कोकणातील गरम पाण्याचे झरे

Payal Bhegade
02 Jun 2023
Blog

कोकणातील गरम पाण्याचे झरे

कोकणातील एक प्रमुख जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख. हा भाग मौर्य, नळ, शिलाहार, चालुक्य अशा राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. पुढे पोर्तुगिजांनी हा भाग काबिज केला. मात्र मराठ्यांनी पोर्तुगिजांच्यापासून पुन्हा या भागाची मुक्तता केली. मात्र ब्रिटीशांनी त्यांचा वरवंटा या भागावरुन फिरवला. त्यांच्याच काळात १८३२ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पुढे स्वातंत्र्यानंतर सावंतवाडी संस्थान मुंबई प्रांतात (त्यावेळच्या बाँबे प्रांतात) विलीन करण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच रत्नागिरी जिल्हा निर्मितीही करण्यात आली. त्यानंतर १९८१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करुन सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
कोकण म्हणजे एक आश्चर्यच आहे. याच कोकणात कुणी सांगितले पाणी पेटते आहे. आमच्या इकडे केवळ पाण्याचे झरेच झुळझुळ वाहत नाहीत तर गरमा-गरम पाणी खळखळत असते. गरम पाण्याच्या स्नानासाठी तुम्हाला धावाधाव करावी लागणार नाही. आमच्या येथे गरम पाण्याच्या नद्याच झुळुझुळु वाहत असतात. कितीही तास स्नान करा आणि कधीही या, तुमच्यासाठी वर्षाचे बाराही महिने आमची सेवा चोख आहे.?असे आमच्या मुलखातल्या ‘उन्हवरे’ गावच्या माणसाने सांगितले. तर आश्चर्यचकित होऊ नका. तो आपल्या शब्दाला मागे येणार नाही. कारण या गावात उकळते पाणी असलेली नदीच आहे.?याचा मुख्य जलस्रोत तर सदानकदा रटरटतच असतो. येथील पाण्याचे तापमान आहे ७० अंश सें.पेक्षा अधिक! निश्चितच कुठेतरी आग धगधगत असणार असे सर्वानाच वाटेल; पण असा कोणताही अग्नी प्रज्वलीत नाही. तरीही येथे अविरत गरम पाणी वाहते आहे. येथे अंडे सहज पाण्यात सोडावे आणि उकडलेले अंडे थेट खायला घ्यावे, वस्त्रात गुंडाळलेली तांदळाची पुरचुंडी या पाण्यात काही मिनिटं ठेवावी म्हणजे स्टीम राईस तयार.. ही निसर्गाची नवलाई अनुभवायची तर दापोली ते मंडणगड असा प्रवास करायला हवा. येथील फरारीच्या खाडीची परिक्रमा करायला हवी.
गरम पाण्याचा जलस्रोत पाहणे म्हणजे धगधगत्या अग्निकुंडात पोहोचण्यासारखेच आहे. येथे म्हणे दिवसरात्र पाणी पेटत असते. भूगर्भातील या आश्चर्याने ‘ऊन्हवरे’ गावाला सुखी केले आहे. या गावातील कोणाही व्यक्तीला त्वचाविकार नाही. असे छातीठोकपणे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. तेव्हा गावाचा अभिमान वाटतो.
खरं तर गरम पाण्याचे झरे अनेक ठिकाणी असल्याची आपल्याला माहिती असेल; पण दापोलीतील ‘उन्हवरे’चा हा जलस्रोत दिवसरात्र रटमटत असतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण झरा असे याला म्हणावे लागेल. येथील पाणी एवढे गरम आहे की, त्याचा फटका सामान्यांना बसू नये यासाठी भोवताली भिंत बांधून कुंड स्वरूपात बंदिस्त करण्यात आले आहे. कोकणचा प्रदेश श्रद्धेने भारलेला आहे. यामुळे पेटत्या पाण्याला दंडवत घालणारी मंडळी कमी नाहीत. हे स्थान आता पर्यटनस्थळ म्हणून गजबजले आहे. महाराष्ट्रात विविध भागांत ३२ ठिकाणी गरम पाण्याचे झरे जागृत असल्याची माहिती मिळते. त्यापैकी आठ जलस्रोत राज्याच्या पठारी भागात म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यात तर उरलेले सर्व जलस्रोत कोकणात आढळतात.
कोकणची वैशिष्टय़पूर्ण भूशास्त्रीय रचना व इतिहास यास कारणीभूत आहे. कोकणातील उन्हवरे नकाशावर पाहिल्यास ते एका जवळपास सरळ रेषेत उत्तर-दक्षिण असल्याचे दिसते. कारण उत्तर-दक्षिण असलेल्या भ्रंशरेषेला धरून हे उन्हाळे आहेत. सातवली ,उन्हेरे पाली (गणपती),सव मुंबई-गोवा महामार्ग महाडजवळ जिथे सावित्री नदीला खेटून जातो तिथे नदीपल्याड जो हिरव्यागार देवराईसारखा परिसर दिसतो तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत.
