रत्नागिरी : गेला आठवडाभर अवकाळी पावसाचे ग्रहण कोकणावर सातत्याने राहिले आहे. या आठवड्यातही मंगळवारी दिवसभर मळभी वातावरणासह अवकाळी सावट कायम होते. मंगळवारी सकाळी हलका पाऊसही झाल्यामुळे फवारणीच्या पहिल्या सत्रातच अवकाळीने ग्रासल्याने आंबा आणि काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने जिल्ह्यातील बागायती क्षेत्रात ‘क्रॉपसॅप अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एकाचवेळी मोहोर संरक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
गेले चार दिवस ढगाळ वातावरण, हलका पाऊस पडल्यामुळे आंबा कलमांवरील नुकत्याच आलेल्या पालवी आणि मोहोरावर तुडतुड्यांसह कीडरोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणीची कसरत करावीच लागणार आहे. पावसाला पोषक हवामानामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने स्पष्ट केला आहे. सध्या कोकण आणि अन्य भागातही वातावरणात बदल होत आहे. काही ठिकाणी उष्णतेत वाढ झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, सोमवारी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. आंबा आणि काजूच्या प्राथमिक बेगमीच्या काळात झालेल्या या अवकाळीने आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरचा अंतिम टप्पा ते डिसेंबर महिना हा आंबा-काजू कलमांची फवारणी करण्याचा कालावधी असतो. हलक्या थंडीच्या काळात कलमांना फुटवा धरून मोहोर येतो. तो टिकवण्यासाठी बागायतदारांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अवकाळीने मोहोर संरक्षणासाठी फवारण्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे.
शासनाचा उपक्रम :
अवकाळी पावसाने सातत्य ठेवल्यास कलमांवर बुरशीजन्य आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने जिल्ह्यातील बागायती क्षेत्रात ‘क्रॉपसॅप अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एकाचवेळी मोहोर संरक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
प्रत्येक तालुक्यात मोहोर संरक्षण कार्यक्रम
