दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदरामध्ये १९७६ पासून सुमारे ४८ वर्षे जेट्टीची मागणी करूनही अद्याप जेट्टी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. प्रस्तावाची कागदपत्रे मत्स्य व्यवसाय कार्यालयामध्येच धूळ खात पडली असल्याने येथील मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. मच्छीमार्केट, विक्रीव्यवस्था, बर्फ मिळत नाही, कोल्डस्टोअरेजचा अभाव यामुळे येथील मच्छीमारांना दिवसभरात मिळालेली मासळी विकून येणाऱ्या पैशावरच अवंलबून राहावे लागते.
बुरोंडी बंदरात ताजे मासे मिळतात. या बंदरावरील किमान १३९ बोटी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. त्यापैकी ११० नौका, १ सिलिंडर, ४ नौका २ सिलिंडरच्या बुरोंडी बंदरात आणि ६ सिलिंडरच्या २५ नौका जेट्टी नसल्याने हर्णै बंदरात मासेमारी व्यवसाय करतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील मच्छीमार (Fisherman) विविध समस्यांना तोंड देत आहेत. सकाळी लवकर मासेमारीसाठी बुरोंडी बंदरात लिलाव पद्धत नसल्याने पकडलेली मच्छी विक्रीसाठी हर्णै बंदरात घेऊन जावे लागते. बुरोंडी बंदरातील मासे हर्णै बंदरात घेऊन गेल्यावर तेथे योग्य दर मिळतोच, असे नाही. बऱ्याच वेळा बुरोंडी येथून हर्णै येथे वाहतूक करून नेण्याचा खर्चही सुटत नाही, अशी स्थिती होते.
कारण, बुरोंडी बंदरातील मासे हर्णै बंदरात पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ, उपलब्ध होणारी वाहनव्यवस्था यावर दराचे गणित अवलंबून असते. या बंदरातील मासेमारीची उलाढाल केवळ एक दिवसापुरतीच असते. पहाटे ४ वा. समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट सकाळी ९ ते १० वा. मासेमारी करून परत बंदरात येते. साधारण १० किमीच्या आतच या नौका मासेमारी करतात. त्यानंतर लिलाव होतो. हंगामामध्ये १० ते ११ वा. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी पुन्हा ३ ते ४ वा. मासेमारी करून परत येतात. त्यामुळे बुरोंडी बंदरातील मासे बर्फात ठेवलेले नसतात.
मच्छीमारांसमोर अडचणीच
गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या या बुरोंडी बंदरात किमान प्राथमिक सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्याने या बंदरातील मच्छीमार बांधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बोट मासेमारीसाठी समुद्रात ढकलण्यासाठी जुन्या पद्धतीने खांदा लावून दोन हातांनी जोर लावून ढकलावी लागते. मासेमारी झाल्यानंतर बोटीला ओढत किनाऱ्यावर आणावे लागते. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. बुरोंडी बंदरात मच्छी खरेदी-विक्रीचे सेंटर नाही. या बंदरातील दुरवस्था पाहून व्यापारी मंडळी या बंदरात यायला तयार होत नाहीत. बर्फ आणि कोल्ड स्टोअरेजची सुविधा नसल्याने महागडे मासे मारता येत नाहीत. जादा दर मिळवून देणारे मासे मारण्यासाठी हर्णै बंदरात जावे लागते. कोल्ड स्टोअरेज नाही. कोल्ड स्टोअरेज नसल्याने व्यापारी अनेकवेळा ताज्या मच्छीचा दर पाडून मागतात.
वादळावेळी बंदर असुरक्षित
समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास बोटी सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी जागाच नसल्याने अनेकवेळा समुद्रातील वादळाचा फटका बसून बोटी खडकाळ दगडावर आदळून फुटतात. वादळी परिस्थितीमुळे अनेकवेळा मासेमारी बोटीला जलसमाधी मिळण्याची भीती असते. फयानमध्ये तर बंदरात एकाच कुटुंबातील तीनजणांचा बळी गेला होता तसेच दरवर्षी वादळाचा सर्वाधिक फटका बसतो. समुद्र किनाऱ्यावरील घरांना यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या उधाणाचा धोका जाणवत होता; परंतु या बंदरातील समुद्र किनाऱ्यावर संरक्षक भिंत घालण्यात आल्याने किनाऱ्यावरील घरांना समुद्री वादळापासून उद्भवणारा धोका आता तात्पुरता टळला आहे.
मच्छीमार्केटची गरज
या बंदरात मिळणारे ताजे मासे विक्रीसाठी मार्केट उपलब्ध नाही. बंदरातील ताजे मासे विक्रीसाठी बुरोंडीतील मच्छीमार महिला दुर्गंधीच्या ठिकाणी उन्हात उघड्यावर बसून मासे विक्री करतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी येथे मच्छीमार्केटची आवश्यकता आहे. बुरोंडी बंदरात पिण्याचे पाणी, मच्छी विक्रीसाठी ओटे या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
१९७६ पासून आमच्या बुरोंडी बंदराच्या जेटीची मागणी होत आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने व्यवस्थित लक्ष आम्हा मच्छीमारांकडे दिलेले नाही, याचीच खंत वाटते. नुकताच हा विषय आम्ही काही मंडळींनी दापोली तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्यापर्यंत पोहचवला आहे. आपण लवकरात लवकर हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
- अमर पावसे, मच्छीमार
राष्ट्रीय कृषि विकास योजना २०१६-१७ योजनेंतर्गत १०७ कोटी इतक्या रकमेचे एकूण सहा कामांना प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय २३ फेब्रुवारी २०१७ मध्ये झाला. बुरोंडीसाठी २३.५० कोटी फक्त ब्रेक वॉटर वॉलसाठी मंजुरी देण्यात आली होती. परंतु मंजुरीनंतर ज्यावेळेस संबधित अधिकाऱ्यांकडून सर्वे करण्यात आला. त्यावेळी तेथील भौगोलिक परिस्थिती पहाता सदरची मंजूर रक्कम अपुरी पडण्याची शक्यता असल्याने त्यावेळी ब्रेकवॉटरचा प्रस्ताव रद्द करण्यात आला.
जेटीमुळे मच्छीमारांना होणार फायदा
बुरोंडी बंदरात जेटी झाल्यास परकीय चलन मिळवून देणारे पापलेट, सुरमई, कोळंबी आदी चविष्ट मासे पकडता येतील तसेच शीतगृह झाल्यास माशांना योग्य भाव मिळेपर्यंत मासे साठवून ठेवणे शक्य होईल. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. मासेविक्री करणाऱ्या स्थानिक महिलांची होणारी गैरसोयही दूर होईल. बुरोंडी बंदरातील या सर्व समस्यांवर मासेमारी जेटी उभारणे हाच उपाय आहे. जेटी झाल्यास सर्व समस्या सुटतील आणि मच्छीमारांचे जीवनमान उंचावेल, तसेच हे बंदर एक विकासाचे केंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकेल.
मच्छीमारांचं मोठं नुकसान, मासळी विक्रीसाठी हर्णै बंदराचा पर्याय