तुम्हाला कोणी विचारले की, पाणी आग ओकू शकते काय? तर ‘उन्हवरे’ गावात पोहोचल्यावर हे आश्चर्य अनुभवायला मिळते. यासाठी खेड-दापोली रस्त्यावर पन्हाळे काजी लेण्याकडे जाणारा रस्ता धरावा. पुढे या रस्त्याला दोन फाटे फुटतात. उजवीकडील फाटा पन्हाळेकाजी लेण्याकडे जातो. डावीकडचा उन्हव-याकडे जातो. रस्ता पुढे पुढे उतरताना आपण फरारीच्या खाडीवर पाहोचतो. येथे दुरूनच कुठेतरी आग लागल्याचा भास होतो. जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्य दिसते. आपली उत्सुकता वाढते. कधी एकदा येथे पाहोचतो असे होऊन जाते.
मूळ स्रोत असणारे कुंड रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे. येथील पहिल्या कुंडातील तापमान ७० अंश सें.ग्रे.पेक्षाही अधिक. हात घातला तर भाजून जाईल. त्यामुळे या कुंडाकडे सावधतेने जायला हवे. वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुस-या कुंडात नेले आहे. तापमान कमी असल्याने तेथे स्नानाचा आनंद घेता येतो.
गाववाल्यांनी अलीकडेच येथे महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी सोय केली आहे. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा तयार झाला आहे. या चिखलात अधूनमधून गाई- गुरे रुतून बसतात व मृत्यूला सामोरी जातात. गरम कुंडाचे पाणी फरारीच्या खाडीला जेथे मिळते तेथे पाण्याचे तापमान ४० अंश सें.ग्रे. एवढे आहे. त्याच्या थोड्या वरच्या अंगाला पाण्याचे तापमान ३५ अंश सें.ग्रे. आहे. अशा गरम पाण्यातही शंख-शिंपले, मासे फिरताना पाहून आश्चर्य वाटते. जणूकाही माशांना या धगीचे काहीच वाटत नसावे.
गंधकयुक्त अशा पाण्यामध्ये त्वचारोग बरे करण्याचे गुणधर्म आहेत. यासाठी येथे स्नानगृहेही बांधण्यात आली आहेत. या मुख्य स्रोतापासून काही अंतरावर चुकून जरी पाय ठेवला तरी पाय भाजतो. या परिसरात काही सरपटणारे प्राणी पोहोचले तर त्यांना मृत्यूशिवाय गत्यंतर नाही. या गरम पाण्यात गावातील सर्वच जण आंघोळीसाठी नित्यनेमाने येतात. गरम पाण्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून थंड पाण्याच्या जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने येथे पाणी सोडले जाते. उर्वरित पाणी पाटाने समुद्राच्या दिशेने सोडण्यात आले आहे.
या गरम पाण्यात फिरताना मिळणारी उब अनुभवायची, याचा मनस्वी आनंद घ्यायचा असेल तर येथे तांबडे फुटताना पोहोचायला हवे. म्हणजे या गरम पाण्याचा मनसोक्त आस्वाद आणि अनुभूती घेता येईल. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात गरम वाफेतील आंघोळ हा अनुभव थरारक असेल. या दिवसात गुलाबी थंडी अशी आंघोळ संस्मरणीय ठरेल.दापोली-खेड रस्त्यावरून वाकवली येथे उजवीकडे वळून गावतळेमार्गे घाटरस्त्याने उन्हवरे गावात पोहोचता येते. उन्हवरे गाव दोन आहेत. एक दापोलीतले, दुसरे मंडणगडचे. दोन्हीही गावांमध्ये येणारा अनुभव सारखाच.
या रटमटणा-या आगीप्रमाणचे उन्हवरे (व्हाया पालवणी) मंडणगडकडून आतल्या रस्त्याने (पालवणी मार्गाने) दापोलीकडे जाताना जिथे भारजा नदी रस्त्याशी लगट करू पाहते तिथे नदीच्या डाव्या तिरावर चंडकाई, मुकाई आणि वळजाईची मंदिरे आहेत. या भागात परिक्रमा करायलाच हवी.
नदीकाठाने डोंगरी भागात पदभ्रमंती करताना मिळणा-या आनंदाचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. येथील घनगर्द झाडीत भेटतो तो महाराष्ट्र वृक्ष म्हणून प्रसिद्ध पावलेला ताम्हण! याची वसाहतच येथे आहे. आतासा या भागात जांभळय़ा फुलांचा सडाच अनुभवायला मिळतो. ही उधळण बघून डोळे सुखावतात. या गुलाबी-जांभळय़ा फुलांवर वैविध्यपूर्ण पक्षी या हंगामात येथे स्थिरावतात म्हणे. या पक्षांचे गुंजन ऐकताना आपले अस्तित्व आपण विसरून जातो. पिवळय़ा पट्टय़ाचे राघू येथे पाहायला मिळतात. तर टिटवी आणि लाव्हे पक्षी येथे मुक्तपणे विहार करत असतात. अनेक छोटे-मोठे जीव येथे आकर्षित करतात. अलीकडे दुर्दैवाने या परिसरातील वृक्षराईची तोड होऊ लागली आहे.?या स्थळाचा ग्रामीण बाज तसाच जपून नवा आनंद गाववासीय घेऊ शकतात.
मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा कच्चा रस्ता (जो थोडा उतरून यावा लागतो) पटकन लक्षात येत नाही. पण येथील वातावरणच एका वेगळ्या दुनियेत नेणारे आहे. चंडिकादेवी मंदिराभोवती आसपास बांबूची दाट झाडी आहे. येथे मिळतो गरम झरा.. हे कुंड जांभा दगडाने बांधलेले असून, जवळच शिवपिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. सर्वात निसर्गरम्य गरम पाण्याचे स्थान असे याचे वर्णन करता येईल. या परिसरात सर्व हिंदू व मुसलमान कुंडावर लग्नाचा नारळ फोडतात. तशी प्रथाच या पंचक्रोशीत आहे.
चिपळूणकडून गोव्याकडे जाताना सुमारे ४० किलोमीटर अंतरावर डावीकडे राजवाडी फाटा आहे. आत वळताच सुरुवातीला राजगंगा नदीवरचा पूल व लगेचच कोकण रेल्वेच्या रुळाखालून पलीकडे राजवाडी आहे. गाव छोटे व टुमदार आहे. गावात गाडी लावून साईबाबांच्या मंदिराजवळून पाय-यांची वाट कुंडाकडे जाते.
शंकराच्या मंदिराला लागून आमराई व त्याला लागून गरम पाण्याची दोन कुंडे आहेत. शंकराच्या मंदिरातील लाकडी खांब, कमानी व तुळय़ांवरील कोरीवकाम बघण्यासारखे आहे. पाच तोंडांची गाय, गंडभेरुं ड व हत्ती, वाघाशी तलवारीने लढणारा योद्धा, उंट, दौडणारा घोडेस्वार, आठ मोरांचे गोलाकार अष्टमंडळ, फेर धरून नाचणा-या नर्तिका, कमलपुष्प, डुकराच्या शिकारीचे दृश्य, राम-सीता, हनुमान अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दुर्दैवाने कोरीवकामाला जागोजागी भुंगे लागले आहेत, भोके पडली आहेत. या मंदिरांचे असणारे सौंदर्य, येथे असणा-या परंपरा सारेच अवाक् करून सोडणारे आहे.
पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक प्रक्रियांमुळे गरम होऊन झ-यांद्वारे भूपृष्ठावर अवतीर्ण होणा-या उष्ण पाण्याच्या उगमस्थानासही विविध नावे दिलेली आहेत. इंग्रजीत याला थर्मल स्प्रिंग असे म्हणतात. पावसाच्या जमिनीत खोलवर मुरणा-या पाण्यापासून उन्हे-याची निर्मिती होत असते. अनेक उन्हेरे ज्वालामुखी प्रदेशात आढळतात. या प्रदेशात शिलारसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर, परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते. भूपृष्ठावरील पाणी खडकांच्या फटींमधून खाली झिरपते. असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येताच तापते, प्रसरण पावते; त्याच्या काही भागाची वाफ होते. हे गरम झालेले पाणी खडकांमधील नाळींतून भूपृष्ठाकडे ढकलले जाते व उन्हाळय़ाच्या रूपाने बाहेर पडते. ब-याचदा अशा पाण्यात खडकांमधील गंधक वगैरेसारखे द्रवपदार्थ विरघळतात. अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात. असा ग्रामस्थांचा अनुभव आहे.
जवळपास सर्वच गरम पाण्यांच्या झ-यांवर काहीना काही आख्यायिका आहेत. येथे काही देवतांची मंदिरे निर्माण करून पुर्वजांनी या भागाचे पावित्र्य जपले आहे. या जलकुंडांमुळे आनंद मिळायला हवा यासाठी काही वास्तू रचना केली आहे. कोकणातील ही अग्निकुंड अनुभवताना कोकणच्या संस्कृतीचा आणि भूगर्भीय आश्चर्याचा मिलाफ पाहायला मिळतो. या गरम पाण्याच्या कुंडात तुम्ही एकदा स्नान कराच!
पर्यटनाचा एक वेगळा पैलू कोकण भ्रमंतीत अनुभवता येतो. सकाळी एका गरम पाण्याच्या झ-यावर आंघोळ करावी आणि पर्यटन स्थळे पहात पुढे सरकावे असे चिपळूण ते गोवा या महामार्गादरम्यान तब्बल २२ गरम पाण्याच्या स्रोतांना आपल्याला भेटी देता येणे शक्य आहे.