टाकळा
टाकळा ही वनस्पती ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात उगवते. कोकणात ही भाजी सर्वत्र सहज आढळते. पहिल्या पावसानंतर ही भाजी जमिनीतून उगवते. टाकळ्याची रोपटी वितभर उंचीची झाली की ही रानभाजी खाण्यास योग्य समजावी. रस्ते व पायवाटेच्या दुतर्फा, मोकळ्या मैदानात किंवा शेतात व जंगलातही ही रानभाजी मुबलक प्रमाणात उगवते. टाकळ्यामध्येही अनेक प्रकार आहेत. पण साधारण घंटेच्या आकाराची पाने असलेला टाकळा खाण्यास योग्य समजावा. टाकळ्याची रोपे कोवळी असतानाच त्याच्या वरच्या कोवळ्या पानांचे तुरे खुडून ते भाजीसाठी वापरतात. किंचित तुरट चवीच्या या रानभाजीला खूप खमंग असा सुवासही येतो. टाकळ्याची भाजी पित्त विकारांवर गुणकारी आहे. पावसाळ्यानंतर पुढच्या दोन महिन्यांपर्यंत ही भाजी खाण्यास योग्य असते. टाकळ्याचे खुडलेले तुरे स्वच्छ धुवून त्याची बाजारात मिळणाऱ्या पालेभाजींसाठीची पाकक्रिया वापरून पातळ किंवा सुकी भाजी करतात. टाकळ्याचे रोपटे साधारण एक मीटरपर्यंत उंच वाढते. पावसाळ्याच्या अखेरीस टाकळ्यास पिवळी फुले येऊन नंतर प्रत्येक फुलाच्या जागी एक शेंग येते. या शेंगा परिपक्व झाल्यावर शिशिरात तडकून त्यांतील बिया इतस्ततः विखुरतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस याच बिया रुजून टाकळ्याची नवीन रोपे तयार होतात. खमंग चवीबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनेही औषधी गुणधर्म असलेली टाकळ्याची रानभाजी पावसाळ्यात अवश्य खावी.
कोकणातील रानभाजी टाकळा