गुहागर तालुक्यातील बुधल गावाची गंमत म्हणजे गाव टप्प्यात येईपर्यंत आपल्याला समुद्रकिनारा दिसत नाही आणि अचानक समुद्राचे दर्शन होते, जसे ताजमहाल पाहताना आपल्या अंदाज नसतो. पुढे ताज ताज म्हणजे नेमके काय आहे आणि अचानक अवाढव्य ताज उभा राहतो अगदी तशीच अनुभुती बुधल गावचा समुद्र किनारा समोर उभा ठाकला की देतो. हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गाने बुधल गावाला दिला आहे.
तुम्हाला जर हॉलिवूडला जायचे असेल तर लाखो रुपये खर्च येतो; पण जर अतिशय कमी खर्चात, हॉलिवूडपेक्षा लय भारी अशा समुद्रकिनारी भेट द्यायची असेल तर सरळ बुधल गाव गाठायचे. गुहागर तालुक्यातील बुधल गाव, याला बुधल सडा असेपण म्हणतात. बुधल गाव, बुधल सडा किंवा बुधलकोंड हे सरासरी पर्यटन नकाशावर नाहीत. गुहागर-वेळणेश्वर रोडवरून उजवीकडे वळणारा फाटा अडूरजवळ बुधलकडे जातो जे सुमारे ३०-४० कोळी लोकांची पारंपरिक घरे असलेले गाव, साधारण १२०० वर्ष जुने आहे.
‘बुधल’ हे नाव समुद्राशेजारील क्षेत्र दर्शवते. प्राचीन काळी याला ‘बुद्धिग्राम’ किंवा ‘बुद्धदुर्ग’ असेही म्हणत. हे एकेकाळी भरभराटीचे बंदर होते; पण आता तिथे फक्त कोळी समाज राहतो आणि मासेमारी करतो. गावातील तरुण पिढी नोकरीधंद्यासाठी पुणे-मुंबई येथे आहे. गावात शिरण्यापूर्वी तुम्हाला डाव्या बाजूला एक पाखाडी लागते. साधारण दीडशे पायऱ्या वर गेल्यावर डोंगरात दुर्गादेवीचे मंदिर आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे, असे स्थानिक गावकरी सांगतात आणि पूर्वी सोन्याचे कळस होते. तेथून संपूर्ण गुहागरचा समुद्र दिसतो. तिथे फोटोग्राफी केल्यावर थेट डोंगर उतरून गावात जायचे. तिथेच एक मोठा सडा आहे.
सडा म्हणजे कातळाची टेकडी आणि अफाट समुद्र. तुफान वेगात तो या कातळाला धडका देत असतो. काही ठिकाणी तर खडक चिरला गेला आहे. मस्त फोटो काढल्यावर आता मात्र रूपेरी वाळू आणि निळा हिरवा रंगाचा जणू पाचू कलरचा साडी नेसलेला बीच खुणावतो. असा रंग कोकणातील फार थोड्या बीचला लाभला आहे. बीचकडे जाताना कोळी घराच्या गल्ल्या गल्ल्या ओलांडत जातानासुद्धा फोटोग्राफरसाठी लुभावणारी दृश्ये पाहायला मिळतात. कोणी वृद्ध कोळी तुटलेले जाळे विनंती असतो तर कोळी आजी आदल्या दिवसाचे वाळवलेले मासे पालटत असतात. लहान मुले बिनधास्त समुद्रात उंचावरून उड्या घेत असतात. कोळी स्त्रिया घरातील कामे करत असतात आणि हळूच तुम्ही सोनवाळूमध्ये प्रवेश करता, अशी सोनेरी वाळू , हे गुहागरच्या समुद्राचे वैशिष्ट्य आहे.
अशी हुबेहूब वाळू, भुवनेश्वर किनारी आढळते आणि राजस्थानमध्ये जैसलमेरला. अलगद पायाला गुदगुदल्या करत वाळू तुम्हाला समुद्रात घेऊन जाते. या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुरक्षित बीच. अगदी लहान मुलेसुद्धा पुढपर्यंत जाऊ शकतात. कधीही बुडण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. समुद्र शांत असेल तर इथं समुद्राचा तळसुद्धा दिसतो. येथील सनसेट पाहायला विसरू नका कारण, अप्रतिम रंगाचा खेळ अनुभवता येतो. याच किनाऱ्याला थोडे पुढे चालत गेले तर छोटे छोटे कातळ आहेत. त्यावर बसून चित्रपटात पाहतो तसे नजरे क्लिक क्लिक करता येतात. या गावातच आफ्रिकेतील बाओबा नावाचे झाड आढळते.
साधारण सात लोकांनी घेर केला तर तेवढा घेर या झाडाचा आहे. स्थानिक नाव गोरखचिंच असे म्हणतात आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यात फार क्वचित ही झाडे दर्शन देतात. तिथे कोणालाही फोटो काढायला मजा येते. बीचवर जाताना वाटेतच आहे. या बीचचे मला आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे हा बीच फारसा कोणाला माहित नाही. त्यामुळे अतिशय गर्दी कमी, नसतेच कोणी म्हणाना. स्वच्छ समुद्रकिनारा आणि कोळी लोकांची लगबग. थोडक्यात, हॉलिवूड , थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गाने बुधल गावाला दिला आहे. कधी भेट दिलीत तर खाण्याच्या वस्तू घेऊन जा. तिथे एकही हॉटेल नाही आणि नाही तेच बरं.
गुहागर तालुक्यातील बुधल गाव