बांदा : बांदा-दाणोली मार्गावरील सरमळे येथील श्री देव सपतनाथ देवस्थान मंदिराची उभारणी हजारो भाविकांच्या साक्षीने एका रात्रीत करण्यात आली. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ५) सूर्यास्तानंतर बांधकामाला सुरुवात करण्यात आली. अवघ्या आठ तासांत काल पहाटे सूर्योदयापूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षांचा मंदिर बांधण्याचा सरमळे ग्रामस्थ व भाविक यांच्या स्वप्नवत इच्छेला आज यश मिळाले. सरमळे येथील सपतनाथ मंदिर एका रात्रीत बांधण्याचे स्वप्न देवीच्या कौलाने आणि गोव्यातील एका भाविकाच्या मोठ्या आर्थिक साहाय्याने ग्रामस्थांनी पूर्ण केले. हे काम करताना यासाठी प्रचंड मेहनत आहे, याची जाण ग्रामस्थांना होती. मात्र, देवीचा कौल आणि सपतनाथ देवाच्या आशीर्वादाची शिदोरी यामुळे मिळालेली ऊर्जा ग्रामस्थांना या कामी आली.
भाविकांनी मंदिराच्या पाव्यापासून ते कळसारोहणापर्यंतच्या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवले व ऐतिहासिक सुवर्णक्षणांचे साक्षीदार झाले. अनेकांनी हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. एका रात्रीत बांधण्यात येणाऱ्या या मंदिराचे काम हजारो भाविक ग्रामस्थ आणि ब्राह्मण (Brahmin) मंत्रघोषात देवीच्या कौलानुसार आणि ग्रामस्थांनी केलेल्या निश्चयानुसार पहाटेपर्यत हे मंदिर पूर्ण केले. पांडवकालीन असलेले हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले होते, अशी आख्यायिका आहे. मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी व हे क्षण डोळ्यात साठविण्यासाठी सिंधुदुर्ग तसेच गोवा राज्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
भाविकांनी मंदिराचा परिसर अलोट गर्दीत फुलून गेला होता. मंदिराला तीर्थ क्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरापर्यत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंगळवारी (ता. ५) सूर्यास्त झाल्यानंतर पूजा करून व सार्वजनिक गाऱ्हाणे घालून मंदिर बांधकामास प्रारंभ झाला. आठ तासांच्या अथक मेहनतीनंतर पहाटे ५ वाजता मंदिराच्या शिखरावर कळस चढवून बांधकाम पूर्ण करण्यात आले. कळसावर झेंडा रोवल्यानंतर ‘’हर हर महादेव’’चा जयघोष करत भाविकांनी जल्लोष केला.
श्री देव सपतनाथ देवस्थान मंदिर