कोकणातील बागायती

Payal Bhegade
25 May 2024
Blog

माझा पाचवी ते दहावीचा शिक्षणाचा १९९५ ते २००० कालावधी माझ्या मामाच्या गावी आंबेड खूर्द, ता.संगमेश्वर येथे गेला. त्यावेळी शैक्षणिक खर्च सोडला तर घरातुन महिन्याचा ‘पॉकेटमनी’ म्हणुन तीस रुपये मिळायचे. यातला दररोजचा एक रुपया आमच्या शाळेसमोर ‘पन्नास पैशाला एक’ प्रमाणे मिळणा-या मावा कुल्फी किंवा पेप्सीवाल्याकडे जाऊन खर्च करायचो.
मामाच्या गावी शिमगोत्सवात एकच जत्रा होते. होळी लागली की, गावच्या सहाणेवर रात्रीचे शिंपणे होते त्यावेळी जत्रा भरते. गावची सहाण व होळीचे ठिकाण आमच्या घराच्या अगदी जवळ म्हणजे होळी लागल्यावर ज्वालांची धग आम्हाला लागते एवढ्या जवळ आहे. तर ही शिंपण्याची जत्रा आली की गावातल्या मुलांना खर्चाचा मोठा प्रश्न पडायचा. जत्रा म्हटल्यावर पैसे तर हवेच, मामा मामी मला पैसे द्यायचे पण ते जत्रेपूर्वीच खर्च व्हायचे.
कोकणातल्या लहानथोर माणसांच्या आर्थिक गरजांची तरतुद इथला निसर्ग करतो. प्रत्येक ऋतुत इथे वेगवेगळी फळे मिळतात ज्यापासुन आम्हाला चार पैसे मिळतात. शिमगोत्सवातील या काळात काजू मोठ्या प्रमाणात होतात.
शिमगोत्सवाची चाहूल लागली की शिमग्याच्या पुर्वीच्या आठवड्याचा शनिवार रविवार हा रानात भटकंतीचा वार असायचा. माझ्यासारख्याच ‘ अकरम टिकलीच्या पोरां’ना सोबत घेवुन हातात कापडी पिशवी व खांद्यावर ‘ गिरका ’ घेवुन आंबेड ते धामणी , तर कधी कोंडअसुर्डे पर्यंन्त आम्ही रानातल्या काजु बिया काढायला जायचो. यात कधी ‘राखणीच्या झाडावर’ तर कधी ‘तटात कुडलेल्या काजुंवरही’ आमची वाईट नजर पडायची, पण आम्हा शाळकरी पोरांची गरज ही व्यवसायाची नव्हती तर ती जत्रेसाठी चार पैसे मिळवण्याची होती हे सर्वांना माहित होते त्यामुळे एखाद्या फांदीवरचे पाच पंचवीस काजु झोडपले तर दोन चार शिव्यांचा मोबदला आम्हाला मिळायचा. संध्याकाळी काजूबियांची वाटणी व्हायची, प्रत्येक बी मोजुन तीची वाटणी केली जात असे मग जो तो सोयीने त्या बिया विकुन शंभरएक रुपये मिळत असत.
कधीकधी क्रिकेट च्या बॅट खरेदी करणेसाठी सुद्धा आम्ही याच मार्गाचा अवलंब करीत असु. त्यावेळी संपर्काची साधने कमी असल्याने लोक मिळेल त्या दरात काजू बी विकत असत. ‘ भैया ’ लोकांचा तर मोठ्या प्रमाणात सुळसुळाट होता. एक किलो काजुच्या बदल्यात एक किलो टोस्ट बटर किंवा कांदे बटाटे ते देत असत.
माझ्या बाबांनी दहा वर्षापुर्वी घर बांधले आहे. घराशेजारी मी छंद म्हणुन तेजपत्ता,दालचिनी ही मसाल्याची तर वेंगुर्ला - ४,५,६ चे काजु, बाणावली व टिडीचे नारळ, रत्नागिरी हापुस सह केशर, रत्ना, आम्रपाली, तोतापुरी जातीचे आंबे, विलायती आवळा ,विलायती काजू, महाराजा, ललीत जातीचे पेरु, कालीपत्ती चिकु, सीडलेस लेमन , कोकण प्रॉलीपॉक कापा फणस अशी विविध झाडांची लागवड केली आहे. आता ती प्रत्येकाच्या क्षमतेनुसार उत्पन्न देतात. भविष्यात संधी मिळाली तर छंदाला व्यवसायाची जोड द्यायची आहे.
कोकणात ठरावीक लोकच बागायती करतात आणि जे करतात ते त्यांच्या कष्टाने बागायती शेतीतील विविध अडचणींवर मात करुन सधन झाले आहेत. कोकणातील जमिनीच्या सातबा-यात शेकडो नावे आहेत. त्यामुळेच भविष्यात मालकी हक्काचा वाद होईल या भितीने बरेच जण बागायतीच्या अर्थकारणाकडे वळत नाहीत. कोकणातील जमीन मालकांनी आपआपसात समजुतदारपणाने हे वाद मिटवुन बागायतीचे अर्थकारण समजुन घ्यायला हवे. कोकणातील कृषी क्षेत्राशी संबंधीत अधिकारी वर्गानेही या क्षेत्रात येवु पाहणा-या तरुणांना प्रोत्साहन देवुन सर्वतोपरी शासकीय मदत करायला हवी.
दापोली येथील कोकण कृषी विदयापिठाच्या सहकार्यातुन कोकणाला श्रीमंत करणा-या बागायती व मसाल्याच्या पिकांचे उत्पन्न घ्यायला हवे. एक लक्षात घ्या, आतापर्यंन्त आपण खातोय नी उत्पन्न घेतोय ते आपल्या पुर्वजांनी केलेली कमाई आहे. आपलं भाग्य आहे की बाजारात ज्याची किंमत जास्त म्हणजे जे स्वत: श्रीमंत आहे अशी ‘ रिच ’ फळे व मसाले आपल्याकडे होतात. सध्या बागायतीच्या शेतीत राबणा-या हातांची कमतरता बागायतदारांना जाणवत आहे. कोकणातील शेतजमिनी मालकांनी न विकता , श्रमाची कसलीही लाज न बाळगता तरुणांनी या क्षेत्राकडे वळायला हवे. आपल्या कोकणच्या मातीची इमाने इतबारे सेवा केली तर ती आपल्याला आयुष्यभर पोटभर नक्कीच जेवु घालेल हे नक्की.