दाभोळ

Payal Bhegade
17 Jun 2023
Blog

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर भार प्राचीन काळापासून अनेक बंदरे अस्तित्वात होती. या बंदरातून जगातील रोम, इराक, मस्कत, इजिप्त, अरब, खंबायत, दीव, मलबार यांसारख्या अनेक देशांशी व वंदरांशी व्यापार चाले. ही सर्व व्यापारी केंद्रे श्रीमंत असून, इथे परदेशातून येणारा माल घाट मार्गाने भारताच्या कानाकोपऱ्यात जाई. या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे भडोच , कल्याण , चौल , दाभोळ , देवगड , वेंगुर्ला , गोवा अशा प्राचीन नावासह ही बंदरे भरभराटीस आली. यातील प्रमुख प्रसिद्ध असणारे बंदर म्हणजे ‘दाभोळ’ होय.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असणारे दाभोळ हे प्राचीन काळी, दाल्भेश्वर शिवमंदिर तथा दालभ्य ऋषींच्या वास्तव्याने दालभ्यवती नगरी म्हणून ओळखले जायचे. क्लॉडियस टॉलमी या जगप्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ व भूगोलवेत्याने दुसऱ्या शतकात तयार केलेल्या जगाच्या नकाशात दाभोळचे. स्थान दाखविले आहे. कालांतराने पालीपटमी, खिजराबाद, मुस्तफाबाद यासारखी नावेही मुस्लीम राजवटीत दाभोळास होती. इ. स. ६ व्या शतकात कोरलेली पन्हाळेकाझी येथे असणारी बौद्ध लेणी याच्या प्राचीनतेची साक्ष देतात. जैनराजे, यादव, खिलजी, बहामनी, आदिलशाही, पोर्तुगीज, मराठेशाही या सतांनी दाभोळवर वर्चस्व गाजवले.
यादव कालखंडापासून दाभोळ येथे अरबी घोड्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. याठिकाणी सुंदर हवेल्या, कलाकुसरीची मंदिरे व मशिदी अस्तित्वात होत्या. दाभोळ हे वाशिष्ठी नदी खाडीच्या उत्तर तीरावर पायथ्याशी वसले असून, मोठी जहाजे येथील धक्क्यास लागत.यातून उतरणारा व्यापारी माल छोटी जहाजे व नावातून खाडीमार्गे चिपळूण बंदरात घेऊन जात येथून तो बैल, घोडे, उंट यांच्या पाठीवर लादून कुंभार्ली घाटातून देशावर जाई. अशा महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण व देखभालीसाठी दाभोळच्या दक्षिणेस टेकडीवर खाडीच्या मुखाशी अंजनवेल ऊर्फ गोपाळगड किल्ला आणि चिपळूण बंदराच्या रक्षणासाठी गोवळकोट ऊर्फ गोविंदगडाची उभारणी करण्यात आली.
खुद्द दाभोळातही एक मजबूत किल्ला असल्याचे उल्लेख सापडतात. आज त्याच्या थोड्याफार खुणा शिल्लक आहेत. आदिलशाही काळात दाभोळचे वैभव शिखरास पोहोचले असून, हज यात्रेस जाणारे दक्षिण भारतातील मुस्लीम यात्रेकरू येथूनच मक्केस रवाना होत, त्यामुळे दाभोळास ‘बाबुल ए-हिंद’ म्हणजेच मक्केचा दरवाजा असे संबोधले जायचे.
आदिलशहाची शाहजादी आएशाबिबी हिने साधारणपणे इ. स. १६५९ मध्ये पंधरा लक्ष रुपये खर्चून उभारलेली माँसाहेबची मशीद स्थापत्यकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. अफजल खानाच्या वधानंतर इ. स. १६६० मध्ये जानेवारी अखेरीस शिवछत्रपतींच्या सैन्याने दाभोळ जिंकले. या व्यापारी बंदरातून रेशमी कापड, नारळ, तांदूळ, तांबे, गहू, तेलबिया, सुपारी, साखर, मिरी, मसाल्याचे पदार्थ यासारख्या शेकडो वस्तूंची ने-आण होत असे. त्यामुळे अनेक राजवटींमध्ये असे वैभवशाली संपन्न शहर ताब्यात ठेवण्यासाठी आपापसात लढाया झाल्या. यात मोठ्या प्रमाण तोफा बंदुकांचा वापर करून शहराची जाळपोळ, नासधूस व लूट करण्यात आली.
‘स्वर्गीय सुखाचा अनुभव देणारे शहर’ असा ऐतिहासिक उल्लेख असणाऱ्या दाभोळचा, नंतरच्या काळात जंजिरेकर सिद्दी व मराठे यांच्या युद्धात हा भाग रणक्षेत्र बनला. याचा परिणाम व्यापारावर होऊन तो मंदावला. हळूहळू ब्रिटिश काळात दाभोळचे महत्त्व कमी होऊन त्याची जागा मुंबई बंदराने घेतली.
प्राचीन दाभोळ शहराच्या वैभवाचे इ.स. १५०८ च्या पूर्वीचे ‘दाभोळ हे मोठे दखल घेण्यासारखे किनाऱ्यावरील संपन्न शहर असून, तेथून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. येथे भव्य चिरेबंदी वाड्यासारख्या इमारती आहेत. त्यांच्या भोवताली घरे आहेत. येथे भक्कम तटबंदीचा किल्ला असून, किल्ल्यात ५०० तुर्की असलेली ६००० ची शिबंदी (सैनिकांची तुकडी) आहे’ असे वर्णन आढळते. यावरून प्राचीन दाभोळ बंदर हे पाचशे वर्षांपूर्वी, आजच्या मुंबई बंदरासारखे अत्यंत महत्त्वाचे असे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते याची साक्ष पटते.