वेळणेश्वर शिव मंदिर

Payal Bhegade
20 Apr 2023
Devotional

वेळणेश्वर शिव मंदिर

अतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच . गुहागरकडून दक्षिणेला तवसाळमार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत, बुधल, वेळणेश्वर अशा समुद्र किनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात. घाट वाटेने गाडी समुद्रसपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची गाज आपल्या कानी पडायला लागते . आणि मग अचानकपणे एखादं शिव मंदिर आपल्यासमोर येतं.
कोकणातील अनेक मंदिरे पेशवेकालीन आहेत. बहुतेक मंदिरे अठराव्या-एकोणिसाव्या शतकात बांधलेली असून त्यांची स्वतःची एक स्थापत्यशैली आहे असे म्हणता येईल. वेळणेश्वर हे गाव गोखले, रास्ते, गोवंडे, वेलणकर, घाग या मंडळींचे मूळ गाव मानले जाते.
श्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ दोन हजार वर्षे जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालभैरव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथं श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरु ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास चार हजार घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो ही एक श्रद्धा आहे.
श्री वेळणेश्वराचा उत्सव हा महाशिवरात्रीपासून तीन दिवस चालतो. इथं लघुरुद्र, अभिषेक, दुधाचा अभिषेक अशा विविध पूजा केल्या जातात. इथं असलेल्या गणपतीच्या मंदिराच्या खिडकीत असलेली जाळी ही नागाच्या आकारातील आहे.
कोकणातील मंदिराच्या दीपमाळा नेहमीच खूप आकर्षक पद्धतीने बांधलेल्या असतात. इथेही त्या आवर्जून पाहाव्यात अशाच सुंदर आहेत. पेशवेकालीन बांधकामातील महिरपी आकाराच्या कमानीही नक्की पाहाव्यात.
श्री वेळणेश्वर हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे – चापेकर, चाफेकर, आचार्य, कातरणे, गोखले, बडे, बर्ये, लेले, रास्ते, वेलणकर (काश्यप गोत्रातील), वेलवडकर, व्यास, पाळंदे, अधिटकर, थोरात, देसाई, पलुसकर, पाऊलबुद्धे, पुराणिक (गार्ग्य गोत्रातील), मरुकर, मुरुगकर, वैद्य, म्हसकर, शास्त्री, सुतारे, गोवंडे, भातखंडे (काही भातखंडे श्री व्याडेश्वर कुलदैवत मानतात) सावरकर या कुटुंबांमध्ये कुलदैवत म्हणून श्री वेळणेश्वराची पूजा केली जाते.