‘सावंतवाडी खरेदी-विक्री’तर्फे भात विक्रीसाठी मुदतवाढ'
सावंतवाडी, : तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत ९ केंद्रांवर १५ फेब्रुवारीपर्यंत भात खरेदी सुरू ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या केंद्रांवर आधारभूत हमीभाव दराने भात विक्री करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, व्हाईस चेअरमन रघुनाथ रेडकर यांनी केले आहे.
आधारभूत किंमत भात खरेदी योजना २०२२-२३ अंतर्गत भात खरेदीची मुदत शासनाकडून ३१ जानेवारीपर्यंत दिली होती. सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत भात खरेदी सुरू होती; मात्र यंदा पावसाचा हंगाम वाढल्यामुळे भात कापणी आणि मळणीला शेतकऱ्यांना विलंब झाला. त्यामुळे ही मुदत वाढ व्हावी, अशी मागणी होती. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे चेअरमन गावडे आणि सहकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी भात खरेदीच्या कार्यक्रमात बदल करून १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविली. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघामार्फत ३१ जानेवारीपर्यंत सावंतवाडी केंद्र ३६०० क्विंटल, मळगाव केंद्र २४६० क्विंटल, मळेवाड १९३० क्विंटल, तळवडे ७९५ क्विंटल, कोलगाव ३०९८ क्विंटल, मडुरा ७३७ क्विंटल, डेगवे १०६७ क्विंटल, इन्सुली ९३८ क्विंटल व दोडामार्ग तालुक्यातील भेडशी केंद्रावर १८६० क्विंटल अशी एकूण १६५०० क्विंटल एवढी भात खरेदी झाली आहे. भात विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी या केंद्रावर शिल्लक राहिल्यामुळे शासनाकडून भात धान खरेदीला मुदतवाढ दिली आहे. भात विक्रीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या केंद्रावर संपर्क साधून भात खरेदीच्या नियमानुसार तसेच केंद्र धारकाच्या सूचनेनुसार भात विक्रीसाठी आणावयाचे आहे, असे आवाहन केले आहे.
सावंतवाडी खरेदी-विक्री’तर्फे भात विक्रीसाठी मुदतवाढ