कोकण रेल्वेचा पावसाळी प्रवास

Payal Bhegade
29 May 2024
Blog

मुंबई आणि कोकणचे अतुट नाते आहे. बहुसंख्य मुंबईकर हे मुळचे कोकणातील आहेत. कोकणात महामार्गाने प्रवास करायचा म्हणजे काही वर्षापुर्वी सर्वसामान्य माणसाला एस्.टी.बस हेच प्रवासाचे प्रमुख साधन होते. ‘आज मुंबईत बसलेला माणुस उदया उतरणार’ असे गणित ठरलेले होते कारण रस्त्यांची अवस्था काही ठिक नव्हती त्यातुन तळकोकणातील काही गावात जायला तब्बल सतरा ते अठरा तास लागत असत.
कोकणात रेल्वे आली आणि कोकणवासियांचा प्रवास सुखकर झाला. पुर्वी ठरावीक दिवा व रत्नागिरी पॅसेंजर सारख्या रेल्वे गाडया तुडुंब भरुन कोकणात दाखल होत होत्या. आता परिस्थिती बदलली आहे. एक्सप्रेस , सुपरफास्ट , राजधानी ,शताब्दी अशा वेगवेगळ्या नावाने दक्षिणेकडील गाड्यांमुळे गाडया कोकणी माणसाचा प्रवास सुखकर होतो.
कोकण रेल्वेने प्रवास हा एका खास वैशिष्ट्यासाठी आवर्जुन उल्लेख करावा लागेल . तुम्हाला निसर्गसौंदर्याची आवड असेल आणि एखादा वेगळा दिवस जगायचा असेल तर ‘श्रावण’ महिन्यात किंवा पावसाळा संपण्यापुर्वी मुद्दामहून कोकण रेल्वेने दिवसा तळकोकणातुन किंवा तळकोकणाकडे प्रवास करावा. हिरवी शाल पांघरलेल्या उंच - उंच डोंगररांगा , हिरवीगार विविध फुलांची झाडे , रेल्वे पटरीच्या दुतर्फा फुललेली रानफुले, काळ्याकुट्ट कातळातुन वाहणारे झरे , वेलींनी आच्छादलेला कातळ, डौलणारं गवत ,काही ठिकाणची लालचुटुक माती मन तृप्त करुन जाते. मानवी वस्तीतुन जात असताना एकाच ठिकाणी दिसणारी कोकणातील कौलारु घरे आणि त्या वस्तीतुन दिसणारी सोनेरी कळस असलेली भगव्या झेंड्याची मंदीरे भन्नाट वाटतात. दुरवरुन हात दाखवणारी लहान - लहान मुले जेव्हा हात दाखवतात तेव्हा आपणही बालपणात निघुन जातो. डोंगरावर आणि भव्य माळावर निवांतपणे चरणारी गुरे पाहतानाच रेल्वे बोगदयात शिरली की ,बाहेरच्या निसर्गाशी काही संबंध राहत नाही मग तिथे अनुभवायला मिळतो तो फक्त अंधार. बोगद्यात शिरताना पाऊस नसला तरी बोगद्यातुन बाहेर पडताच पुढच्याच क्षणाला धो-धो कोसळणारा पाऊस मनाला आनंद देऊन जातो.
कोकण रेल्वे प्रवासात विहंगम काय असेल तर एका बाजुने उंचावरुन धो- धो कोसळणारे उक्षी किंवा सवतसड्या सारखे पांढरेशुभ्र असंख्य धबधबे जे एका बाजुने कोसळत असताना आजुबाजुला धुक्याने हळुवार चादर ओढलेली असते काही ठिकाणी तर धुकं एवढं दाट दिसतं की छोटे छोटे ढग उतरल्याचा आभास होतो तसेच उंचच उंच पुलाखालुन वाहणारी नदी व तिच्या भोवतालची हिरवळ पाहण्यासाठी जणु मोटारमन गाडी हळु चालवतो व नेमका तोच क्षण टिपायची संधी साधण्यासाठी आपला हात मोबाईलकडे जातो पण वेळ निघुन गेलेली असते मोटारमन किंवा अचानकपणे आलेला बोगदा ती संधी आपल्याला देत नाही. तो क्षण पुन्हा अनुभवायचा असेल तर पुन्हा एकदा प्रवास करावा लागेल. पण मनाच्या कोप-यात मात्र तो क्षण ते सौंदर्य कायमस्वरुपी साचून राहते. उंच पुलावरुन प्रवास करीत असताना पुलाखालुन दुथडी भरुन वाहणा-या नदया, ओढे व त्याभोवतालची भातशेती, आंबा , नारळीच्या बागा पाहत असतानाच त्या बागेपाशी जावुन नजरेसरशी गायब होणारी लाल मातीची पायवाट ‘कोकणाला पृथ्वीवरचा स्वर्ग ’ का म्हणतात याची जाणीव करुन देते. उंच पुलावरुन दिसणारा गर्द झाडीतुन जाणारा डांबरी रस्ताही विलोभनीय वाटतो.
हे सगळं पाहताना हर्षभराने कसलाही शीण न येता आपला प्रवास कधी संपतो ते जाणवत नाही. आपलं तन जरी या श्रावणसरीत भिजलं नसेल तरी मन कोकणच्या निसर्गसौंदर्यात चिंब भिजून तृप्त होते.
.....आणि हो महत्वाचे सांगायचे राहिलेच कोकण रेल्वेचा प्रवास करायचा असेल व निवांतपणे निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर रेल्वेच्या तिकीटांचे आरक्षण महत्वाचे आहे. कारण आमच्याकडे येताना रेल्वेचे आरक्षण मिळणे म्हणजे महाकठिण आहे. म्हणुन योग्य नियोजन करुन प्रवासाला निघा. तुम्ही जर या प्रवासासह कोकणात काही दिवस राहु इच्छित असाल तर कोकणाचे जीवन जवळुन दाखवणारा एक अवलिया माझा मित्र आहे. त्याच्यासोबत कोकणातील भटकंती करुन तो तुमचा प्रवासाचा आनंद द्विगुणित करेल. माझ्या Prasad Gawade या कोकण टूरिझम करणा-या मित्राकडे संपर्क साधा तो तुम्हाला ग्रामीण भागातील कोकणातील निसर्गाची भटकंती घडवुन ‘ पृथ्वीवरचा स्वर्ग ’ दाखवेल.
!! येवा कोकण आपलाच असा !!