आंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील आंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा ही कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून देखील ओळखले जाते. तसेच दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. देश-विदेशातील भक्तांना उत्सुकता असते ती भराडी देवीच्या जत्रेची. विविध क्षेत्रातील लोक या जत्रेला उपस्थित राहतात. देवीच्या जत्रेची तारीख देवीचा कौल घेऊन निश्चित केली जाते .एकदा निश्चित केलेली तारीख कुठल्याही परिस्थितीत बदलली जात नाही.
साधारणपणे तीनशे वर्षांपूर्वी देवीची स्थापना झाली. पुण्याचे श्रीमंत पेशवे चिमाजी आप्पा यांनी मोहिमेमध्ये भराडी देवीच्या कृपा आशीर्वाद मिळाल्यामुळे 2200 एकर जमीन ही देवीच्या मंदिरासाठी देण्यात आली. मालवण पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसुरे गावातील बारावाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी ,याच आंगणेवाडीमध्ये या देवीची जत्रा भरते. या देवीची आख्यायिका आहे.
आंगणे नामक गृहस्थाची गाय नेहमी रानात येऊन एका विशिष्ट ठिकाणी पाषाणावर पान्हा सोडत असायची. एक दिवस तो रानात गेला असताना हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला ,त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की आपण येथे प्रकट झालो आहोत. तेव्हा पासून सर्व गावकरी देवीची पूजा करू लागले .भरड गावातील एका राई वर स्वयंभूमूर्ती अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात.
या देवीची आणखीन एक आख्यायिका आहे. ही देवी तांदळाच्या वड्यातून प्रकट झाली म्हणून तिला भरड देवी म्हणतात. आंगणेवाडीतील जनता भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात .पण हे वडे मात्र तिथेच खायचे असतात .घरी नेता येत नाही कारण तेथील लोकांचा असा समज आहे जशी वड्यातून देवी प्रकट झाली तशीच वड्यातून बाहेर गेली तर ? असे या नवसाला पावणारे देवीचे महात्म्य दिवसेन दिवस वाढत आहे.
जत्रेला तर भाविकांचा पुरच येतो .ही जत्रा फेब्रुवारी मार्च महिन्यात असते .या जत्रेची तिथी अशी नसते. गावातील लोक देवीला कौल लावतात उजवा कौल मिळाल्यानंतर गावातील लोक शिकारीला जातात . जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील कामे होत नाहीत असा गावातील लोकांचा समज आहे. ज्या दिवशी शिकार मिळेल त्या दिवशी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन भोजन करतात. आणि त्या दिवशी ग्रामभोजन करून चर्चा केली जाते आणि चर्चेनंतर जत्रेची तारीख निश्चित केली जाते.
यावर्षी देवीची जत्रा शनिवारी 4 फेब्रुवारी 2023 रोजी निश्चित केली आहे. तरी सर्व भाविक भक्तांना देवीचा कृपा आशीर्वाद मिळावा.
Aanganewadichi Jatra 4 Feb 2023