एस्टी

Payal Bhegade
23 May 2024
Blog

काय त्या तुमच्या एस्ट्या....केव्हाच वेळेवर नसतात...! पावसात तर बसायलाच नको थपा थपा गळात असतात.......ही वाक्य कायम कायम एस्टीचे कर्मचारी म्हणून आम्हाला ऐकावी लागतात... प्रवासीजनहो अगदी बरोबर आहे तूमच , तुम्हाला चांगली सेवा देण हे आमच आद्यकर्तव्य आहे. मान्य आहे काहीवेळा या कारणामुळे आपणाला नाहक त्रास सहन करावा लागतो.
पण मला विचारायचय तुम्हाला... आपणाला होणार्‍या त्रासाला आम्ही कर्मचारीच फक्त जबाबदार आहोत काय हो?? एस्टी वर टिका किंवा तक्रार करताना आपण सुजाण नागरीक कसे आहोत हे व्यवस्थित पटवून देताय मग एस्टी ज्या मार्गावरून मार्गक्रमण करते त्या खराब रस्त्याबद्दल आपण का बोलत नाहीत? खराब रस्त्यामुळे वारंवार होणार्‍या मार्गबिघाडाबाबत का जागृती दाखवत नाहीत? अवैध वाहतूकी बद्दल का बोलत नाहीत? वस्तीच्या ठिकाणी चालक-वाहकांच्या चांगल्या सोयी सुविंधासाठी का पुढाकार घेत नाहीत? गावोगावात जाणारे रस्ते धड चालायच्या स्थितीत नसताना पण एस्टी जाते त्यावेळी का गप्प असता? रस्त्यावर वाढलेल्या झाडाझुडपामुळे एस्टीचं अतोनात नुकसान होत असताना पण कर्तव्यात कसून न ठेवता सेवा देत असतो तेव्हा का गप्प बसता? गावात रस्ता नसेल पण एस्टी पाहीजे मग याबात आपली काहीच जबाबदारी नाही का? जर आम्ही खराब सेवा देतोय म्हणून आम्हाला जाब विचारणार असाल तर तोच जाब खराब रस्त्याबद्दल संबधीत आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना, संबधीत सरकारी अधिकार्‍यांना पण विचारण्याची तयारी नक्की ठेवा. लक्षात ठेवा हे आज या उद्या त्या आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलताना दिसतील आपल राजकारण साधतील पण एस्टीचा प्रामाणिक कर्मचारी निवृत्त होयीपर्यंत मात्र प्रवासी हेच दैवत समजून प्रवास हिता साठीच कार्यरत असताना दिसेल. जखम दिसत असेल तर त्यामागे वेदना पण असतात हे जाणून घेतलच पाहीजे . जखम बरी करण्याबरोबरच वेदना पण कमी करता आल्या पाहीजेत तरच त्या अौषधाचा उपयोग असतो.
रस्ते कितीही खराब असुद्या, ईंधनाचे भाव किती पटीने वाढूद्या, अवैध वाहतूक अराजकता माजवू द्या पण आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी, नोकरदाराला शहरात सोडण्यासाठी शेतकर्‍याला शेतमालाच्या विक्रीसाठी आणि बर्‍याच जणांना आपल्या ईच्छित स्थळी पोहचवण्यासाठी आमची तूमची आपल्या सर्वांची लालपरी रस्त्यावर अविरत सेवा देताना दिसेल.
खर तर तुम्हाला होणार्‍या त्रासाबद्दल आम्ही दिलगिर तर आहोच आणि आपणाला होणारे त्रास कमी करण्यासाठी कटीबद्ध पण आहोत. पण तुमच्या सर्वाच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे.... धन्यवाद