विठोबा, तुकोबाराय अन् मिरची… असे पडले खोपोलीच्या विठ्ठल मंदिराचे नाव ‘बोंबल्या विठोबा’
अलिबाग : खोपोली जवळील ताकई विठ्ठल मंदीर हे बोंबल्या विठोबा नावाने प्रसिध्द आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. यात्रे निमित्ताने लाखो भाविक ताकई येथे दाखल होत असतात. त्यामुळे या मंदिराला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते.
तुकाराम महाराजांमुळे या विठ्ठल मंदीराला बोंबल्या विठोबा असे नाव पडले. यामागे एक अख्यायिका आहे. या मंदीर परिसरात भरणाऱ्या यात्रेत तुकाराम महाराज मिरचीचा व्यवसाय करण्यास येत असत. पण काही लोकांनी तुकाराम महाराजांचे मिरची विक्रीतून येणारे पैसे बुडवले. त्यामळे बोंब मारून त्यांनी पांडूरंगाचा धावा केला. तेव्हा साक्षात पांडूरंगाने दर्शन देत बुडालेले पैसे परत मिळवून दिले. तेव्हा पासून या विठ्ठल मंदीराला बोंबल्या विठोबा असे नाव पडले.
रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांना आषाढी वारी करता येत नाही. त्यामुळे कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील विवीध भागातून दिंड्या या मंदीरात दाखल होत असतात. या निमित्ताने इथे पंधरा दिवस यात्रा भरवली जाते. कार्तिकी एकादशीला या यात्रेची सुरूवात होते. राज्यातील विवीध भागातून शेतकरी त्यांनी उत्पादीत केलेला माल येथे विक्रीसाठी आणत असतात. मसाले, गृहउपयोगी वस्तू, कपडे, भांडी, सुकी मासळी यांची विक्री होत असते. यातून करोडो रुपयांची उलाढाल होते. शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. दरम्यान विविध उद्योग धंदे लागल्याने एक वेगळीच रेलचेल पहायला मिळते.
या यात्रेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे देखील याच यात्रे दरम्यान मसाल्याचा व्यवसाय करण्यासाठी येत असत. या मंदीरात वर्षभर दिवसरात्र अखंड वीणावादन सुरू असते. चार कुटूंब वर्षभर पाळीपाळीने वीणा वादन करत राहतात. देवस्थान समितीने ही परंपरा निरंतर सुरू रहावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
खोपोलीच्या विठ्ठल मंदिर
