शिमगा
कोकणी माणसाचा जीव की प्राण असणारा ‘शिमगा’ या पद्धतीने साजरा करतात….
सण-वार, रितीभाती हे भारतीय संस्कृतीचे श्वास आहेत असे कोणी म्हणाले तर ते अजिबात खोटे नाही. भारतीय पंचांगानुसार जवळपास प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी सण असतोच. बदलत्या ऋतूनुसार देखील भारतात सण साजरे केले जातात. प्रादेशिकतेनुसार ते वेगवेगळे असले तरी लोकांच्या सहभागामुळे ते लोकोत्सव बनतात. मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रात देखील असे अनेक सण आहे, पण त्यापैकी गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्रोत्सव हे लोकोत्सव व्हावेत असे मोठे सण आहेत. पण यात संस्कृतीबरोबर धार्मिकताही असते. त्यामुळे जरी उत्साह असला, तरी त्याला संस्कृतीची किनार असते.
यात एक सण असा आहे जो खरा लोकोत्सव मानला जाऊ शकतो, तो आहे आपल्या सर्वांचा विशेष आवडीचा शिमगा. किंवा होळीचा सण. त्यातल्यात्यात प्रत्येक कोकणी माणसाच्या जिवाभावाचा सण.
आजही शिमगा म्हटले की आठ दिवसांची सुट्टी काढून, वेळप्रसंगी एसटी च्या गर्दीतून धक्के खात आपल्या बायली, पोरांसोबत आवर्जून गावाकडे जाणारा मुंबईचा चाकरमानी डोळ्यांसमोर येतो. गावाकडे त्याचे होणारे स्वागत, घरच्या अंगणात, खळ्यात केली जाणारी शिमग्याची तयारी या सगळ्यांची वर्णने आठवायला लागतात. मित्रांनो, आता तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असेल ना की कोकणी माणसाचा जीव की प्राण असलेला शिमगा करतात तरी कसा साजरा? चला तर जाणून घेऊया शिमग्याची कहाणी.
होळीचा सण जसा देशात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो तसाच तो महाराष्ट्रामध्येही विविध स्वरूपात साजरा करण्याची पद्धत आहे. कोकणात होळी हा सण ‘शिमगा’ म्हणून ओळखला जातो. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात.
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे ५ ते १५दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणातील लोकांचा होळीचा सण १-२ दिवसांचा नव्हे तर आठवडाभर चालणारा असतो.
या शिमगोत्सवामध्ये होळी पेटवण्यापासून रंगांची उधळण, स्थानिक ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, जळती लाकडं फेकण्याचा खेळ अनेक प्रकार पहायला मिळतात. अंगण शेणाने सारवून सज्ज केले जाते. सड्यावरच्या गेरूने घराला तांबडा लखलखीत रंग दिला जातो आणि त्यावर चुन्याने पक्ष्याच्या, प्राण्याच्या, फुलांच्या, वेलींच्या नक्षी.
भांडीकुंडीही घासून स्वच्छ केली जातात. . नवा भात गिरणीला लावून आणलेला असतो. वस्तीसाठी आलेला देव आणि त्याबरोबरची वाडीवरच्या माणसांच्या जेवणाची जय्यत तयारी केली जाते. . देव अंगणी येऊन गेला, याचा आनंद वर्षभराचे कष्ट करण्यासाठी नवीन उमेद देणारा असतो. घरातल्या पोरासोराणा देवाच्या पायाशी घातले जाते आणि जयजयकाराने वाडी दणाणून निघते…
हुरा रे हुरा!....आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा!! अशा शब्दात देवाचे गुणगान केले जाते.
गणपतीपेक्षा होळीला कोकणात खूप महत्त्व असते. . पाच दिवस, सात दिवस अग्नीच्या साक्षीने साजरा करायचा आनंद! खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण. पूजाअर्चा मानकरी असलेल्या कुणबी, मराठ्यांनीच करायची. प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
रत्नागिरीच्या पट्ट्यात सुरमाड, पोफळी, आंबा अशा वेगवेगळ्यात रूपात होळी सजते. होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्यासाठी चुरस असते. पण होळी कुठून आणि कुठली आणायची यासाठी कौल लावला जातो, देवाला विचारणा होते! देवाने सांगितलं की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडणार.
ढोलताशाच्या गजरात, नाचत, गात ती गावात देवळाच्या समोर किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी आणली जाते. आणि सुरू होतो शिमगा, पौणिर्मेच्या अगोदर तीन, पाच, सात दिवस. पौणिर्मेला मुख्य होळी जळण्याच्या अगोदर सारी वाडी, सारा गाव शिमगामय होतो. देवळाच्या मुख्य मंडपाच्या माडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते. ही पालखी व त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो.
तिला नवे रूप लावले जातं. रूप म्हणजे सजवणं. पालखी आणि मुख्य देवाच्या चांदी-पितळेच्या रूपातल्या मूतीर्ला दागिने, कपडे, नक्षीकामाने सजवलं जातं .गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते त्यामुळे पालखी सजवून ढोल-ताशा च्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी . त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.
रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे .हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे ५०-७० फूट उंचीचे, १५ वर्षे वयाचे , आणि सुमारे १२००-१५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात.
होम केला जातो ,ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो ,तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात ,व त्याभोवति गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते,आणि मग होम जाळला जातो.
