कोकणातील लोककलांचे दस्तवेजीकरण व्हावे
परिसंवादातील सूर; लोकसंगीतातील वाद्ये ही परंपरागत कला
चिपळूण, : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, महोत्सवामुळे लोककलांचा नव्याने परिचय लोकांना होत आहे, ही चांगली बाब आहे. कराची ते कन्याकुमारी या भागाला सप्तकोकण म्हटले जाते. आपण डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंतच्या विस्तारित कोकणचा विचार करूया. या साऱ्या कोकणातील संपूर्ण लोककलांचे दस्तावेजीकरण झाले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करता येईल. आपण लोकांसमोर आलो तर लोक आपल्याला समजून घेतील. तालाशिवाय लोककला यशस्वी होऊ शकत नाही. माझ्या आठवणीत पूर्वी देवगडमध्ये ‘घुमट’ वाद्य आणि खेळ होते. आता ते नष्ट झाले आहे. मच्छिंद्र कांबळी यांचे वस्त्रहरण हे लोककलांचे नागरी सादरीकरण होते. अशा लोककलांचे नागरी लोकमंचावर सादरीकरण व्हायला हवे. प्रायोगिक रंगभूमीवरही लोककलांचे प्रयोग व्हायला हवेत. प्रत्येक लोककलेचे मूळसूत्र कायम आहे. उत्तर भारतातील रामलीला नाट्यप्रकार सोळाव्या शतकात सुरू झाला. दशावतार आणि त्यात साम्य आहे. दासबोध ग्रंथात दशावताराचा उल्लेख आहे. रामदास स्वामींना तो माहित होता. दशावतार कलेला सूत्र आहे, संवाद नाही. तेथे प्रत्येकाच्या प्रतिभेला संधी आहे. लोककलेमध्ये मात्र प्रतिभेला मुक्त वाव आहे.
बाबू घाडीगावकर यांनी लोककलांचे बदलते स्वरूप स्पष्ट केले. ते म्हणाले, लोककला जगणे आणि जोपासणे यात फरक आहे. अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे या कला लोप पावत आहेत, याची खंत वाटते. चिपळूणच्या लोककला महोत्सवात सादर झालेल्या अनेक लोककला अनेकांना माहितही नव्हत्या. लोककला सादर करणारी विद्यमान पिढी शेवटची आहे का, अशी शंका येते. म्हणूनच या लोककला जोपासण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. लोककला अनेकांनी आपल्या नाटकात, चित्रपटात वापरल्या आहेत. लोककला रंगभूमी डिजिटलमुळे लोकांपर्यंत आली ती अधिक विस्तारायला हवी.
कोकणातील लोककलांचे दस्तवेजीकरण व्हावे
