कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहा.
चिपळूण, : कुठल्याही पर्यटनस्थळाची तुलना कोकणाशी होते हे लक्षात घेतले तर कोकणाचे महत्व लक्षात येईल. त्यामुळे कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहायला हवे, असे प्रतिपादन भारतीय प्राच्यविद्या, स्थापत्य, मूर्ती आणि मंदिरांचे ज्येष्ठ अभ्यासक आशुतोष बापट यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात अखेरच्या दिवशी शाश्वत पर्यटन या विषयावरील परिसंवादात आशुतोष बापट बोलत होते. या परिसंवादात स्थापत्य विशारद मकरंद केसरकर, गारवा कृषी पर्यटनाचे सचिन कारेकर, कोकणी रानमाणूस यूट्यूबर प्रसाद गावडे आणि प्राचीन कोकणचे संचालक वैभव सरदेसाई यांनी भाग घेतला.
बापट म्हणाले, कोकणाला लाभलेला निसर्ग हे एक मोठे भांडवल आहे; पण त्याचा अभ्यास करून ते लोकांसमोर आणले पाहिजे. छत्तीसगड राज्यातील बस्तर गाव कुख्यात होते; पण आता तो परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. महाराणा प्रताप हे जेथे काही क्षण थांबले होते ते ठिकाणही तेथे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. बिवली गावात विष्णूची धातूची पुरातन मूर्ती आहे. मूर्तीवर असलेल्या गळ्यातील माळांवर आंबेही कोरले आहेत. याचा अर्थ ती मूर्ती स्थानिक कलाकारांनीच कोरली असेल. याचा अभ्यास करून कोकणवासीयांनी पर्यटक आणि कोकणाचा दुवा बनले पाहिजे.
वैभव सरदेसाई म्हणाले, कोकणाला इतिहास आहे, लोककला, खाद्यपदार्थ, जैविविधता, कातळशिल्प, विस्तीर्ण सडे असे पर्यटनाचे शाश्वत पैलू आहेत. ते अनुभवायला या, असे आवाहन पर्यटकांना करायला हवे. परिसंवादाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले तर प्रकाश घायाळकर यांनी आभार मानले.
कोकणातील पर्यटनाकडे डोळसपणे पाहा.