणेश मंदिराची उभारणी केली. दरवर्षी माघी गणेश जयंती दिवशी या मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या मंदिरामुळे मालवणच्या पर्यटनात भर पडली असून अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
मालवण शहर परिसरात भरड भागातील दत्त मंदिर, जरीमरी, सातेरी, नारायण मंदिर, सोमवारपेठेतील मारुती मंदिर, बाजारपेठेतील गायमुख येथील गणेश मंदिर, मेढा भागातील चर्च, त्याचप्रमाणे रांगोळी महाराज मठ, धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मंदिर, भरड येथील गजानन मंदिर ही मंदिरे पाहण्याजोगी आहेत .
जय गणेश मंदिर मालवण शहरापासुन अर्धा किमी अंतरावर असलेलं "जयगणेश मंदिर" हे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव "जय गणेश" असे ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभार्यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर
दिणारा हा सुवर्णगणेश सिद्धी-बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल,तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद, लेखणी असून गणेशाचे पारंपारीक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे.मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. मकर संक्रांतीच्यावेळी सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळाळून निघतो यावेळी विशेष गर्दी असते
जय गणेश मंदिर
