रामेश्‍वर मंदिर

Payal Bhegade
25 Apr 2023
Devotional

रामेश्‍वर मंदिर

रामेश्‍वर मंदिर, मालवणपासून अवघ्या सात-आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कांदळगावचे रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो.
सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्‍वर त्यांच्या स्वप्नात आले. "मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर.
" रामेश्‍वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे शिवपींडी शोधावयास निघाली. जंगलमय, सखल भाग, कांदळवन, पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्‍वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या 'शिवाजीचा वड' म्हणून ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव यांचे नाव अधिक दृढ करणारा आणि या नात्याची आजच्या पिढीला साक्ष देणारा असा हा उत्सव. रामेश्‍वर पंचायतन सकाळी वाजत गाजत बाहेर पडते. पालखी, तरंगे व वारीसुत्रांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालेली ही स्वारी मार्गातील कामरादेवी, सीमा म्हारतळ, मारुती घाटी यांना सांगणे करून पुढच्या प्रवासाला निघते. गांगोचा अवसर कोळंब खाप्रेश्‍वराला भेटायला जातो. कोळंब पुलावर रामेश्‍वराच्या स्वारीचे शाही स्वागत होते. त्यानंतर मेढा जोशी महापुरुष मांडावर देव स्थिर होतात. या मांडावर इतर वारीसुत्रे विसर्जित होतात. मात्र रामेश्‍वराचा अवसर विसर्जित होत नाही. दुपारी श्री देव रामेश्‍वर आपल्या लवाजम्यासह जोशींच्याच होडीने सिंधुदुर्ग किल्लयावर जातो. किल्ल्यात प्रवेश करताना २१ नारळ फोडले जातात. हा सोहळाच अपूर्व असा असतो.