शेवरा
शेवरा ही फोडशीप्रमाणे अत्यल्प कालावधीसाठी खाण्यास योग्य असलेली रानभाजी आहे. फोडशीप्रमाणेच शेवऱ्याचे कंद पावसाळ्यापुर्वी जमिनीखाली निद्रिस्त असतात. पावसाळ्याची चाहूल लागताच या कंदाला जमिनीतून एकच सरळसोट कोंब फुटतो. कोंबाच्या टोकावर फुलाच्या पाकळीच्या किंवा केळीच्या बोंडाच्या सोपासारखी एकच पाकळी गुंडाळलेली असते. साधारण एक ते दीड फूट उंचीचा हा कोंब असतो. शेवऱ्याचे फंल पुढच्या दोन ते तीन दिवसांत फुलते. पाकळी उघडून, दुमडून मोकळी झाल्यावर आत एक काठीसारखा निमुळता जाडसर स्रीकेसर असतो. त्याचा रंग पांढरट पिवळसर असतो. हाच भाग शेवऱ्याच्या भाजीसाठी उपयुक्त असतो. शेवरा ही रानभाजी कोकणातील जंगली भागात पावसाळ्याच्या सुरुवातीस सहज उपलब्ध होते. हा वर निमुळता होत जाणारा टोचदार भाग कापंन व स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करतात. अळुप्रमाणेच या भाजीलाही किंचित खाज असल्याने याची भाजी करताना कोकम टाकतात. त्याप्रमाणे आपण चिकन किंवा मटण मसाला करण्यासाठी पाकक्रिया वापरतो तीच पाकक्रिया वापरून तशीच याची भाजी करतात. शेवऱ्याची भाजीदेखील अगदी मटणासारखीच लागते. पावसाळ्यात सुरुवातीस खाल्ली जाणारी ही अतिशय रुचकर व चमचमीत रानभाजी आहे. शेवऱ्याचे फूल फुलल्यापासून पुढच्या आठवडाभरातच ही भाजी खाण्यास योग्य असते. ही भाजी काढताना संपूर्ण कोंब उपटून काढण्याची गरज नाही. वर उल्लेख केलेला टोकदार निमुळता स्रीकेसरच मोडून किंवा कापून आणावा लागतो. स्रीकेसर तसाच फुलात राहिला तर आठवडाभरानंतर स्रीकेसराचे फलन होऊन बारीक दाण्यांचे साधारण मक्याच्या कणसासारखे फळ तयार होते. दोन तीन दिवसांत हे फळ पिकते. आधी हिरवे असलेले दाणे पिकल्यावर पिवळे लाल होतात. त्यापुढील दोन चार दिवसांत हे फळही कुजून जाते. शेवऱ्याचे असे आयुष्य खूप कमी असते. त्याचा जमिनीखालील कांदा मात्र वर्षानुवर्षे जीवंत राहतो. पावसाळ्यात सुरुवातीस आवर्जून खावी अशी ही शेवऱ्याची रानभाजी आहे.
कोकणातील रानभाजी शेवरा