धूतपापेश्वर शिवमंदिर

Payal Bhegade
25 Apr 2023
Devotional

धूतपापेश्वर शिवमंदिर

धूतपापेश्वर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे.[१][२] राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.पाप धुऊन काढणारा ईश्वर म्हणून धूतपापेश्वर. सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून मंदिरही प्राचीन आहे. प्रशस्त असा सभामंडप, अंतर्गृह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते. प्रवेशद्वारावर नगारखाना व आवारात दीपमाळा आहेत.
मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून देणारा मृडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा एक नितांत सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते.वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे. त्याला “कोटितीर्थ" म्हणतात .
राजापूरच्या परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता. परिस्थितीने गरीब असूनही जे काही मिळेल त्यावर तो समाधानी होता. काशीविश्वेवर दर्शन आणि गंगास्नान करण्यास हे शिवभक्त दरवर्षी काशीला जात असत. परंतु वृद्धापकाळामुळे पुढे इतक्या दूर जाववेना.
त्यांच्याकडे एक गाय होती. तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली. रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायीच्या गुराख्याने रागातच त्या खडकावर कुऱ्हाडीचा घाव घातला. त्या खडकाचा एक खडपा उडून विशालगडजवळच्या कासर्डे गावी जाऊन पडला, आणि त्याचे 'कपालेश्वर' लिंग झाले. मूळ खडक त्याच स्थानी राहिला. निळो भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले. त्यांना खूप वाईट वाटले कारण शिवलिग भंग झाले त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्यांना वाटले.आजही ते स्वयंभू शिवलिगं तुटलेलेच आहे.
खडक फोडल्यावर ती गाय पळू लागली. तिने मंदिराच्या शेजारील डोहात उडी घेतली (कोटीतीर्थात). निसीम्म शिव भक्त असलेले निळोबा भटांना खुप वाईट वाटले शिवलिगं भंग आणि पवित्र गाईचा मृत्यू यास आपणच जबाबदार आहोत असे म्हणून पापाचे प्रायश्चित म्हणून निळोबाही धावले आणि त्यांनीही कोटीतीर्थात देहविसर्जन केले. अशी ही भावपूर्ण आख्यायिका आहे.
हे शिवमंदिर प्राचीन आहे. सुरूवातीला नगारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ लाकडी द्वारपाल, त्यानंतर दिंडी दरवाजा, त्यातून आत गेल्यावर देवडी, देवडीच्या भिंतीवर पेशवेकालीन चित्रकला प्रकारातील धार्मिक आशयाची चित्रे आहेत.
मंदिराचा जिर्णोद्धार झाला त्यावेळी मंदिराचं शिखर हे राजस्थान मधून ढोलपूर दगड आणून नागर शैलीत करण्यात आले. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपारिक रचना आहे. सभामंडप हे लाकडी नक्षीदार खांबावर तोललेले असून पारंपारिक चौपाखी कौलारू छप्पर आहे. देवाचा गाभारा मात्र काळ्या दगडात असून त्याची रचना व कला उच्च दर्जाची आहे. गाभार्‍यातील शिवलिंगाचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामागे धार्मिक संदर्भ आहे. समस्त राजापूरकरांचं आराध्य दैवत असलेले श्रीधूतपापेश्वर हे जागृत देवस्थान आहे.