फोडशी
ही कांदावर्गीय रानभाजी आहे. पांढऱ्या कांद्याच्या भाजीसारखीच ही भाजी असते व दिसते. बऱ्याच वेळेस ही भाजी उपटताता कांदा जमिनीतच राहतो. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीस ही भाजी जंगलात उगवते. कोकणात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी आहे. अनेक ठिकाणच्या नदीकाठच्या जंगलांत ही रानभाजी उगवते. मात्र फोडशीची भाजी अचूक ओळखण्यासाठी अनुभव व जाणती दृष्टी लागते. कारण फोडशीच्या भाजीसारखेच दिसणारे अनेक कंद येथे उगवतात. यांपैकी फोडशीसदृश दिसणारे कंद अनेक असतात. भाजीच्या पातीही तशाच दिसतात. मात्र किंचित पातळ व बारीक पात, लहान व पांढऱ्याशुभ्र कांदा दिसला की, ती फोडशी समजावी. फोडशीच्या रानभाजीचा कांदा इतर ऋतूत जमिनीखाली मृतवत असतो. मात्र पहिल्या पावसातच त्याला कोंब फुटून पाती वर येतात. फोडशीची भाजी जंगलात उगवल्यापासून पुढचा पंधरवडाभरच खाण्यासाठी योग्य व चविष्ट असते. फोडशीच्या पाती जुन झाल्यावर त्या पटकन शिजत नाहीत व तशी चवही लागत नाही. फोडशीची भाजी कोकणातील जंगलांमध्ये सर्वत्र मिळते. कांद्याच्या पातीची भाजी जशी करतो तीच पाकक्रिया वापरून फोडशीची भाजी करता येते. काही ठिकाणी या भाजीत सुका कोलीम घालून शिजवतात. फोडशीची भाजी खूप चविष्ट व बहुपयोगी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस ही भाजी उपलब्ध होईल तेव्हा अवश्य खावी. अनेक खवय्ये पावसाळ्याच्या सुरुवातीस या रानभाजीची अगदी आतुरतेने वाट बघत असतात.
कोकणातील रानभाजी फोडशी