होळीचा होम धडधडून पेटू लागला की मूठ आवळून तोंडावर नेत बो बो बो… करत सारा आसमंत गाजवून काढायची हीच संधी असते. आपल्याला त्रास देणार्यांच्या नावानेही शिमगा घातला जातो., पण ते ही खेळीमेळीच्या वातावरणात… होमच्या वेळी मानाचा नारळ होळीच्या होमाला दिला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात .
तो एक महत्त्वाचा विधी असतो. यानंतरची वेळ असते ती गार्हाण्याची, ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते ,ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.
देवाची पालखी उचलायची कुणी, ती कुठल्या वाडीतून न्यायची, ती कुठे प्रथम थांबवायची, जागरण कुठे, जेवण कुठे, खेळे कुठे हे सारं सारं ठरलेलं आहे आणि त्याचा निर्णय पन्नास-साठ वर्षांमध्ये झालेला नाही, तर पार शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून त्याचा इतिहास आहे.
आदिलशहाच्या राजवटीत कोकणातल्या महसूल वसुलीसाठी मराठे सरदारांना गावं वाटून देण्यात आली होती. पुढे शिवाजी महाराजांच्या काळातही ती प्रथा कायम राहिली आणि पुढे त्याची वहिवाट झाली. अनेक वाड्यांच्या मिळून बनलेल्या गावांमधून दस्त गोळा केला जाई आणि त्याची जबाबदारी एका सरदाराकडे असे. तोच त्या गावचा पुढारी. बारा-पाचाचे मानकरी त्यामधूनच निर्माण झाले.
पालखी प्रदक्षिणेला निघाली की अख्खा गाव तिच्या मागे फिरतो. एका वडीतून दुसर्या वाडीत पालखी नेताना पालखी नाचवणं हा भन्नाट प्रकार वर्षभराचे कष्ट विसरायला लावणारा असतो. लाकडी कोरीव अशी ही पालखी शंभर दोनशे किलोची, पण ‘सिंगल पसली’ माणसं एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर, डावीकडून उजवीकडे, चारही दिशांना गोल गोल नाचवू लागली की थक्क व्हायला होतं.
तीच गोष्ट होळीनिमित्त बाहेर पडणाऱ्या तळकोकणातल्या तरंगाची. हे तरंग नुसते खांद्यावर घेतले की हट्ट्याकट्ट्या माणसालाही घाम फोडणारे. पण एखादा शरीराने दुबळा तरंगकरी अवसार संचारल्यावर तरंग एकहाती नाचवतो.
देवळाच्या प्रवेशद्वारावरून थेट गाभाऱ्यात शिरताना एका दमात शंभरेक किलोचे तरंग घेऊन जाताना त्याला मिळणारी ताकदही अचंबित करणारी गोष्ट असते! दोन गावांच्या सीमेवर गावच्या पालख्या एकेमकांना सामोऱ्या जातात त्यावेळी सारा आसमंत ढोलताशांच्या आवाजात दणाणून निघतो.
खरेतर हा एक लोकोत्सव पण तरीही सोहळाच. मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करणारे युवक लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाणार नाहीत, पण होळीला आपल्या गावी बायकोसकट हजर होतात. पालखी जाऊन बसते, त्या सहाणेवर डोकं ठेवलं म्हणजे लग्नानंतरचं आपलं आयुष्य सुखी राहणार, यावर त्यांची दृढ श्रद्धा असते. वर्षभर पोरगा आला नाही तर चालेल, पण होळीला आलाच पाहिजे, असा आईबापाचा खास आग्रह असतो आणि सहाणेवर डोका ठेवून म्हातारा आपल्या पोरासाठी हात जोडतो…यानंतर होळीची खरी धमाल सुरू होते. वाडीवाडीवर भांगेच्या वड्या वाटल्या जातात. एकदा या वड्या दुधाबरोबर खाल्ल्या की मग कशाचीच शुद्ध राहत नाही. याचवेळी साऱ्या पाच दिवसात खेळे, नमन, सोंगे, शबय, गोमू, दशावतार, जाखडी नाच यांनीही समुदावरच्या भाटापासून ते डोंगरातल्या वाडीपर्यंचा अख्खा कोकण गजबजून जातो. खेळे नमन, जाखडी नाच, दशावतार चव्हाट्यावर, देवळात… तर सोंगं, गोमू, संकासूर, राधा दारोदारी येतात.दशावतार मंडळातला स्त्रीच्या वेषातला पुरुष, राधा, मुदृंगाच्या तालावर फेर धरते . हाताच्या तालावर पायांना नाचावत गिरकी घेत राधा गाते, ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला…’ कोकणी राधा शुद्ध मराठीत गाणार! संकासूराला मात्र मालवणीत दे धमाल करण्याची मुभा…या आणि अशा अनेक धमाल किश्श्यानी होळीची रंगत उत्तरोत्तर वाढत जाते.
कोकणाचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होईल पण पोटासाठी दाही दिशा पसरलेल्या कोकणी माणसाला आजही लाल मातीची, आपल्या कौलारू घराची, पडिक बनलेल्या जमिनीची ओढ लागते ती जत्रा, गणपती आणि होळीच्या निमित्ताने. तेच आज त्याच्या उरल्यासुरल्या संस्कृतीचे पाइक बनले आहेत. मित्रांनो हा होळीचा रंग कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि संकासुरासोबत शिमग्याची मजा लुटा.
Kokanatil Holi