मंडणगड : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा शिमगोत्सव कोकणात सर्वत्र साजरा केला जात आहे. कोकणी समाजमनावर गणेशोत्सवाइतकेच किंबहुना काकणभर अधिक शिमगोत्सवाचे गारूड पिढ्यानपिढ्या आहे. समाजजीवन व सांस्कृतिक पंरपरा यातून गावागावात शिमगोत्सवाच्या विविधतेने नटलेल्या परंपरांचे जतन केले जाते. यात वेगळेपणात आढळणारी समानता म्हणजे शिमगोत्सवाच्या कालावधीत त्या त्या गावातील ग्रामदेवतांच्या देवतत्त्वाचा सार्वत्रिकरित्या उत्सवाच्या रूपाने होणारा जागर.
शिमगोत्सवात सगळीच गावे आपापल्यापरीने साजरा करत असतात. शिमगोत्सवाच्या मानावरून भूतकाळात निर्माण झालेले बहुतांश प्रश्न सध्या संपुष्टात आले आहेत. पहिल्या होमानंतर ग्रामदेवता पालखीत बसून संकासूरासह सीमोल्लंघन करून परिसरातील गावांचा दौरा करते. यात ती जात असेलल्या गावातील ग्रामस्थ देवाच्या पालखीचे मोठ्या श्रद्धेने स्वागत करतात. तालुक्यातील बारा गावातील देवस्थानांच्या पालख्या पूर्ण तालुका फिरून मंडणगड शहरात मुक्कामी येतात. मोठ्या होमाच्या दोन दिवस आधी खालूबाजा व ताशाच्या आवाजाने पूर्ण शहराचे वातावरणच बदलून जाते. शहरात पालख्यांच्या स्वागतासाठी गेल्या दहा वर्षापासून अनेक संस्थांच्या माध्यमातून शिमगोत्सवाचे आयोजन केले जाते. शहरात शिमगोत्सवात अगदी धर्माधर्मातील भेदही गळून पडतात. गावाच्या देवतेचे स्वागत त्या त्या गावातील मुस्लिम समाजही करताना दिसतात. यात पालख्यासोबत असणारे संकासूर, नवस, शरण यांचे इतरत्र जाणवणारे अस्तित्व येथे जाणवते. ज्यांना पालखी फिरवणे शक्य नाही ते खेळी म्हणून बाहेर पडतात. मुले राव राव करतोय म्हणून घोडा नाचवतात व वेगवेगळी सोंगे काढली जातात. शेवरे गावाची ढालकाठी, पाटगावचा डेरा, गोमूचा नाच व खेळ्यांमध्ये नाचणारे राधाकृष्ण तालुक्याचे वेगळेपण म्हणावे लागेल.
शिमगोत्सवातून ग्रामदेवतत्वाचा जागर